Saturday, September 10, 2011

देवा मला पाव...

सामनात आल्यापासून ललित लेखनाची संधी पुन्हा मिळाली... अगदी प्रत्येकाने विश्वास ठेवून मला माझ्या आवडीप्रमाणे विषयांवर लिहायची संधी दिली. त्यात सर्वात आधी नाव विद्याधर चिंदरकर सरांचं घेईन... त्यांनी माझ्या लेखनावर विश्वास ठेवून मला वारंवार लिहितं करुन माझ्यातल्या वेगळ्या गुणाची ओळख मला आणि माझ्या ऑफीसमधल्या कलिगना करुन दिली. माझी सामनातील मैत्रिण श्वेता पवार आणि तिची बॉस श्वेता प्रधाने यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. श्वेता(पवार) मला फोनवरुन आर्टीकलसाठी एखादा विषय देते आणि त्याला जोडून तुझ्या स्टाईलमध्ये लिही... आणि रविवारपर्यंत दे... असं आवर्जून सांगते. पहिलं आर्टीकल सोडलं तर त्यानंतर कधीच तिला रविवारी आर्टीकल मी दिलेलं नाही. पण तरीदेखील ती माझ्याकडून लिहून घेते त्यामुळे गेले दोन आठवडे हर्षदा खूप खूष आहे.. तिला तिच्या मनासारखं लिहायला मिळतंय... प्रभाकर पवार सर, जोशी सर, डहाळे सर, मंगेश वरवडेकर, जयेंद्र लोंढे, इंद्रायणी मॅडम, नवीन आलेली तेजश्री सगळेच लिहिलेलं आवडलं की आवर्जून सांगतात... 'जागा भरण्यासाठी' किंवा 'मनाचे श्लोक' असे काही जण त्या लिखाणाला हिणवतात... पण मला वाटतं मनाचे श्लोक लिहायला रामदास स्वामी व्हायला लागतं... असा विचार करुन मी त्याकडे दुर्लक्ष करते... आणि प्रशांतसुद्धा (माझा नवरा) याला दुजोरा देतो... त्यामुळे हर्षदा आणखी खूष आहे...गेले दोन आठवडे जे मी फुलोरामध्ये लिहीलं किंवा यापूढे लिहीन ते माझ्या वाचकांसाठी आणि मित्रांसाठी मी मुद्दाम ब्लॉगवर टाकतेय... या लिखाणाबद्दल जरुर तुमच्या 'मनाते श्लोक' कळवा...
.....................,...............................................................................................................................................
(लेखाला सुरूवात) 
देवा मला पाव
मनी नाही भाव 
देवा मला पाव
देव अशाने पावायचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रे...
हो पण हे लोकांना समजवायचं कोणी... हात जोडले की देवाला आठवण्यापेक्षा तो काय देऊ शकेल आणि त्या बदल्यात त्याला काय द्यायचं हेच आठवण्याच्या त्याच्या प्रत्येक भक्ताचा वेळ जातो हल्ली.... काय खरंय ना?
देवा मला शेजारची प्रिया पटली तर यावर्षी अनंतचतुर्दशीपर्यंत बाटलीलासुद्धा हात लावणार नाही... देवा मी यावर्षी चांगल्या मार्कांनी पास झाले तर 21 मंगळवार करेन... माझ्या मुलीला मुलगा झाला तर तुला सोन्याचा नारळ देईन, यावर्षी माझं घर झालं तर तुला 1001 काजूचे लाडू देईन... सव्वा रुपयांपासून सव्वा कोटीच्या हारापर्यंत काहीही देण्याची तयारी दाखवत भक्त यथामती यथाशक्ती देवाला आमिष दाखवत ठिकठिकाणी फिरत असतात. देवासमोर कुटले जाणारे टाळ आणि वाजणा-या घंटा यांच्या जोडीला देवाचे कान आणि डोकं बधिर करणारे हे नवस सायास माळरानावरच्या म्हसोबापासून ते अगदी दक्षिणेतल्या बालाजी पर्यंत आणि रस्त्यारस्त्यावर थाटलेल्या देऊळ वजा दुकानांपर्यंत सगळीकडे  वसलेल्या देवांच्या जणू पाचवीलाच पूजले आहेत.
