Tuesday, December 21, 2010

मंत्र्यांचे लाड भारी, पाहिजेत क्लास वनचे अधिकारी

हर्षदा परब
मुंबई, दि. १७ - राज्य सरकारच्या काही मंत्र्यांनी मर्जीखातर वर्ग एकच्या अधिकार्‍यांची नाहक अडवणूक केली आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर आणि इतर अधिकार्‍यांच्या कामावर ताण पडत आहे.
प्रत्येक मंत्र्याला एक खासगी सचिव, तीन पीए, दोन क्लर्क आणि एक किंवा दोन स्टेनो एवढे कर्मचारी त्याच्या विभागासाठी मिळतात. खासगी सचिव हा वर्ग एकचा अधिकारी असतो. परंतु कॉंग्रेस — राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही मंत्र्यांनी एकापेक्षा जास्त वर्ग एक अधिकार्‍यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून स्वत:च्या खात्यात नेमणूक करून त्यांना आपल्या पंखाखाली घेतले आहे. काही खास मर्जीतील अधिकार्‍यांना ही संधी देण्यात येते. किंवा एखाद्या मंत्र्याचे पद गेले तर त्याच्यासाठी काम करणार्‍या त्याच्या खास अधिकार्‍यांचा त्या मंत्र्याच्या जवळच्या एखाद्या मंत्र्याकडे तो वशिला लावतो. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर काही मंत्र्यांच्या विभागांमध्ये झालेल्या अनपेक्षित बदल्या याचाच भाग आहे.
एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार सध्या महसूल अधिकारी, कृषी अधिकारी यासारख्या काही पदांच्या जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष काम करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या पदांवरील जागा रिक्त आहेत. परंतु वर्ग एकचे अधिकारी अशा तर्‍हेने मंत्र्यांच्या दिमतीला गेल्यामुळे प्रशासनातील इतर कर्मचारी अधिकार्‍यांच्या कामावर ताण पडत आहे. तसेच पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीच्या पंचनाम्याचे कामही रखडले आहे. सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची भरती वर्षभरासाठी बंद केली आहे. परंतु राज्य सरकारने मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या अधिकार्‍यांची संख्या मोजल्यास त्यांना धक्काच बसेल अशी आकडेवारी बाहेर येईल. वर्षानुवर्षे ही पद्धत सुरू आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तरी याची दखल घेतील का हे आता पहायचे आहे.
* या नेमणुका यासाठी
- गोपनीय माहितीत बदल करण्यासाठी
- मंत्रालयाबाहेर अस्तित्वात असलेल्या मंत्र्यांचे कारभार हाताळण्यासाठी
- इतर मंत्र्यांची हेरगिरी करण्यासाठी
- इतर मंत्र्यांबाबतच्या बातम्या पसरवण्यासाठी
* मंत्री - वर्ग एक अधिकारी
मदत पुनर्वसन मंत्री नारायण राणे - ३
गृहमंत्री आर. आर. पाटील - ४
ग्रामविकास मंत्री जयंत पाटील - ३
राधाकृष्ण विखे-पाटील - ४
वनमंत्री पतंगराव कदम - २
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात - ३

Monday, December 13, 2010

कोकणातील दीड लाख बालके कुपोषित


-     सर्वाधिक कुपोषण ठाणे जिल्ह्यात
-     ठाण्यात 11,121 बालके सर्वाधिक कुपोषित
-     सिंधुदुर्ग जिल्ह्यात किशोरवयीन मुलींना पोषण आहाराचा लाभ नाही
मुंबई, दि. 10

हर्षदा परब

कोकणात 0 ते 6 वयोगटातील दीड लाखांहून अधिक बालके कुपोषित असून शासन दरबारी त्यावर धिम्या गतीने कारवाई सुरू असल्याचे चित्र आहे. कोकणातील चारही जिल्ह्यांपैकी ठाण्यात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण असून सर्वात कमी कुपोषित बालके सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली आहेत.

नोव्हेंबर अखेरीपर्यंत ठाणे जिल्ह्यात द्वितीय श्रेणीतील आणि तृतीय श्रेणीतील मिळून 85,865  बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली आहेत. तर सर्वात कमी कुपोषणाचे प्रमाण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील मिळून 13,365 बालके कुपोषित असल्याचे आढळले. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मिळून एकूण 1 लाख 66 हजार 704 बालके कुपोषित असल्याचे आढळले आहे.

