Thursday, March 29, 2018

सायमन टॉफेल आणि मी... मग तो सिमॉन होतो

हा फोटो दिसतोय? त्यात काय दिसतंय? तीन चिअर लिडर आणि प्रत्येकीच्या बाजूला एक अम्पायर. असा एक फोटो त्याने दाखवला. मग त्याने सांगितलं एका अम्पायरने एका मुलीच्या कंबरेत हात घातलेत. दुसऱ्याने तिच्याकडे न पाहता शरिराच्या एका भागाकडे पाहिलंय आणि मी माझे हात दिसताहेत? पोरं जाम हसली आणि मी सुद्धा फुटले... खळखळून हसले. मागोमाग शब्द आला. 'फोकस', 'यू मस्ट फोकस्ड ऑन यूअर गोल' मुलं लक्ष देऊन ऐकू लागली. मी अम्पायरिंगमध्ये आलो ते मुली, खुबसुरत लडकी (ही अॅक्चुअली युस्ड दिस हिंदी वर्डस), पैसा किंवा मान सन्मानासाठी नाही तर मला उत्तम अम्पायर बनायचं होतं म्हणून. पैसे कमवण्यासाठी नोकरी करत असाल तर तुम्ही दमून जाल. त्याऐवजी तुम्ही आनंदासाठी नोकरी करा. तुम्ही त्यात नवीन काहीतरी कराल, आनंदी रहाल. सिमॉन टॉफेल (येस अॅक्चुअली सायमन टॉफेल) बोलत होता. त्याच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच त्याने पकड घेतली होती. 

भाई जोरदार वाटला. पोरं खुष होतीच.पण आता मी सुद्धा खुर्चीत सावरुन बसले. इतकं मोकळं लेक्चर असेल तर त्या लेक्चरमध्ये जगण्याचा आणि यशाचा वास्तववादी मार्ग दाखवणार याची खात्री असते, हे माझं सुत्र. ते सायमनच्या निमित्ताने पुन्हा एकदा खरं ठरलं. 

सायमन टॉफेल 20 मार्चला मुंबईतल्या व्हिजेटीआयच्या टेक्नोवॅन्झा फेस्टमध्ये लेक्चर देण्यासाठी आला होता. ते लेक्चर मी अटेंड केलं. क्रिकेटबद्दल मला जरा जास्तच तिडीक आहे. का माहित नाही पण आहे. नुसतं गंमत म्हणून बॅटबॉल खेळायला आवडतं.  सायमन टॉफेल च्या व्हिजेटीआयच्या लेक्चरला जायची असाईनमेंट लागली. मी भलतीच खुष झाले. सायमन टॉफेल हा अप्मायरिंगमधला 'परफेक्शनिस्ट' हे प्रशांतच्या तोंडून कधीतरी ऐकलं होतं. मग असाईनमेंट लागल्यावर मी गुगलही केलं. तर आयसीसीच्या अम्पायर ऑफ द इयर चा सन्मान पाच वेळा पटकावलेला अम्पायर त्याला ऐकायची संधी मिळणं म्हणजे परवणीच. मी मनोमन विचार केला हे लेक्चर क्रिकेटवर नसावं नाहीतर मला वेड लागेल. 
पण, जेव्हा तो आला त्याच्या  अत्यंत साधेपणामुळे ये कुछ अलग करेगा असं वाटलं. अनेकदा असं वाटल्यावर फसगतही होते हा अनुभव असल्याने अजून छान वाटत नव्हतं. काही नाही तर आपण त्याला पाहिलं असं तरी सांगता येईल हा दुसरा विचार मनात होता.

 'नमस्ते' या शब्दाने त्याने बोलायला सुरुवात केली. एक दोन वाक्य बोलून त्याने 'मी फास्ट बोललो तर सांगा कारण ऑस्ट्रेलियातल्या लोकांना फास्ट बोलायची सवय असते. माझा अॅक्सेण्ट ठीक आहे ना?' असा प्रश्न करुन त्याने त्याच्या लेक्चरला सुरुवात केली. खुप हिंदी शब्द तो बोलला. फोटो च्या माध्यमातून किस्से  सांगत त्याने त्याच्या अंपायरिंग क्षेत्रातल्या यशाचा मंत्र लोकांना दिला. 