बदलत्या काळानुसार जग झपाट्याने बदलतंय. घराच्या देव्हा-यातला देवही आता थ्रीडी झाला. पुजेत शॉर्टकट आला आणि प्रसादात फ्युजन आलं. पूर्वी देवाची तपश्चर्या करुन देवाला प्रसन्न करायचं. त्याने वर दिला की तात्काळ तो प्रकट होऊन भक्ताकडून त्या बदल्यात काहीतरी मागायचा. काळ बदलला तरी लोकांची मानसिकता त्यांची श्रद्धा बदलली नाही. इंटरनेट, चॅटिंगच्या काळात ऑनलाईन आरती आली आणि टेलिपॅथी(?)च्या आधारे नवस होऊ लागले. देवाला मनोमन इनशॉर्ट नवस करुन लोकं त्यांच्या मनात येतील ते त्या बदल्यात त्याला कबूल करू लागले.
मग मंत्रालयातली फाईल पुढच्या टेबलवर जाण्यासाठी ते लग्नानंतरचं दुसरं अफेअर लपविण्यासाठी सगळ्याप्रकारचे नवस देवाला होऊ लागले. आता नवस पूर्ण झाल्यावर देवालाच काहीतरी द्यायचं असं थोडी आहे. मंडळ, देऊळ, भटजीबुवा, एखादा अनाथ, अपंग, भिकारी अशा कोणाला तरी त्या नवसाचं दिलं जातं. लोकांची मानसिकता हो. आम्ही एका गरीबाला दान दिलं बुवा... असं सांगताना नाकं उडवत मनातल्या मनात केलेला नवस फेडला नारे देवा किंवा देवी असं म्हणणारे हाय सोसायटी लोक आहेतच की समाजात.    
आता एखाद्याने आपलं काम केलं की आपण त्याला त्याच्या उपयोगी येणारी वस्तू देतो ना. मग देवाने आपलं  एखादं मागणं पूर्ण केलं तर आपण त्याला हार, नारळ, सोन्या-चांदीच्या वस्तू, फूलं, फळं असं काहीसं द्यायला नको का... पण छे आजूबाजूचं जग आपल्यात इतकं एकवटलेलं असतं की देवाला त्याच्या आरतीच्या हजार सीडी, त्याचा प्रसाद वाटण्यासाठी ताटं, पिशव्या, त्याचा होम करण्यासाठी हवन कुंड, त्याच्यासमोर लावायचा दिवा, त्याच्या समोर वाजवायला वाजंत्री, त्याच्या भेटीला येणा-या भक्तांना अन्न... म्हणजे काय तर काम करुन घ्यायचं देवाकडून आणि खूष करायचं त्याच्या अवती-भवती घुटमळणा-या, त्यालाच नवस करायला आलेल्या त्याच्या भक्तांना. भक्तांच्या सोयीसाठी काहीतरी देवाच्या नावाने द्यायचं. हे म्हणजे कमालच झाली. आता आपल्यात राहून देव आपल्यासारखाच झाला तर म्हणत असेल साला याला दिलं मी आणि हा देतो या माणसांना. येऊ देत पुढच्या वेळेला चांगला घेतो याला.
ऑल ड्यू रिस्पेकट  देवाच्या मनातलं इथे मांडलं. काय माहिती त्याच्या मनातलं मांडलं म्हणून काही न घेताच तो माझा एखादा नवस पूर्ण करेल.... होय महाराजा !    

