Tuesday, June 30, 2020

मिसिंग यू पांडुरंगा आणि यू आर डेफिनेटली मिसिंग युअर वारकरी



हो ना रे?  तशी तुझी वारी लॉकडाऊन नंतरच सुरू झाली होती. लाखो पावलांनी तू चालत चालत कुठे कुठे काना कोपऱ्यात पोहोचत होतास. त्या कष्टकऱ्यांच्या खोपटातल्या गाभाऱ्याकडे निघाला होतास. भूकेला होतास, तहानलेला होतास. ते विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हते की ज्ञानोबा- तुकाराम म्हणणारे नव्हते. पण ती तुझीच लेकरं होती. जी भूक-तहानेने घराच्या ओढीने निघाली होती, लेकरा-बाळांसह. मला माहितेय. तू त्यांच्याबरोबर चालत होतास. दमला होतास. लाखो लोकांसाठी तुझा जीव पण कसनुसा झाला असेल. मग तू थोडी गाभाऱ्यात उभा राहशील?

त्यानंतर तर तुझ्यावर आभाळच कोसळलं. कारण सरकारने वारीच कॅन्सल केली कोरोनामुळे. एक नोटिफिकेशन, एक नियम म्हण नाहीतर म्हण सरकारी कारवाई. पण, तुला हृदयात, डोळ्यात साठवून पंढरपूरकडे निघालेली तुझी वेडी लेकरं घरातच कोंडून राहिली त्याने. म्हणून मग तुझीही कोंडी झाली.  वारीत विठ्ठल दिसतो म्हणतात. पण कोणाला दिसायला, भेटायला, मदत करायला तुला कुठे वारीत जाता येणार ना? माहितेय शेतात राबणाऱ्या, पावसाची वाट बघणाऱ्या आणि वारीच्या आठवणीत रंगलेल्या वारकऱ्याला तू भेटला असशील. तसाच ना जसा सावता माळी आणि गोरा कुंभाराला भेटायला  पंढरपूर सोडून गेला होतास अगदी तस्सा... कोण कोणत्या रुपात गेलाच असशील. तस्सा तू लबाड आहेस. पण नक्कीच त्यांचं असं सगळ्या बाजूने कोंडलेलं जगणं तुलाही अस्वस्थ करणारंच वाटलं असेल ना?

वारीच्या त्या 12-15 दिवसात पालख्यांच्या प्रस्थानापासून वारकऱ्यांच्या हृदयात टाळ-मृदूंगाचा गजर निनादतच असेल रात्रं -दिवस. त्यावर इतके दिवस त्यांनी कसं बसं निभावलंही असेल. पण, उद्या कसं काय होईल तुझ्या या वेड्या लेकरांचं रे?  तुझा कळस, ती नामदेव पायरी, नुसता मंदिरावरच्या पताकात तू त्यांना दिसणं, सोललेल्या मांड्या आणि भेगाळलेल्या पायांनी तिष्ठत तासन तास रांगेत उभं राहून फक्त तुझ्या गाभऱ्यासमोर पाय टेकवून सुरक्षा रक्षकांकडून भिरकावून, ढकलून दिल्याचं दु:ख, जाणीवही नसणं,  तुझ्या मुकुटाचा, हाताचा,  नाहीच तर गळ्यातल्या हाराच्या ओझरत्या दर्शनासाठी  सेकंदाच्या 100 व्या भागाचा जो काही काळ असेल तेवढा पण ज्यांच्या नशिबात तासंन तास रांगा लावल्यावर येत नाही ते तुझे घामेजलेले, थकलेले, रापलेले, फाटक्या खिशाचे मळक्या कपड्याचे वारकरी कसे रे राहतील तुझ्या दर्शनाशिवाय? डोळ्यात आसवं जमली असतील त्यांच्या. गळ्यात आवंढा दाटला असेल. तू त्यांची आशा, प्रेरणा आहेस पांडुरंगा. जग भ्रमंतीपेक्षा वेगळा अनुभव देणारा वारीच्या वाटेवरचा तुझा तो सहवास त्यांना मिळाला नाहीच. पण तू पण दिसणार नाहीस म्हणून त्यांना आषाढी वाटणारच नाही. यंत्रवत उपास,वगैरे होईलच त्यात तू असशीलच पण तू कसा रे सगळ्यांबरोबर राहशील? या वेळी खरी परिक्षा तुझी आहे रे बाबा. तुझी वारी आहे त्या लाखो लोकांतल्या खऱ्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची.