यावेळी त्याने मुनाफ पटेलचा किस्सा सांगितला. हा किस्सा लक्षात ठेवला म्हणजे सिमॉनच्या तोंडातून आलेली साला चुतिया ही शिवी . कॉलेजच्या आवारात लेक्चररने साला च्युतिया देण्याची ही माझ्या आयुष्यातली ही दुसरी वेळ (मी एका लेक्चरमध्ये चुतिया हा शब्द वापरला होता ;) शिवी न देताही मला बोलता येतं. खात्रीने सांगतेय ;) असो..) मुनाफ बॉलिंग करत होता आणि  साऊथ आफ्रिकेचा बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला (मला त्याचं नाव नाही लक्षात राहिलं सॉरी) त्याने साला चुतिया अशी शीवी दिली. त्यावेळी सिमॉन अंपायरिंग करत होता. सिमॉनने सांगितलं पलिकडचा कोणीतरी हिंदी माहिती असणारा खेळाडू होता आणि त्याने मुनाफला त्याने दिलेल्या शिवीबद्दल विचारलं. सायमनने तेव्हा सांगितलं मुनाफ आणि त्याचे चांगले रिलेशन आहेत. तेव्हा ते दोघं एकमेकांना साला असं हाक मारतात. 

त्याच्या आवडत्या अम्पायरिंग हॅटबद्दलही त्याने सांगितलं.क्रिकेटीयर असलेल्या गाडीवर जेव्हा फायरिंग झालं तेव्हा खाली वाकून त्याने कसा जीव वाचविण्याबरोबर  त्याची अम्पायरिंग कॅप चुरगळू नये म्हणून प्रयत्न केला वगैरे हे सुद्धा सांगितलं.  

त्याच्या बोलण्यातील काही हायलाईट्स - टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे. क्रिकेटमध्ये आलेल्या टेक्नॉलॉजीने अम्पायरिंग, निर्णय घेणं सोप्प झालंय. पण अम्पायरिंगसाठी अलर्ट आणि जागृत असलंच पाहिजे. प्रॅक्टीस करताना टेक्नॉलॉजीची मदत घ्यायला नको. 

क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंबद्दल त्याला काही प्रश्न विचारले तेव्हा 'मी खेळाच्या मैदानावर अंम्पायर असतो' असं बाणेदार उत्तर त्याने दिलं. 

बोलताना प्रत्येक वेळी तो 'ठीक है' असं विचारायचा. बरेच हिंदी शब्द त्याने यावेळी उच्चारले. 
  
बोलताना चेहऱ्यावर कोणताही माज नाही पण ठाम बोलणं. फक्त फोटो आणि अम्पायरिंग करताना आलेल्या अनुभवातून यशस्वी होण्याचे फंडे सांगत होता. छान वाटलं त्याला ऐकून. म्हणजे त्याला ऐकून मला स्पोर्टसाठीची बातमी लिहिण्याचा विश्वास मिळाला इतकं साधं आणि सोप्प बोलला हे वेगळं सांगायलाच नको. 