Sunday, June 19, 2011

जग रंगलंय स्वतःच्या विश्वात!

झोपाळलेले डोळे... बोलताना वाकडं होणार तोंड आणि वारं अंगात शिरल्यासारखी वर्तणूक...11.18 च्या अंबरनाथ फास्टला ते तिघे जण चढले... दरवाज्यातच बसले. जेमतेम 10 ते 12 वर्षांची मुलं होती ती. डब्यात सुमारे बारा बायका. एवढ्या रात्री अजागळ कपड्यात चढलेल्या त्या मुलांकडे लक्ष देण्याची त्या बायकांना गरजही वाटली नाही. कारण त्या मुलांकडे विकायला आणलेलं काही सामान नव्हत की ती भीक मागायला आली नव्हती. त्यामुळे ट्रेनमध्ये दिसणा-या अशा मुलांबाबत जनरली लोकांच्या चेह-यावर असणारे वस्तूंचं आकर्षण आणि भीक मागायला आलेल्यांची किळस या दोन्ही भाव नव्हते.

एका हाताने रुमालाचा गोळा करुन तो तोंडात घेऊन ती मुलं चिलिम ओढावी तशी ओढत होती. त्यांची चुळबूळ थोडी संशयास्पद होती... मध्येच एखादा उठून दरवाज्यातला खांब पकडून शरीर बाहेर झोकून द्यायचा... चालत्या ट्रेनमधले हे प्रकार रस्त्यावरची मुलं एरव्हीही करतात... पण त्यातही जबाबदारीची हलकी जाणीव असते... पण हे तीघं बेभान होते... त्यांच्यातला एक मुलगा इतर दोघांपेक्षा थोडा मोठा दिसत होता. त्याच्याच नेतृत्त्वाखाली हे सर्व सुरू होतं... त्यांच्या या हालचालीने त्यांनी स्पिरिट किंव व्हाईटनरची नशा केली असावी हे कळायला मला साधारण चिंचपोकळी स्टेशन पर्यंतचा अवधी गेला... मागे वळून पाहीलं तर लेडीज डब्यातला कोप-यातल्या शेवटच्या सीटवर बसलेला पोलिस खाली मान घालून बसला होता. त्याला या सा-याची कल्पनाच नव्हती. या नशा केलेल्या अवस्थेत यातला एखादा ट्रॅकमधल्या एखाद्या खांबाला आपटला तर.... किंवा गाडीखाली पडला तर... मनात गरगरणा-या विचारांमुळे माझी जागेवरच चुळबूळ सुरू होती. मग मात्र न राहवून मी उठून पोलिसाच्या दिशेने गेले...
तिथे तीन-चार मुलं आहेत... ती स्पिरिट किंवा व्हाईटनरची नशा करताहेत...बघता का? मी स्पष्टच सांगितलं.
समोरुन काहीच उत्तर नाही.

एव्हाना गाडीने दादर सोडलं होतं. माटुंगा आणि सायन पार होईपर्यंत मी पाठी वळून-वळून त्या पोलिसाला पाहत होते...पण त्याला काही बसल्या जागेवरुन उठायची इच्छा होत नव्हती. उलट माझं मागे वळून पाहणं आणि त्या दृष्टीक्षेपातून ‘यात लक्ष घालाचा’ चेह-यावरील भाव त्याला त्याच्या मोबाईलच्या खेळात डिस्टर्ब करणारा वाटत होता. मीही मग समोर तोंड करुन त्या मुलांचे चाळे पाहत बसले. त्यांची मस्ती. बोलताना जड होणारी जीभ आणि आता पूर्ण तारवटलेले डोळे हे डोळ्यांना दिसणारं दृष्या माझ्यातल्या ‘समाजसुधारू’ वृत्तीला साद घालत होतं. काय करावं चाईल्ड हेल्पलाईनला फोन करु की रेल्वे पोलिसला की कोण्या क्राईम रिपोर्टला फोन करुन काय करु ते विचारु...
दरवाज्यात त्यातला मोठा दिसणारा मुलगा पुन्हा अंग झोकून देऊन मोठमोठ्याने काहीतरी गात होता... मी चोरट्या नजरेने त्याला पाहत होते...कानात घातलेल्या हॅण्डसेटमधून कोणतं गाणं सुरू आहे... उद्या काय स्टोरी करायची, कोणाला जाऊन भेटायचं...सारे विचार आजच्या परतीच्या प्रवासात नव्हते...
आता तो पोलिस माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. दरवाज्यात खांबाला लटकणा-या पोराला आत खेचत त्याच्या डोक्यात त्याने खणखणीत टपली मारली. त्याला त्या दुस-या दोन मुलांच्या शेजारी नेऊन बसवलं. “ इधर बैठना है तो ठीक तरह से बैठो वरना आगे के डिब्बे मे जाके बैठो... नशा कर रहा है क्या?” त्याच्या रागाला त्या मुलांनी भीक घालण्याचं नाटक केलं. “साब अभी नही करेंगे...इधरही बैठेंग चुपचाप” त्या मुलांचे केविलवाणे सुर ते म्हणताहेत त्यावर विश्वास ठेवू नका असंच जणू सुचवत होते. “साहेब याला सांगा हा मस्ती करतोय”
“नाही साहेब”
“ए चुप्प एकदम” तो पोलिस त्यांच्यावर ओरडला.
‘त्या मुलांपैकी दोघंजण चक्क मराठीत बोलत होते. नशा करणारी, रस्त्यावरची भिकारी पोरं ही मुसलमान, बंगाली, बांग्लादेशी, मद्रासी किंवा तत्सम असतात. पण मराठी कध्धीच नसतात. म्हणजे मला आजवर असा अनुभव आला नव्हता’.
इतक्यात त्या पोलिसाच्या खांद्यावरच्या पाटीवर लक्ष गेलं.‘होमगार्ड’

पोलिसांसारखा वेश असला तरी पोलिसांची चाणाक्ष वृत्ती नाही, त्यांच्यासारखा अनुभवही नाही आणि पोलिसांसारखे अधिकारही नाहीत...मग तो होमागार्ड कशाला त्या मुलांना हुसकावेल? त्याला काय पडलीय? तो होमागार्ड एव्हाना स्वतःच्या जागेवर जाऊन बसला होता... घाटकोपरला तो मोठा दिसणारा मुलगा अचानक खाली उतरला... गाडीने थोडासा वेग घेतला आणि तो पुन्हा डब्यात चढायचा प्रयत्न करत होता इतक्यात त्याचा तोल गेला. त्याने स्वतःला सावरलं आणि लपतछपत तो पुन्हा समोरच्या दरवाज्यात बसलेल्या त्याच्या मित्रांपाशी गेला... प्लॅटफॉर्मवरच्या एका पोलिसाने हे सारं पाहिलं आणि डब्यातल्या पोलिसाच्या दिशेने पाहिलं. गाडीने वेग घेतल्यामुळे प्लॅटफॉर्मवरच्या पोलिसाला काहीच करता आलं नाही.