खरं सांगू च्यायला गाडीतून आरामात पंढरपूर गाठणाऱ्या मलाही पार अस्वस्थ होतंय. काय नाय पण आषाढीला पंढरपूरात होतो म्हटलं की आताशा मलाही थोडं तरतरीत वाटतं आणि काय तरी उर्जा संचारते अंगात. कसली तरी प्रेरणा मिळते. पण तुला पहायची नसते ती ओढ. मला तुझ्यापेक्षा तुझ्या दारात तुझ्या ओढीने आलेले ते फाटके, घामट वारकरी गुंगवून टाकतात, भन्नाट वाटत. सॉरी!  पण हेच खरं आहे. ते मोठमोठ्या पालख्यांबरोबर येणारे, पालखी तळावर राहणाऱ्या वारकऱ्यांपेक्षा काही माणसं जमून आपली आपण अरेंजमेट करुन स्वत:ची दिंडी करुन येतात त्या वारकऱ्यांचं मला कौतुक वाटतं. त्या पालखी सोहळ्यात त्यांचा तसा काय मान-पान नाही. पण वेड्या आशेने त्या पंढरपुरात पोहोचले की त्यांची देवळसमोर उभी राहून जी मान उंचावते, डोळे भरुन येतात आणि विठ्ठल-विठ्ठल  म्हणत ते ज्या काही कान धरून उड्या मारतात मला वाटतं अरे हे प्रेम मिळवायला मी विठ्ठल असायला हवं होतं. तो तसला आनंद मी आईला बघितल्यावर बाळाच्या चेहऱ्यावर पाहिलाय. बस्स त्या निरागस, भोळ्या, वेड्या आनंदाची मी फॅन आहे.  तुझ्या आशेने आलेल्या आणि तुझ्यासाठी डोळ्यात पाणी आणून बघणाऱ्या त्या वारकऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी नातं वाटतं मला. पण, तुझ्यापेक्षा त्याचं कौतुक भारी वाटतं.

मला वाटतं यंदा तुला तेज नसेल. सगळी पूजा अर्चा केली, छान, साज कपडे चढवले तरी ते नसेलच. ते तुझ्या चेहऱ्यावरच तेज आलंच कुठेय पंढरपुरात.  लाखो वारकरी आणि भक्तांच्या मेहनतीचं तेज तुझ्या पायापर्यंत पोहोचलंच नाही. तर तुझा काळा चेहरा तेजाने उजळून कसा निघेल?

जसे आम्ही तुला मिस करतोय तसा तू तुझ्या भेटीच्या वेड्या आशेने पंढरपुराकडे धावणाऱ्या अध्यात्माचं ज्ञान नसलेल्या पण नसानसातून तुझी भक्ती भिनलेल्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना मिस करतोयस ना? करतच असशील.... मला माहितेय तू त्या षोडशोपचार आणि नैवेद्यासाठी थांबणारा थोडी ना आहेस... असशील कुठे तरी बांधावर शेतकऱ्याबरोबर, रुग्णाची सेवा करत, नाहीतर झोपडीतल्या तुझ्या लेकराबरोबर... मस्त आनंदात...

Sunday, June 14, 2020

सुशांत सिंगच्या निमित्ताने...