तर सायमन टॉफेल हे नाव अनेकदा उच्चारलं जात असतानाही कुठूनतरी माझ्या डोक्यात ते सिमॉन टॉफेल असं बसलं. ते कॉपीत उतरलं आणि ती कॉपी मी पुढे पाठवलीही. बातमी वाचणाऱ्या गौरव दिवेकरचं आणि इतरांचं डोकं भंजाळलंच असेल. पण असो हेल्थ, कम्युनिटी वगैरे बघणाऱ्या माझ्यासारख्या क्रिकेटव्देष्ट्या मुलीला  5 चं लेक्चर असल्याचं कळलं तेव्हा 4.30 ला हजेरी लावली आणि लेक्चर 6 नंतर सुरू झालं.मधला वेळ मी व्हिजेटीआयच्या कॅम्पसमध्ये दोन इंटरेस्टींग मुलांमध्ये बसून मी पत्रकार असल्याचं कळू न देता गप्पा मारल्या. हे काय कमी आहे काय? 
असो.. व्हिजेटीआयच्या कॅम्पसमध्ये ज्याचं लेक्चर ऐकायला गेले त्याच्याबद्दल अर्ध्या तासापूर्वी माहिती घेऊन बातमी कव्हर करणार होते. काय कळणार या लेक्चरमधलं असा प्रश्न मनात आला की लगेच मेंदूतून भ्रुम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म असं ऐकू येत होतं.  कॉलेजच्या तळमजल्यावरच्या एका खोलीत वाकून बघितलं तर मोठ्या मशिन्स दिसल्या. तेव्हाही तेच भ्रुम्म्म्मम्म्म. हे माहितीतूनच आलं होतं.  थ्री इडियट्समधला सीन. व्हायरसच्या दरवाज्यावर कोण मुतलं याचा शोध घेण्यासाठी वर्गात आलेला व्हायरसला  राजू रात्रभर अभ्यास करत होता असं रँछो जेव्हा सांगतो. तेव्हा  व्हायरस त्याला विचारतो ना -' इन धिस केस हाव डस इंडक्शन मोटर स्टार्ट्स' आणि राजू (शर्मन जोशी) जसं रात्रीची न उतरल्यामुळे भ्रुम्ममममममम म्हणतो. अगदी तसंच सुरू होतं. पण हा भ्रुम्म्म्मम्म्म्ममम्म् माझ्या मनातून सिमॉनने काढलं होतं. आय मीन सायमनने काढला होता.  

(त्यावेळी दोन बातम्या केल्या. त्यापैकी एक बातमीची लिंक देतेय. नक्की वाचा त्यात कळेल सायमन मराठी सुद्धा बोलला होता)

Friday, February 23, 2018

अवयवदान आणि माझे काही अनुभव

अवयवदान चळवळीने मुंबईत 2015 पासून वेग घेतला जेव्हा पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबईत पार पडली. त्यानंतर अवयदान आणि अवयवप्रत्यारोपणाबाबत ऐकत आले. या मागची शास्त्रीय माहिती घेण्यासाठी, डॉक्टर, यंत्रणा यांच्या भेटीगाठी तर झाल्याच पण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षा यादीत असलेल्या, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना आणि अवयदान केलेल्या कुटूंबांना भेटता आलं ऐकता आलं. सारं काही बातम्यांमध्ये देता येत नाही. पण अशा काही गोष्टी होत्या ज्यांनी मी माणूस म्हणून समृद्ध झाले. समाजाचा अभ्यास करताना मला या गोष्टींनी कायम वेगळा दृष्टीकोन दिला. 
प्रत्येक रुग्णाला आर्थिक आणि भावनिक आधाराची गरज असते. पण अवयव प्रत्यारोपणासाठी वाट पाहणाऱ्या किंवा अवयदान केलेल्या व्यक्तींशी भेटणं हे माझ्यासाठी प्रत्येकवेळी नाविन्यपूर्ण होतं ते त्यामागे दडलेल्या गोष्टींमुळे.  वैद्यकीय क्षेत्रातली अवयदान आणि प्रत्यारोपण चळवळ ही एक वेगळी भरारी आहे. पण या भरारीमागे माणूसकी आहे हे नाकारता येत नाही. किंबहूना माणूसकी नसेल तर ही भरारी फार उंच जाणार नाही असं मला यातून वाटत आलंय. 