मुलूंडच्या प्लॅटफॉर्मला गाडी लागली आणि पुढच्या डब्यातून एक १८ ते वीस वयाचा मुलगा ती मुलं बसली होती त्या दिशेने आला. त्याच्या बरोबर आणखी एक मुलगा निळी पिशवी घेऊन आला. मघापासून सुरू असलेली संशयास्पद चुळबूळ आता आणखी वाढली. डब्यातल्या होमगार्डने पुन्हा येऊन त्यांना तंबी दिली. गाडी आणि वारा यांच्यात वेगाची स्पर्धा जुंपल्यामुळे होमागार्ड आणि त्या मुलांचं बोलणं ऐकू येत नव्हतं. ते सारे जण खाली बसले होते त्यामुळे फक्त त्या होमागार्डच्या चेह-यावरच्या एक्सप्रेशन्सवरुन तो चिडल्याचं लक्षात आलं. त्याने विचारलेला ‘बाटली है क्या’ या प्रश्नापाठोपाठ नही हे उत्तर स्पष्ट ऐकू आलं... गाडी ठाण्यात पोहोचली होती.

ती मुलं बसली होती त्याच्या समोरच्या दरवाज्यात एक मुलगा येऊन बसला. गिरणीत काम करणा-या भय्याच्या तोंडाचं पीठ पुसल्यावर तो कसा दिसेल तसा तो मुलगा दिसत होता. मोठ्या मुश्किलीने तो हसत होता. मघाशी त्या मोठ्या मुलाबरोबर निळी पिशवी घेऊन आला तो हाच. त्याने फिल्डिंग लावली. पोलिस पाहतोय का त्याची चाहूल घेतली. ‘अरे बाटली तेरे पास है ना?’ असा तो दुरुनच संवाद साधत होता. मध्येच तो मोठा मुलगा दरवाज्यात उठून उभा राहून पोलिसाचा वेध घेत होता. त्या गिरणीतल्या भय्यासारख्या दिसणा-या मुलाने त्याच्याजवळचा एक गठ्ठा काढून गुपचूप त्याच्यामागे असलेल्या सीट खाली सरकवला. अवघ्या काहीच क्षणात त्याच्या साथीदारांपैकी एकाने त्याला त्या गठ्ठ्याबद्दल विचारलं. तेव्हा ‘संभाल के रखा है एकदम सेफ’ असं म्हणत त्याने तो गठ्ठा ठेवलेल्या दिशेला बोट केलं आणि ओठ फिस्कारत तो हसला. तो बहुधा पत्त्यांचा कॅट होता. “ये आ रहा है...ये आया आया...” असं म्हणत त्याने त्यांच्या दिशेने येणा-या होमागार्डबाबत त्याच्या साथीदारांना सावध केलं. त्या होमागार्डने त्यांना पुन्हा दम भरला आणि तो परत त्याच्या जागेवर जाऊन बसला.

उत्सुकतेपोटी दिव्याच्या आसपासच मी तो भय्यासारखा मुलगा जिथे बसला होता तिथे दारात जाऊन उभी राहिले. एक चोरटीच नजर समोरच्या दरवाज्यात बसलेल्या त्याच्या साथीदारांवर टाकली तर तिथे एक लहान मुल फक्त बनियनवर शांत झोपलं होतं. एका नऊ ते दहा वर्षाच्या मुलाच्या मांडीवर त्याचं डोकं होतं. त्या मुलाच्या शेजारी दोन्ही पाय छातीशी घेऊन ओढणीखाली लपवलेल्या वस्तूचा वास घेत एक मुलगी बसली होती. हातात हिरव्या बांगड्या आणि चांगला पंजाबी ड्रेस घातला होता तिने. अरे पण ही कधी डब्यात आली? म्हणजे मगाशी तो मोठा मुलगा आणि तो भय्यासारखा मुलगा आला त्यावेळी लपत-छपत हे दोघेजण डब्यात आले होते तर. ती बहुतेक त्या छोट्या बाळाची आई होती. तिच्या शेजारी आणखी एक मुलगा होता. मगासचा तो मोठा मुलगा खांबाला पाठीशी घेऊन त्या होमागार्डवर लक्ष ठेवून होता. मध्येच अलगद खाली बसून बोळा केलेला एक कळकट रुमाल तोंडात घेऊन ओढत होता. तो बहुधा त्या मुलीचा नवरा असावा.