(मी डॉक्टर नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर जे जे मेंदूत रेंगाळू लागलं मी ते शब्दात उतरवलं. तेव्हा हे असंच असतं वगैरे काही नाही. विचार मांडलेय. त्यावर विचार होऊ शकतो व्हायला हवा. तेव्हा वाचा आणि विचार करा. कृपया डिप्रेशनमध्ये असाल तर सल्ला, मदत मात्र जाणकाराची घ्या. मी एका मतावर ठाम आहे ते म्हणजे आत्महत्या न करण्यावर’. हा विचार फाट्यावर मारायला शिकलेला माणूस हुशार असतो असं मला वाटतं.)    
अरे तो असं काही करेल असं वाटलं नव्हतं !
काल-परवा बोलला रे... काय टेन्शनमध्ये वगैरे वाटला नाही...
काही काय, काल तर हसत होता. अरे आम्ही पार्टी केली. आज काय टेन्शन आलंय म्हणून सांगतोय.  
त्याला कसलं आलंय टेन्शन त्याच्याकडे भरपूर आहे. त्याचं सगळं मस्त चाललंय.
आत्महत्या कर मेल्या. एवढ्याशा गोष्टीवर रडतोस काय
कसलं दुःख रे... दररोजचे फोटो टाकतोय... सेल्फ्या बघ त्याच्या.
अशी वाक्य आपण बोललोय का कोणाला कधी? नक्की आठवा... कारण हेच भविष्यातले सुशांत आहेत. असू शकतात.
त्यानंतर पुन्हा हळहळ व्यक्त करुन आपण मोकळे होऊ. किंवा कदाचित त्यातून कधीच बाहेर पडणार नाही. खोल आतल्या काळोखात कुठून तरी ते दुःख, ती बोच मध्येच खुडखुड करत राहील.
माणसं बेटं झालीत. कळपात राहणारी स्वतंत्र बेट. खोलवर आत मनाच्या तळातलं वादळ दिसत नाही किंवा लोकांना ते दाखवायचं नसतं.  आपल्याला दिसलं तरी आपल्याला त्याची बोच जाणवत नसते. त्याचं दुःख आपण पाहिलेलं असतं पण कन्फर्म न झाल्यामुळे आपण विचारत नाही. किंवा एकदा त्याने टाळलं तर आपण त्या माणसाशी त्या विषयावर बोलत नाही. ‘To maintain privacy, space.’ असं एक आधुनिक उत्तर त्यासाठी आपल्याकडे असतं.
दुःखाची आणि सुखाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी आहे. म्हणून मग, एखाद्याचं दुःख आपल्यापर्यंत पोहोचत नाही. किंवा मग असंही असू शकत की ते आपल्यापर्यंत आपल्याला हवं तसं किंवा कळेल असं पोहोचत नाही. म्हणून मग आपण त्याला दुःख मानत नाही. म्हणजे असं की एखाद्याचं दुःखही  दुःख वाटावं असं पॅकेजिंगमध्ये समोर आलं पाहिजे. तसं नाही आलं तर लोकाचंचं कशाला आपलंही दुःख आपल्यापर्यंत पोहोचत नाही. डिप्रेशन आलंय, येतंय किंवा डिप्रेशन आपल्या मनात, मेंदूत शिरु पाहतंय हे आपल्याला कळतच नाही. मनातलं दुःख ओळखण्यासाठी आपण काही डॉक्टर नसतो. हे जरी खरं असलं तरी माणसाचं काहीतरी बिनसलंय हे समजू न शकण्याइतपत आपल्या भावना यंत्रवत झाल्या आहेत का? आपण माणसं वरवर जोडतो ? जर ते तसं असेल तर आपलंही दुःख कोणाला कळणार नाही. आपणही आपल्या एकटेपणात भरकटून जाऊ.
जसं मी आधी म्हटलं दुःखाची आणि सुखाची कल्पना प्रत्येकाची वेगळी असते. त्या व्यक्तीच्या कल्पनेतून त्याचं दुःख किंवा सुख आपल्याला कळून घेतलं पाहिजे.   
सुखाचंही तसंच आहे ना. सुखाची कल्पना वस्तू, व्यक्ती,  स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या अपयशाशी जोडलेली असेल तर मग सुख दूर दूरच पळत राहील. ते सुख स्वतःत शोधलं तर एकटेपणाही सोबत करु लागेल. ज्या क्षणात आहात तो क्षण जगा. मग तो आनंद देणारा असेल तर आनंद उपभोगा. त्रास देणारा असेल तर त्रास करुन घ्या. दुःख पण उपभोगा. पण त्यानंतर नाक शिंकरुन, घसा खाकरुन आणि डोळे पुसून पुन्हा पुढच्या क्षणात प्रवेश करा.
 मला वाटतं जसं खळखळून हसा सांगतो लोकांना तसंच रडून घे रे पोटभर असंही सांगा.  सुखाचा पुरेपुर आनंद घ्या. तसाच दुःखाचे क्षणही जगून घ्या. नाहीतर मनाला दुःखाचं अवडंबर माजवायची सवय होऊन जाते. मग त्याचं ओझं वाटायला लागतं आणि हळू हळू त्यात दबून जायला होतं. सुख आणि दुःख दोन्हींचा निचरा केला की गच्च भरलेल्या त्या त्या भावनेच्या पेल्याला थोडी टिचकी किंवा धक्का लागतो. मग त्यात थोडी जागा किंवा पोकळी निर्माण होते. भावना पचण्याची. जसं जेवण पचण्यासाठी एक पोकळी लागते ना. तशीच.  तुडूंब जेवलं की उलटी होते किंवा मळमळतं आणि उलटी झाल्यानंतर थोडं बर वाटतं अगदी तसंच भावनांच्या साचलेपणाचा गाळ वरच्यावरच अलगद काढून टाकला पाहिजे.   
Be strong, enjoy your own company, try to get engaged in something असे सल्ले आपण भरपूर देतो. आपल्यालाही मिळतात. पण म्हणजे काय हे आपल्याला कोणालाच माहित नसतं. बरं ते आपण लोकांना सल्ले देतो बोल अरे कोणाशी तरी म्हणजे काय? बोलून असं मनातलं दुःख हलकं होतं? किंवा कोणी जवळ घेतलं. मिठी मारली, डोक्यावरुन हात फिरवला तर दुःख गायब होतं. लोक तुमच्यासोबत आहेत असं वाटतं? या प्रश्नानंतर तुमच्या डोक्यात जे उत्तर येईल. म्हणजे मला वाटतं ते म्हणजे तुमच्या दुःखात लोकांना
ते आपल्याच लाळेने आपली जखम बरी करा वगैरे काही सांगतात ना... तसं काहीतरी आपल्या दुःखाचं असतं आपल्या आतच त्याचं मलम असतं ते वेळच्या वेळी प्रोड्यूस करुन हळूच त्या दुःखाच्या जखमेवर लावत रहायचं. बाहेरुन इतरांनी कितीही फुंकरा घातल्या तरी त्याने आपली दुःखाची जखम बरी होत नाही. असं मला वाटतं. तेव्हा स्वतःचं दुःख बरं करण्याची ताकद तुमच्यातच आहे लक्षात ठेवा...