कोकणातील चारही जिल्ह्यातील कुपोषणाचा आढावा कोकण भवन येते घेण्यात आला. कोकणातील कुपोषणाची दशा समजून घेऊन कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि या संदर्भात दिशा ठरवण्यासाठी ही आढावा बैठक झाल्याचे येथील सूत्रांनी सांगितले.

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी दुस-या आणि तिस-या श्रेणीतील कुपोषित बालकांना गाव पातळीवर 30 दिवसाच्या कालावधीत वैद्यकीय अधिका-यांच्या निरिक्षणाखाली एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत आहार व आरोग्य सेवा देण्यात येते. कोकणातील चारही जिल्ह्यात मिळून 770 ग्राम बाल विकास केंद्र सध्या कार्यरत आहेत. परंतु ही संख्या कुपोषित बालकांच्या तुलनेत कमी आहे. शिवाय 10 मुले असल्यानंतरच हे केंद्र सुरू करता येत असल्याने याचा लाभ जास्त बालकांपर्यंत पोहचू शकत नाही. कोकणातल्या दुर्गम भागात 5 ते 6 कुपोषित बालके असल्यास त्या ठिकाणी संबंधित अधिका-यांनी ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात यावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे कळते.   

विभागीय आयुक्त एस. एस. संधू यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठकीत घेण्यात आली. यावेळी चारही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

चौकटः
सिंधुदुर्गात मुलींना पुरक पोषण आहाराची सुविधाच नाही!
पुरक पोषण आहार योजनेअंतर्गत कुपोषित बालकांना आहार देण्यात येतो. दर सहा महिन्यांनंतर या सुविधेचा लाभ घेणारी बालके बदलतात. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात यासंदर्भातल्या जीआरचे वाचन चुकीचे झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून कुपोषणाची लक्षणे असलेल्या किशोरवयीन मुलींना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. नोव्हेंबर अखेरीपर्यंत पुरक पोषण आहाराचा लाभ घेतलेल्या किशोरवयीन मुलींची संख्या शून्य नोंदविण्यात आल्याचे या आढावा बैठकीत उघड झाले आहे.
  

जिल्हा
कुपोषणाच्या दुस-या श्रेणीतील मुले
तिस-या श्रेणीतील कुपोषित मुले
ठाणे
74,754
11,211
रायगड
37,023
3,730
रत्नागिरी
23, 344
3,277
सिंधुदुर्ग
39,184
1946
एकूण
1,46,540
20,196

Sunday, November 28, 2010

मुलींना दिलासा देणारी ‘सुकन्या’

हर्षदा परब
मुंबई, दि. २८ - स्त्री अर्भकांचा मृत्यू रोखण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी सुकन्या योजना आणण्याचा विचार महिला व बालविकास विभागातर्फे सुरू आहे. ११४ कोटी रुपयांची ही योजना असून अर्थ मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवताच महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या योजनेचा आराखडा तयार असून अर्थ मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. या योजनेनुसार बीपीएल कुटुंबात मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावे सरकारतर्फे पाच हजार रुपये जमा करण्यात येतील. मुलीच्या अठराव्या वर्षानंतर तिला हे पाच हजार रुपये व्याजासह देण्यात येतील. परंतु त्यासाठी अठरा वर्षांपर्यंत मुलगी अविवाहित असणे आणि तिचे १२ वी पर्यंतचे किमान शिक्षण असावे अशी अट घालण्यात येणार आहे.
महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनीही अशा तर्‍हेच्या योजनेचा विचार सुरू असल्याचे मान्य केले आहे. आजही स्त्री भ्रुण हत्येचे प्रमाण मोठे आहे. तसेच अपुर्‍या आहारामुळे आजही मुलींचा मृत्यू होतो. जन्मलेली मुलगी कुटुंबावर भार होते आणि तिचा वापर घरातील काम करण्यासाठी होतो. परिणामी मुली शिक्षणापासून वंचित राहतात. या सर्वाचा विचार करून ही योजना आणण्यासाठी महिला व बालविकास मंत्री या नात्याने त्या उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