त्यांचं एकमेकांना टाळ्या देणं सुरूच होतं. डब्यातल्या माझ्या शेजारच्या बाईसकट सा-याजणी आपापल्या विश्वात मग्न होत्या कोणी मोबाईलवर बोलण्यात, कोणी गेम खेळण्यात, गाणी ऐकण्यात गप्पा मारण्यात डुलक्या काढण्यात... आणि मला हुरहुर लागली होती त्या शांत झोपलेल्या छोट्या बाळाची. मोठा झाल्यावर पिंगट कुरळ्या केसांचा,गुलाबी ओठांचा तो चिमुकला असंच आपलं बालपण घालवेल... की आणखी कसल्या व्यसनात अडकेल. ही मुलं करतात काय? चांगल्या घरातली तर ही मुलं वाटत नाहीत? कुठून आली आणि कुठून चालली आहेत? गाडीने कोपर सोडलं आणि बायका आवराआवर करत दरवाज्यात आल्या. मी उभ्या असलेल्या दरवाज्यात एक घट्ट पॅण्ट आणि घट्ट शर्ट घातलेली वयस्कर बाई उंच चपलांवर स्वतःचा तोल मोठ्या डौलाने सांभाळत त्या मुलांकडे कुत्सिततेने बघत माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. एव्हाना मगाशी माझ्या शेजारी झोपलेल्या बाईने लाला डोळ्यांनी त्या पोरांकडे एक केविलवाणा दृष्टीक्षेप टाकला. मग ती घट्ट पॅण्टवाली बाई मोठ्या ऐटीने अंगठ्या भरलेल्या बोटांकडे पाहत होती किंवा ती बोटं तिच्या पाठी पुढे असलेल्या चार बायकांना दाखवत होती....त्यांच्या पाठीमागे...समोरच्या दारात त्या कळकट रुमालाचं ‘शेअरिंग’ सुरू होतं... ऊन किंवा प्रकाश लागू नये म्हणून ज्या गडद चॉकलेटी रंगाच्या, काळ्या बुचाच्या बाटलीत डॉक्टर औषध देतात तशा बाटलीतून ते पाण्यासारखं द्रव्य काढून त्या रुमालावर काढून तो रुमाल तोंडात धरुन चिलमीसारखं ओढण सुरूच होतं. डोंबिवली आली आणि मी खाली उतरले... स्टेशनवर पोलिस कुठेच दिसत नव्हता. मी प्रशांतला तो प्रसंग सांगितला...आणि लक्षात आलं आपण का पोलिसाला शोधतोय? तो काय करणार? स्टेशनचा जिना चढून-उतरेपर्यंत मी प्रशांतला सारं काही सांगत होते आणि तो नेहमीप्रमाणे ऐकत होता मध्येच पुरक प्रश्न विचारत होता. मग रिक्षाच्या रांगेत आलो आणि रांग मोडून रिक्षात घुसू पाहणा-या एकाला अडवत रिक्षात बसून घर गाठलं. घरी जाऊन नेहमीसारखे शांत झोपलो...

Friday, March 4, 2011

आमचा ३१ डिसेंबर….


 हर्षदा परब
 मी मटा डॉट कॉमसाठी काम करत असताना हा लेख लिहिला होता. त्यावेळी मुंटाचा शुक्रवारचा अंक वीकेण्ड साठी ३१ डिसेंबर निमित्ताने कव्हर स्टोरी हवी होती. प्रगती बाणखेलेने मला  लेख लिहायला सांगितला. लेख वाचून प्रगतीने खूप तारीफ  केली. तिने मग तो  त्यावेळचे मुंटाचे एडिटर  मुकेश माचकरांनीही दाखवला. सरांनी लेख वाचून मला प्रतिक्रिया दिली आणि त्याबरोबरच  'लेडी भाऊ पाध्ये' असं नावही दिलं.  जयंत पवारांनी  हा लेख वाचला आणि  मी चांगली कथा लेखिका होऊ शकते असं सुचवलं... हा लेख प्रसिद्ध झाला नाही. पण त्यावेळी मिळालेल्या प्रतिक्रियांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. म्हणून थोडे बदल करुन हा लेख 'एक्सक्लुझिवली' फक्त तुमच्यासाठी

……..
३१ डिसेंबर, इयर एण्डिंग, पार्टी टाइम... आपल्या नाक्यावरच्या, कॉलेजमधल्या आणि क्लासमधल्या पोरापोरींसाठी नाचण्या, गाण्याचा, खाण्याचा, नवीन गोष्टी ट्राय करण्याचा आणि महत्त्वाचं म्हणजे त-हेत-हेच्या दारवा पिऊन रडण्याचा, लोळण्याचा, मारामा-या करण्याचा दिवस. हो आणि उलट्या करण्याचाही... उद्या कोणी म्हटलं याच दिवशी मोठ्या संख्येने लोक उलट्या करतात. तर त्याला आपला फुल्ल सपोर्ट असेल.

