(मी डॉक्टर नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर जे जे मेंदूत
रेंगाळू लागलं मी ते शब्दात उतरवलं. तेव्हा हे असंच असतं वगैरे काही नाही. विचार
मांडलेय. त्यावर विचार होऊ शकतो व्हायला हवा. तेव्हा वाचा आणि विचार करा. कृपया
डिप्रेशनमध्ये असाल तर सल्ला, मदत मात्र जाणकाराची घ्या. मी एका मतावर ठाम आहे ते
म्हणजे ‘आत्महत्या न करण्यावर’. हा विचार फाट्यावर मारायला शिकलेला माणूस
हुशार असतो असं मला वाटतं.)
अरे तो असं काही करेल असं वाटलं नव्हतं !
काल-परवा बोलला रे... काय टेन्शनमध्ये वगैरे वाटला नाही...
काही काय, काल तर हसत होता. अरे आम्ही पार्टी केली. आज
काय टेन्शन आलंय म्हणून सांगतोय.
त्याला कसलं आलंय टेन्शन त्याच्याकडे भरपूर आहे. त्याचं
सगळं मस्त चाललंय.
आत्महत्या कर मेल्या. एवढ्याशा गोष्टीवर रडतोस काय
कसलं दुःख रे... दररोजचे फोटो टाकतोय... सेल्फ्या बघ
त्याच्या.
अशी वाक्य आपण बोललोय का कोणाला कधी? नक्की आठवा... कारण हेच भविष्यातले सुशांत
आहेत. असू शकतात.
त्यानंतर पुन्हा हळहळ व्यक्त करुन आपण मोकळे होऊ. किंवा
कदाचित त्यातून कधीच बाहेर पडणार नाही. खोल आतल्या काळोखात कुठून तरी ते दुःख, ती
बोच मध्येच खुडखुड करत राहील.
माणसं बेटं झालीत. कळपात राहणारी स्वतंत्र बेट. खोलवर आत
मनाच्या तळातलं वादळ दिसत नाही किंवा लोकांना ते दाखवायचं नसतं. आपल्याला दिसलं तरी आपल्याला त्याची बोच जाणवत
नसते. त्याचं दुःख आपण पाहिलेलं असतं पण ‘कन्फर्म’ न
झाल्यामुळे आपण विचारत नाही. किंवा एकदा त्याने टाळलं तर आपण त्या माणसाशी त्या
विषयावर बोलत नाही. ‘To
maintain privacy, space.’ असं एक आधुनिक उत्तर त्यासाठी आपल्याकडे
असतं.
दुःखाची आणि सुखाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी आहे.
म्हणून मग, एखाद्याचं दुःख आपल्यापर्यंत पोहोचत नाही. किंवा मग असंही असू शकत की
ते आपल्यापर्यंत आपल्याला हवं तसं किंवा कळेल असं पोहोचत नाही. म्हणून मग आपण
त्याला दुःख मानत नाही. म्हणजे असं की एखाद्याचं दुःखही दुःख वाटावं असं ‘पॅकेजिंगमध्ये’ समोर आलं पाहिजे. तसं नाही आलं तर लोकाचंचं
कशाला आपलंही दुःख आपल्यापर्यंत पोहोचत नाही. डिप्रेशन आलंय, येतंय किंवा डिप्रेशन
आपल्या मनात, मेंदूत शिरु पाहतंय हे आपल्याला कळतच नाही. मनातलं दुःख ओळखण्यासाठी
आपण काही डॉक्टर नसतो. हे जरी खरं असलं तरी माणसाचं काहीतरी बिनसलंय हे समजू न
शकण्याइतपत आपल्या भावना यंत्रवत झाल्या आहेत का? आपण माणसं वरवर जोडतो ? जर ते तसं असेल तर आपलंही दुःख कोणाला कळणार
नाही. आपणही आपल्या एकटेपणात भरकटून जाऊ.
जसं मी आधी म्हटलं दुःखाची आणि सुखाची कल्पना
प्रत्येकाची वेगळी असते. त्या व्यक्तीच्या कल्पनेतून त्याचं दुःख किंवा सुख
आपल्याला कळून घेतलं पाहिजे.
सुखाचंही तसंच आहे ना. सुखाची कल्पना वस्तू,
व्यक्ती, स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या
अपयशाशी जोडलेली असेल तर मग सुख दूर दूरच पळत राहील. ते सुख स्वतःत शोधलं तर
एकटेपणाही सोबत करु लागेल. ज्या क्षणात आहात तो क्षण जगा. मग तो आनंद देणारा असेल
तर आनंद उपभोगा. त्रास देणारा असेल तर त्रास करुन घ्या. दुःख पण उपभोगा. पण
त्यानंतर नाक शिंकरुन, घसा खाकरुन आणि डोळे पुसून पुन्हा पुढच्या क्षणात प्रवेश
करा.
मला वाटतं जसं खळखळून
हसा सांगतो लोकांना तसंच रडून घे रे पोटभर असंही सांगा. सुखाचा पुरेपुर आनंद घ्या. तसाच दुःखाचे क्षणही
जगून घ्या. नाहीतर मनाला दुःखाचं अवडंबर माजवायची सवय होऊन जाते. मग त्याचं ओझं
वाटायला लागतं आणि हळू हळू त्यात दबून जायला होतं. सुख आणि दुःख दोन्हींचा निचरा
केला की गच्च भरलेल्या त्या त्या भावनेच्या पेल्याला थोडी टिचकी किंवा धक्का
लागतो. मग त्यात थोडी जागा किंवा पोकळी निर्माण होते. भावना पचण्याची. जसं जेवण
पचण्यासाठी एक पोकळी लागते ना. तशीच. तुडूंब जेवलं की उलटी होते किंवा मळमळतं आणि
उलटी झाल्यानंतर थोडं बर वाटतं अगदी तसंच भावनांच्या साचलेपणाचा गाळ वरच्यावरच
अलगद काढून टाकला पाहिजे.
Be strong,
enjoy your own company, try to get engaged in something असे सल्ले आपण भरपूर
देतो. आपल्यालाही मिळतात. पण म्हणजे काय हे आपल्याला कोणालाच माहित नसतं. बरं ते
आपण लोकांना सल्ले देतो ‘बोल अरे कोणाशी तरी’ म्हणजे काय? बोलून असं मनातलं दुःख हलकं होतं? किंवा कोणी जवळ घेतलं. मिठी मारली,
डोक्यावरुन हात फिरवला तर दुःख गायब होतं. लोक तुमच्यासोबत आहेत असं वाटतं? या प्रश्नानंतर तुमच्या डोक्यात जे उत्तर
येईल. म्हणजे मला वाटतं ते म्हणजे तुमच्या दुःखात लोकांना
ते आपल्याच लाळेने आपली जखम बरी करा वगैरे काही सांगतात
ना... तसं काहीतरी आपल्या दुःखाचं असतं आपल्या आतच त्याचं मलम असतं ते वेळच्या
वेळी प्रोड्यूस करुन हळूच त्या दुःखाच्या जखमेवर लावत रहायचं. बाहेरुन इतरांनी कितीही फुंकरा घातल्या तरी त्याने
आपली दुःखाची जखम बरी होत नाही. असं मला वाटतं. तेव्हा स्वतःचं दुःख बरं करण्याची ताकद तुमच्यातच आहे लक्षात ठेवा...

No comments:
Post a Comment