योजनेच्या काही अटी
* मुलगी ही पालकाचे पहिले किंवा दुसरे अपत्य असावे
* दुसर्‍या अपत्यावेळी जुळ्या मुली झाल्यास दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल
* मुलगी १८ व्या वर्षापर्यंत अविवाहित असावी
* मुलीचे किमान शिक्षण १२ वी असावे

Thursday, November 25, 2010

आता फक्त आठवणी...विरलेल्या


पण मुंबई बधिर नाही... 
हर्षदा परब
मुंबई, दि. २५ - रस्त्यावर बुलेटप्रूफ जॅकेट घातलेले पोलीस अचानक जरा जास्त दिसू लागले, सीएसटी स्टेशन, ऑॅबेरॉय आणि ताज हॉटेल, मंत्रालय अशा महत्त्वाच्या ठिकाणी चेकिंग वाढली... मग गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये झळकणार्‍या बातम्यांवरून लक्षात आले ‘२६/११’ च्या त्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षे झाली. तेव्हा संपूर्ण जगात चर्चा झालेल्या हल्ल्याची आठवण आली...पण विरळ...
अरे उद्या ‘२६/११’ च्या हल्ल्याला दोन वर्षे होतील...
हो ना कशी दोन वर्षे झाली काही कळलंच नाही.
ट्रेन, बस, ऑॅफिसमध्ये आणि फोनवर रंगलेल्या या त्रोटक गप्पांमध्ये ‘२६/११’ च्या हल्ल्याचा उल्लेख आहे पण ओझरता...
खरंय...आता त्या हल्ल्याची आठवण आम्हाला तेव्हा येते जेव्हा कसाब काहीतरी वेडेवाकडे चाळे करतो, हल्ल्यानंतर बंद झालेला एखादा स्विट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी खुला होतो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शहीदांना श्रद्धांजली वाहतात, त्यांच्या नातेवाईकांशी बोलतात, आमचे काही मंत्री त्या कसाबला भेटतात, हेडली काहीतरी बरळतो, दहशतवादी हल्ला होणार असल्याचा एखादा मेल नाहीतर फोन सुरक्षा यंत्रणेला येतो, ‘२६/११’च्या हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार्‍या नुकसानभरपाईचा आढावा घेतला जातो, या हल्ल्यात शहीद झालेल्या उन्नीकृष्णनचे वडील सायकल रॅली काढतात... कोणीतरी त्यावर पुस्तक काढतो नाहीतर कविता करतो...
एरवी मुंबईला हादरवणार्‍या त्या क्रूर हल्ल्याची चर्चा ऐकू आली तर मुंबईकर दचकत नाही... त्याच्या काळजाचे ठोके वाढत नाहीत... इतर हल्ल्यांप्रमाणे हा एक हल्ला होता इतकीच त्याची नोंद आज सर्वसामान्यांच्या लेखी उरली आहे... याचा अर्थ मुंबई बधिर झालेली नाही, पण हा हल्ला आम्ही मनाला लावून खचलो मात्र नाही.
मोशेला आजही मुंबई आवडते, त्याचे आजी-आजोबा तो मोठा झाल्यावर त्याला मुंबईत पाठवणार आहेत. आजही मोशे रात्री झोपताना आपल्या आईवडिलांना गुडनाईट म्हणतो, उन्नीकृष्णनच्या वडिलांना मुलाच्या निधनाचा त्रास सहन होतो म्हणून खचून न जाता ते शहीदांच्या आठवणीत सायकल रॅली काढतात, छाबड हाऊसमध्ये शहीदांच्या स्मृतीत मेणबत्त्या लावल्या जातात, कसाबला फाशी व्हावी म्हणून मोठ्या धिटाईने लोक कोर्टात जाऊन साक्ष देतात... तेव्हा आमचे डोळे पाणवतात आणि आवंढा गिळता येत नाही...
त्यामुळे हल्ली या विरळ झालेल्या आठवणी आम्हाला सांगतात... ‘जिंदगीमे जितता वो नही जो जोर का मारे, जितता तो वो है जो उठकर फिर खडा हो...’ हो आम्ही जिंकलोय आणि ते जगालाही सहज दाखवून दिलंय... कोणत्याही शस्त्राशिवाय शत्रूवर केलेल्या या हल्ल्याने...