या दिवशीचा आपला प्लान पण ठरलेला असतो. बाटल्या आणायच्या गच्चीत खाऊन, पिऊन, दोन ती पेग लावायचे त्यानंतर एखादी सिगारेट शेअरमध्ये मारायची. क्लोर मिंटच्या कॅटेगरीत मोडणारी एखादी गोळी खायची. नंतरच्या अॅक्शन रिअॅक्शन प्रत्येकाच्या निराळ्या असतात. आपला ग्रुप एकदम एन्जॉय करणारा आहे.

या वर्षी गच्चीतली पार्टी उरकून आम्ही बाहेर पडलो. यातलं काहीएक खोटं नाही बरं का. आमच्या अथ्याला विचारा. अथर्व कुलकर्णी हो. यावर्षी पहिल्यांदा आमच्याबरोबर पार्टीला आला होता. आम्ही विचार केला सालं शास्त्रीय संगीताच्या बैठकीला जाणारं पोरगं आपल्याबरोबर कसं?’ पण या दिवशी आपण कोणाला अडवत नाय. सगळे आपले असतात. आम्हाला वाटलं चला च्याआयला बिल भरायला बकरा सापडला. पोरं जमल्यावर सवयीप्रमाणे तीर्थ प्याल्यासारखा प्रत्येकाने एक पेग मारला. ही बाटली आपल्या जॉनची. तो ज्या क्लबमध्ये कामाला आहे तिथे त्याला मिळते. मग ती काय असेल ती. या दिवशी लेबल नाही बघत आपण. खिशात पाचशे रुपये घेऊन फिरणारी आणि कॉण्ट्रिब्युशनमध्ये पार्ट्या करणारी माझ्यासारखी पोरं तरी हा नियम अचूक पाळतात. हां. तर आपला अथ्या या पहिल्या पेगला मुकला. पहिलीच वेळ होती ना त्याची, म्हणून. मग नाक्यावरच्या बारमध्ये बसलो. अथ्याला पाजला एक ग्लास. प्यायला. आम्ही आमच्या टाक्या हाफ केल्या. वाटलं बरं झालं पोरगा शुद्धीत आहे ते. बिल भरेल. काउंटरपर्यंत बरोबर गेलो. तर हा साला मटकन खाली बसला. आम्हाला वाटलं उठून बिल देईल. तर साला लोळायला लागला. वाटलं त्याला चढलीय. मग मीच खीसा रिकामा केला. दादाने जोड लावली. बाहेर पडलो तर अथ्या एकदम ताठ उभा. साला त्याच्या इतका चालू कोणी नाही. अथ्याच्या डायरीत नोंदही आहे त्या ऐतिहासिक दिवसाची. ज्या दिवशी अथ्याने पहिल्यांदा थोडीशी घेतली. आता तर आमचा अथ्या फुल्ल टाकी झालाय.

दहा बारा पोरं होतो आम्ही. गाड्या काढल्या आणि निघालो. आम्हाला आधी माहिती नव्हतं. आबांनी दाखवलं. बार बंद करण्याचं त्यांच्यावर संचारलं होतं तेव्हा आम्हाला ही ठिकाणं माहीत झाली. आबा म्हणजे कोण ते तुम्ही नक्की ओळखत असाल. हा तर त्या बारमध्ये गेलो. नाही. त्या बारचं नाव नाही सांगणार. आबांना कळलं तर ते रागवतील. आमचे पिताश्री हो. तसं त्या बारचं नाव आठवत पण नाही.

वाटेत चार बिअर ईच झाल्या होत्या. पण त्याचा काय वांदा नाय. यादिवशी किती ढोसली तरी गाडी चालवताना सगळे एकदम सज्जन. हां, आपल्या अथ्याने मात्र कहर केला होता. थोड्या थोड्या अंतरावर सारखा साला व्यॅक व्यॅक करत होता. हां, तर बारमध्ये गेलो. अंधेरीचा एक डान्सबार होता. सगळ्या आयटम एकदम फुल्ल टू नाचत होत्या. आपला दिनू जाम भडकला होता त्यादिवशी. त्याला असलं काही आवडत नाही. त्याच्या समता आणि समानता या शब्दाला धरुन तो दूर खांबापाशी उभ्या असलेल्या एका सोज्वळ कन्येपाशी जाताना आमच्यातल्या एकाने पाहिला. त्यानंतर आमच्या राखीव खाणा-खूणांनी दिनूची ही भानगड आमच्या सर्व ग्रुप पर्यंत पोहोचली. आम्हा सगळ्यांसाठी तो धक्काच होता. मग सागळ्यांच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या.
काहीसा घाबरत पण धैर्याचा आव आणत दिनू तिच्या जवळ गेला. वाटलं दिनू आता तिला लग्नासाठीच विचारेल. दिनू जवळ येताना पाहून तिने एक गुटख्याचं पाकीट  काढलं. थोडं हलवलं, टिचक्या मारल्या आणि तोंडवर करुन तोंडात मोकळं केलं. ते पाहून दिनूचं सारं अवसानच गळालं. त्याच्या अवसानाबरोबर शिगेला पोहचलेली आमची उत्कंठाही खाली आली.