इतर ठिकाणी बातमी आली होती. तरीही पार्थ राजवाडे या एक वर्षाच्या मुलाची बातमी करण्याचा निर्णय घेतला.
डोंबिवलीच्या पश्चिमेला स्टेशनपासून काही अगदी काही पावलं अंतरावर असलेल्या चाळीत मी शिरले. त्या छोट्याशा घरात जमिनीवर अंथरलेल्या गोधडीवर काही महिन्यांचं बाळ खेळत होतं. पार्थ राजवाडे. त्याचं पोट मोठं होतं, डोळे पिवळे होते. बाळ छान हसत होतं. अगदी इतर बाळांसारखं. त्याच्या आईशी बोलताना लक्षात आलं. पार्थसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून ते प्रयत्न करताहेत. बातम्यांमध्ये त्याचा उल्लेखही होता. या आर्थिक मदतीसाठी आलेल्या बातम्यांमुळे त्यांना मदत करण्यासाठी खुप लोक पुढे आले होते. त्यातलं एक कुटूंब डोंबिवली (पूर्वेला) राहणारं होतं. त्यांनी मदत करायची तयारी दाखिल्यानंतर राजवाडे कुटूंबियांनी त्यांना संपर्क केला. त्यांनी दर महिन्याला काही रुपये मदत करण्याची तयारी दाखवली. मदत करणारं कुटूंब डोंबिवली पूर्वेला राहत होतं. तेव्हा राजवाडे कुटूंबियांनी त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. जे राजवाडे कुटूंब त्यांच्या घरी गेलं तेव्हा पार्थच्या आईच्या लक्षात आलं की ते कुटूंब अत्यंत गरीब आहे. मोठं कुटूंब आणि एकटा कमावता माणूस, पण पार्थ लहान आहे आणि त्याला वाचविण्यासाठी त्याचे आई-वडील आर्थिक मदतीसाठी फिरताहेत हे कळल्याने त्या माणसाने मदत करण्यासाठी स्वखुशीने तयारी दाखविली होती. पार्थच्या आईने त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून मदतीची तयारी दाखविल्याबद्दल आभार मानले आणि मदत घ्यायला नकार दिला. 
हृदय प्रत्यारोपणासाठी सानिया खान दीड वर्षांपासून प्रतिक्षा यादीत आहे. तिचे वडील सरफराज खान घराला कलर काढतात. पूर्वी ते इतरांकडे काम करायचे. सानियाला डॉक्टरकडे नेण्यासाठी, तिला औषध वेळेवर देण्यासाठी घराच्या आसपास असावं लागतं. म्हणून मग ते स्वतः काम घेतात. ज्याने त्यांना फार काम करता येत नाही. प्रत्यारोपणापूर्वी रुग्णांना अनेक औषधोपचार सुरू असतात. सानियाला दररोज लागणाऱ्या औषधांचा खर्च शिवाय पंधरवड्यातून एकदा एक इंजेक्शन घ्यावं लागतं. त्या एका इंजेक्शनला सात हजार रुपये एवढा खर्च आहे. याव्यतिरिक्त 25 लाख रुपये त्यांना उभे करायचे आहेत सानियाच्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी. सरफराज खान यासाठी आर्थिक मदत कऱणाऱ्या सर्व संस्थांनमध्ये जातात. आम्ही जेव्हा एफबी लाईव्हसाठी त्यांच्याबरोबर बोललो त्यांनी ऑन कॅमेरा हे कबूल केलं की सानियाला सर्व जाती-धर्मातल्या लोकांनी मदत केली. 'मुसलमान आहे म्हणून मदत मिळणार नाही असं सुरुवातीला मला वाटलं होतं. पण, प्रत्यक्षात तसं झालं नाही. सानियाचे डॉक्टर अन्वय मुळे यांनी कधीच सानियाच्या तपासणीसाठी फी घेतली नाही. हे सांगताना सरफराजला त्याचे अश्रू आवरत नव्हते. जेव्हा जेव्हा आर्थिक मदत लागली सरफराज राहत असलेल्या वसईतील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्व धर्मातल्या लोकांनी त्यांना वेळोवेळी जशी जमेल तशी मदत केली. मुलीला जगविण्यासाठी दीड दमडी खिशात नसतानाही धडपडणाऱ्या बापाला आर्थिक मदतीबरोबर हा दिलासा खुप मोठा वाटतो. जिथे धर्म आणि जातीवरुन वाद होतात तिथेच दिसलेली ही माणूसकी कातळालाही पाझर फोडणारी आहे. 