दिनूच्या चेह-यावर वैताग तांडव करत होता. तो तडक बाहेर गेला. आम्ही सगळ्यांनी ती मजा पाहिली. त्यानंतर पुन्हा नाचणा-या आयटमकडे नजरा वळवून बारमधल्या थंडीत डोळे शेकत बसलो. बाहेर गेलेल्या दिनूला कोणीच बोलवायला न गेल्यामुळे त्याने बाहेरूनच फोन करून त्रास द्यायला सुरूवात केली. आम्हा सगळ्यात अन्या कुठे दिसेना म्हणून त्याला शोधायला गेलो. एव्हाना प्रत्येकजण पावलं मोजत चालत होता.आयुष्यात किती नागमोडी वळणं असतात ते पोटात थोडी जास्त गेल्यावर कळतं.’ पुन्हा एकदा बारमध्ये चेक करावं म्हणून आत आलो. डोळे मिचकावून पुन्हा चेक केलं तर स्पष्ट दिसत होतं की अन्या एका फाकडू पोरीवर पैसे उडवण्याच्या बेतात होता. पिताना साल्याकडे पैसे नसतात. कायम सगळं उधारीवर चालतं. धरला बकोटीला काढला बाहेर. कानात सगळं ढिंकचॅक ढिंकचॅक, मन सात समुंदर.., चढती जवानी..., साकी साकी..., शिला की जवानी.., मुन्नी बदनाम हुई... असं काहीसं होतं.

बाहेर येऊन थंड्याच्या दुकानात दादूने एक सोडा मारला. त्याला भणभणत होतं. त्याला भणभणलं की आम्हाला गरगरत. सु सु सु सु सु हांssssssssssssssssssssss…  झालं दादूने भोकाड पसरलं. दरवर्षीचं सालं नाटक याचं. एक पोरगी काय सोडून गेली. दरवर्षी साला आम्हाला त्रास देतो.
तुम्हाला सांगतो रापचिक होती साली. सु सु सु सु... सोडून गेली रेssssssss” “मी लग्न करणार होतो xxx”. पण xxxxx सोडून गेली आय-मायने सुरुवात होणा-या शिव्या घालून तो जिच्याबद्दल बोलत होता, ते सगळं त्या xxxxx च्याच  नव-याच्या खांद्यावर हात ठेवून दादू बरळत होता. नाही. या दिवशी या आणि असल्या विषयांवर भांडणं होत नाहीत. दादूच्या प्रत्येक आय-माययुक्त शब्दांच्या वाक्याचा अंत छीxx या शब्दाने होतो. यंदाही तो तसाच झाला...

झालं. थोडावेळ बारच्या बाहेर रेंगाळलो. साहब चाहिए क्या? ” आवाजाने त्या बाहेर रेंगळण्याला थोडी दिशा आली. आतल्या व्हिस्की, स्कॉच, बियर, मॅकडॉवेल्स, टकीला, रम आणि कॉकटेलचाही परिणाम आता ओसरला होता. आम्हाला भानावर आणणा-या आवाजाकडे आम्ही दुर्लक्ष केलं. त्यानंतर तिथून कलटायच्या तयारीत असणा-या आम्हाला वो गल्ली मे एक पब है. वहाँ सब बडे घरके लडके-लडकीयाँ आती है या वाक्याने अट्रॅक्ट केलं. त्या अज्ञात इसमाने बोट दाखवलेल्या गल्लीत जाऊन पोहोचलो. पबच्या दूर पण पबमध्ये येणारे-जाणारे दिसतील एवढ्या अंतरावर उभे राहिलो. पोरी, पोरींचे कपडे,  त्यांचे बॉयफ्रेण्ड, नवरे, प्रेम, भांडणं, चाळे, अवतार सारं काही बघितलं. तिथेही उलट्यांची सत्रे सुरू होतीच.

वैतागलो. घरी निघायच्याच बेतात होतो. तर पुन्हा साहब चाहिए क्या?” ने आमचं लक्ष वेधून घेतलं. आम्ही विचारलं क्या देगा?” तो आम्हाला काय खपवायला आला होता ते माहित नव्हतं आणि अंदाजही लावला नाही. बरं तो अय्या कॅटेगरीतलाही दिसत नव्हता. साब आप कितने मे लोगे?” असा प्रश्न केला आणि त्याच्यावर आमचा पम्या भडकला क्या है क्या रे तेरे पासक्या दे रे ला है वो तो बताव शही…” पक्याची जीभ घसरली. त्याने एक छोटी डबी काढली आणि हलणारे आम्ही सगळे जागच्या जागीच हललो. हे काय है? हम ये नही पिता.’ आमच्या म-हाटीला एव्हाना हिंदी क्रियापद लागायला लागली होती. असं झालं की शहण्याने समजायचं लवकरच दोन सेनातयार होऊन आपापसात राडे होणार... साहब कसम से एक बार ले लो. भारी माल है.

त्याच्या त्या शाब्दीक आव्हानांना आम्हाला बळी पडावं लागणारचं होतं... कारण इथे काही जण म-हाटी आणि हिंदी, महाराष्ट्र आणि बिहार यावर च्यायच्या सकट वाद-विवादात गुंतू लागले होते.   इतक्यात... कोणी तरी ओरडलं... अरे होऊन जाऊ दे एवढ्याशा पुडीने काय होणार?”  कोणाचा का असेना आम्हाला विचार पटला होता. इतक्यात नित्याला काय झालं कोणास ठाऊक त्याने खिशात हात घालून घालून त्या डबीचे पैसे दिले. माल असली है ना?”  सगळ्यांकडे बघत बहतच नित्याने त्याला एकदम प्रश्न टकला. पिक्चरचा असा उपयोग होतो एकदम. नाहीतर असले डायलॉग आपण काय रोज विचारतो. बॉस आज थोडा अपुन को भी पार्टी को जाने का है. इसलिए चार का एक इतना दाम मे दिया.  नही चाहिए तो कोई जबरदस्ती नही बॉस माल विकत घेतल्यावर तो साहबवरनं बॉसवर आल्याने नित्यासकट आम्हा सगळ्यांना आतून डील कॅन्सल करावीशी वाटत नव्हती. नही चल फूट ले …”  नित्याची फिल्मी स्टाईल आणखी एक गुगली. मग लुख्क्या कुठल्या कुठे पसार झाला... आणि आम्ही देखील डबी घेऊन xxx पाय लावून पळालो. पोलिसांनी पाहिलं तर सालं झिंगाट नको. आमच्या सगळ्या गाड्या बॅक टू एरिया सुस्साट गेल्या. सिगारेट, दारू आणि पोरगी अशा कुठल्याही कॅटेगरीतल्या सगळ्या व्यसन लावणा-या गोष्टींचा पहिला अनुभव घ्यायची आमची हक्काची जागा म्हणजे गच्ची. गच्चीत पोचल्या पोचल्या पहिला प्रश्न पडला ही पावडर घ्यायची कशी?  हा प्रश्न तोंडातून बाहेर आल्या आल्या परत कोणी तरी बोललंसिगारेटमधनं, भाऊ दम लावायचा मग गच्चीतलं आमचं राखीव पाकीट खाली आलं. नित्यानेच सिगारेट भरली आणि सगळ्यांनी एक एक दोन दोन कश मारले. हो थोड्या वेळाने सिगारेटच्या सुट्ट्याला आम्ही कश म्हणू लागलो होतो. मध्ये तोंडाला बाटल्या लागतच होत्या. गच्चीवरचा स्टॉक संपवायचा असतो या दिवशी... मग अर्ध्या-पाऊण तासाने जन्नत-जन्नत म्हणत सगळे लुडकले. मधू आणि मी त्या जन्नतच्या वाट्यालाही गेलो नाही. कॉण्ट्रिब्युशनमधून आणलेल्या बाटल्या मात्र सोडत नव्हतो. इतक्यात मधूला हुक्की आली. अरे हातात आली तर बघू तरी कशी आहे ती…” असं म्हणत मधूने पावडरची डबी उचलली. मी ही धैर्य करुन पावडर कशी असते ते बघायला गेलो. चक्क खडूची भुकटी घेऊन आलो होतो आम्ही. उल्लू बनलो होतो. लक्षात आल्यावर थोडं वाईट वाटलं पैसे गेल्याचं... पण नंतर म्हटलं साल्या फुकट्या नित्याला असंच हवं... आमच्यासमोर रुबाब दाखवतो साला... थांब उद्या कसा घेतो त्याला... मी आणि मधू पुढच्या रविवारच्या पार्टीची सोय झाली या सुंदर विचाराने हुरळून गेलो. आमचे सारे दोस्त गच्चीच्या कुशीत लुडकलेले पाहून गार वा-याने आलेल्या शहा-यानंतर आम्ही पण भिंतीला टेकून डोळे लावून घेतले.