के.ई.एम रुग्णालयात अवयदान केलेल्या कुटूंबियांचा विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी विरलेले कपडे घातलेला म्हातारा मला त्या सभागृहात दिसला. सरकारी रुग्णालयात दररोज जाणाऱ्या मला अशा माणसांची सवय आहे. श्रोत्यांमध्ये बसलेल्या त्या माणासाचं नाव अवयवदान करणाऱ्यांच्या यादीत पुकारलं तेव्हा मी त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहिले. तो एका ईमारतीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो आणि त्याच्या कुटूंबातल्या तरुणपणी गेलेल्या त्याच्या कुठल्यातरी पाल्याचे अवयदान त्याने केल्याचं जाहीर केलं. तेव्हा मला मीच फाटकी वाटले. पायात स्लिपर असलेला तो म्हातारा एवढं मोठं दान करुन मोकळा झाला. त्याच्या खोबणीत गेलेल्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. पण त्याला त्याच्या भावना व्यक्त करता येतील एवढी पण त्याला अवयवदानाची माहिती नव्हती. मला विवेकनंदांची आठवण झाली 'दान करा.  ते दान केल्यानंतर ज्याला दान दिलं त्याने त्याचं काय केलं याचा शोध घेत बसू नकाही त्यांची शिकवण मी फक्त वाचली होती तो माणूस ती जगत होता.
2015 ला मुंबईत पहिलं हृदय प्रत्यारोपण झालं. त्यावेळी अनेकजण त्याच्या एक्सक्लुझिव्ह बातम्या करत होते. माझ्याकडे यातलं काही नाही म्हणून मला रुग्णाची एक्सक्लुझिव्ह बातमी आणायला सांगितलं. ते हृदय प्रत्यारोपण झालेल्या 31 वर्षाच्या तरुणावर झालं होतं. त्याच्या वडीलांच्या फोनवरुन संपर्क करुन मी रुग्णालयापर्यंत पोहोचले. रुग्णापर्यंत पोहचून पहिली एक्सक्लुझिव्ह स्टोरी मिळविण्यासाठी मी सज्ज होते. रुग्णालयात पोहोचले. त्याच्या आधीच्या कंपनीतली मी त्याची मैत्रिण आहे हे पटवून देण्यात मला यश आलं होतं. त्याच्याबरोबर रुग्णालयात त्याची काळजी घेण्यासाठी थांबलेली त्याची मैत्रिणी मला नेण्यासाठी खाली आली. आम्ही लिफ्टमधून गप्पा मारत तो असलेल्या फ्लोअरपर्यंत पोहोचलो. त्याच्यापर्यंत पोहोचलेले एवढ्यावरदेखील बातमी झाली असती. अगदी पहिल्या पानावर येईल अशी. पण मी त्या मुलाच्या काळजीने त्याच्या मैत्रिणीला खरं सांगून टाकलं. 'मी त्याची मैत्रीण नाही पत्रकार आहे आणि बातमी मिळविण्यासाठी आहे' असं सांगून टाकलं. त्याला अचानक धक्का बसला आणि काही चुकीचं घडलं तर या विचाराने मी तिला सर्व सांगून टाकलं. त्यावेळी तिने माझे दोन्ही हात हातात घेतले. मी केलेल्या चुकीबद्दल न रागवता, वेळीच तिच्याकडे खरं बोलल्याबद्दल तिने माझे आभार मानले आणि ती त्याची गर्लफ्रेण्ड असल्याचं सांगितलं. सगळी माहिती दिली. वरुन रुग्णालयातल्या कोणालाही हे न सांगण्याची विनंती केली कारण, तिथे नातेवाईकाशिवाय कोणालाही राहण्याची परवानगी नव्हती. 
जसे माझे अनुभव तसे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली. के.ई.ए.म रुग्णालयातील डॉ. चेतन कंथारिया यांनी सांगितलेला एक किस्सा. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना इम्युनो संप्रेसंट खुप मह्त्त्वाचे असतात. त्याचबरोबर मानसिक आधारही लागतोच हे ते सांगत होते. त्यावेळी त्यांनी एका रुग्णाचं उदाहरण दिलं. त्या मुलाला यकृत प्रत्यारोपणासाठी कोणीच पुढे येईना. शेवटी त्याच्या वडीलांनी त्याला यकृत दिलं. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या घरात प्रॉपर्टीवरुन वाद झाला. भावाने शस्त्रक्रिया झालेल्या मुलाला 'तुझ्यासाठी बरंच काही केलं पण तुला त्याची किंमत नाहीअसं त्याच्या तोंडावर बोलून दाखवलं. घरात झालेल्या या वादामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या त्या मुलाने इम्युनो सप्रेसंण्ट औषधं घेणं सोडून दिलं. ज्याने त्याचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या एका केसमध्ये एका पुरुषाने त्याची बायको यकृत द्यायला तयार आहे असं सांगून शस्त्रक्रियेची तयारी सुरू केली. अवयदान करणाऱ्या आणि प्रत्यारोपण होणाऱ्या अशा दोघांचेही समुपदेशन होते. जेव्हा ते अवयवदान नातेवाईकाकडून होणार असते अनेक तपासण्या आणि समुपदेशनाच्या सिटिंग्स होतात. डॉ. कंथारियांनी सांगितल्यानुसार त्या पुरुषासमोर त्याच्या पत्नीने अवयवयदानासाठी स्वखुशीने तयार झाल्याचे सांगितले. त्यानंतर जेव्हा रुग्ण आणि दाता याची वैयक्तिक समुपदेशन होतं त्यावेळी मात्र त्याच्या पत्नीने जबरदस्ती अवयदान करावं लागत असल्याचं सांगितलं. 'मला अनफीट जाहीर करा' अशी डॉक्टरांकडे विनवणी केली. ते अवयव प्रत्यारोपण झालं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. 
याच रुग्णालयात एका मुलीचं मूत्रपिंड प्रत्यारोपण डॉ. निवृत्ती हासे यांनी केलं. त्या मुलीची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती. तेव्हा तिच्या कुटूंबियांनी बरेच महिने, वर्ष तिला मदत केली. डायलिसिससाठी तिच्याबरोबर येत. मात्र ज्यावेळी तिला अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करावी लागणार होती त्यावेळी मात्र तिच्या आई-वडीलांनी देखील तिची साथ सोडली. त्यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला नकार दिला. मुलीला जगायचं होतं. गरीब घरातली मुलगी होती. शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसे उभारण्यासाठीचं आव्हान ती कसं पेलणार, हा खर्च कसा होणार या चिंतेत तिला कोणी मदत करायला तयार होईना. तेव्हा डॉक्टरांनी पुढाकार घेऊन प्रतिक्षा यादीत तिचं नाव नोंदवलं. तिच्या औषधोपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून डॉक्टरांनी तिला मदत केली. या दरम्यान तिच्या वतीने संस्थांकडे आर्थिक मदतीसाठी कोणीच जाणार नव्हतं. पण त्या रुग्णाला त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी केलेली मदत त्या मुलीने शस्त्रक्रियेनंतर मी भेटले तेव्हा बोलून दाखविली. ती मुलगी आली तेव्हा तिचे नातेवाईक शस्त्रक्रियेपुरते आले होते. त्यानंतर ती तिच्या रुमममध्ये एकटी असयाची. माझं आज कोण माझ्याबरोबर नाही पण माझा देव माझा डॉक्ट माझ्याबरोबर आहे असं सांगत तिने त्या डॉक्टर हासेंच पाय धरले होते. मला देव समोर दिसत होता डॉक्टरच्या रुपात. त्यानंतर एक वर्षानंतर वगैरे असं एका प्रत्यारोपणावर बोलताना मी त्या मुलीबद्दल डॉक्टरांकडे सहज विचारणा केली. डॉक्टरांनी मला त्या मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. रुग्णालयातून गेल्यानंतर त्या मुलीला औषध तर मिळत होती पण पुरेस आणि चांगलं खायला मिळत नव्हतं. ज्याने ती घेत असलेल्या औषधांचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. ज्यात तिचा मृत्यू झाला.   
सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची खंत वेगळीच असते. रुग्ण भरपूर असतात पण त्यांच्या खिशात पैसे नाहीत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका ठराविक काळात रुग्ण रुग्णालयात राहतो त्यानंतर तो घरी गेला तर जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून कसं रोखायचं असा प्रश्न डॉक्टरांना सतावतो. लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉ. अजित सावंत यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये एका लहान मुलीवर मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. तिच्या घरात ती धरुन सहा मुलं आणि इतर लोक. सायनच्या झोपडपट्टीत ती मुलगी राहते. तिच्या नशिबाने तिला मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे मूत्रपिंड उपलब्द्ध झाले होते. त्यानंतर ती घरी गेल्यावर तिच्यासाठी कोणतीही स्वतंत्र खोली, किंवा स्वच्छतागृह नाही मग तिला जंतूसंसर्गापासून दूर ठेवणं तिच्या कुटूंबियांच्याही आवाक्याबाहेरचं. पण डॉक्टरांनी त्यादिवशी भेटल्यावर सांगितलं अहो ती मुलगी आता धावण्याच्या स्पर्धेत भाग घेते. भेटली होती त्यादिवशी मला एका संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा. डॉक्टरांना रुग्ण वाचल्याचा आनंद होता मात्र किती काळ तिला रुग्णालयातर्फे मदत मिळणार आणि किती वेळ ती जंतूसंसर्गापासून वाचत राहणार असं तिला वाटत राहिलं.  
सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या शस्त्रक्रियेचा खर्च, त्यांच्या औषधांचा आणि एका ठराविक काळापर्यंत त्यांच्या जेवणाचा खर्च निघेल यासाठी सामाजिक कार्यकर्ते संस्थांकडून या रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देतात. म्हणजे सरकारी रुग्णालयावर केवळ शस्त्रक्रिया करुन काम संपत नाही तर पुढे रुग्ण जगविण्यासठी जमेल ती धडपड करावीच लागते. 
हे झाले रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांचे किस्से मात्र जे अवयवदानासाठी रुग्ण आणि नातेवाईकांचं समुपदेशन करतात किंवा त्यासाठी समन्वयक म्हणून काम करतात त्यांचेही किस्से मोठे रोचक आहेत. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे अवयवदान झाले तर प्रतिक्षा यादीत नोंदलेल्या व्यक्तींवर शस्त्रक्रिया होण्यास कमी वेळ लागेल. तसंच जीवंत व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांना अवयव द्यावे लागणार नाहीत. सरकारी रुग्णालयात मात्र व्यक्ती मेंदू मृत व्यक्ती जाहीर करणं हे आव्हान असतं. अशी व्यक्ती आढळली तरी ती जाहीर करण्यासाठी यंत्रणा सज्ज करुन ते अवयव काढण्यापर्यंत लागणाऱ्या वेळेपूरता त्या रुग्णाच्या शऱिरातील अवयवांची काळजी घेण्यासाठी लागणारी यंत्रणा रुग्णालयांमध्ये नसते. एका समुपदेशकाच्यामते या एका रुग्णाला सांभाळण्यासाठी रुग्णालयातील सर्व यंत्रणा पणाला लागते. तेव्हा इतर रुग्णांना कोण सांभाळेल असा प्रश्न उभा राहतो. अशा वेळेस मेंदू मृत व्यक्ती जाहीर करण्याऐवजी इतर रुग्णांची काळजी घेण्यात सराकरी यंत्रणा झटत राहते. परिणामी एक व्यक्तीच्या शरिरातून मिळणाऱ्या 8 अवयवांना आणि त्यातून 8 जणांना जीवनदान मिळेल ही आशा फक्त आशा राहते. 
तर, दुसरीकडे ही सर्व यंत्रणा अद्ययावत असणाऱ्या खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना सर्व काही मिळण्याची खात्री मात्र, त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक भार ज्याला उचलालयला जमेल तो खरा सिकंदर अशी स्थिती. 
या दोन टोकांमधलं अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत असं राहून वाटलं. (हे आर्टीकल 23 फेब्रुवारी 2018 ला सकाळ वर्तमान पत्रात ओपेड पेजवर छापून आलं आहे.