हो ना रे? तशी तुझी वारी लॉकडाऊन नंतरच सुरू झाली होती. लाखो पावलांनी तू चालत चालत कुठे कुठे काना कोपऱ्यात पोहोचत होतास. त्या कष्टकऱ्यांच्या खोपटातल्या गाभाऱ्याकडे निघाला होतास. भूकेला होतास, तहानलेला होतास. ते विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हते की ज्ञानोबा- तुकाराम म्हणणारे नव्हते. पण ती तुझीच लेकरं होती. जी भूक-तहानेने घराच्या ओढीने निघाली होती, लेकरा-बाळांसह. मला माहितेय. तू त्यांच्याबरोबर चालत होतास. दमला होतास. लाखो लोकांसाठी तुझा जीव पण कसनुसा झाला असेल. मग तू थोडी गाभाऱ्यात उभा राहशील?
त्यानंतर तर तुझ्यावर आभाळच कोसळलं. कारण सरकारने वारीच कॅन्सल केली कोरोनामुळे. एक नोटिफिकेशन, एक नियम म्हण नाहीतर म्हण सरकारी कारवाई. पण, तुला हृदयात, डोळ्यात साठवून पंढरपूरकडे निघालेली तुझी वेडी लेकरं घरातच कोंडून राहिली त्याने. म्हणून मग तुझीही कोंडी झाली. वारीत विठ्ठल दिसतो म्हणतात. पण कोणाला दिसायला, भेटायला, मदत करायला तुला कुठे वारीत जाता येणार ना? माहितेय शेतात राबणाऱ्या, पावसाची वाट बघणाऱ्या आणि वारीच्या आठवणीत रंगलेल्या वारकऱ्याला तू भेटला असशील. तसाच ना जसा सावता माळी आणि गोरा कुंभाराला भेटायला पंढरपूर सोडून गेला होतास अगदी तस्सा... कोण कोणत्या रुपात गेलाच असशील. तस्सा तू लबाड आहेस. पण नक्कीच त्यांचं असं सगळ्या बाजूने कोंडलेलं जगणं तुलाही अस्वस्थ करणारंच वाटलं असेल ना?
वारीच्या त्या 12-15 दिवसात पालख्यांच्या प्रस्थानापासून वारकऱ्यांच्या हृदयात टाळ-मृदूंगाचा गजर निनादतच असेल रात्रं -दिवस. त्यावर इतके दिवस त्यांनी कसं बसं निभावलंही असेल. पण, उद्या कसं काय होईल तुझ्या या वेड्या लेकरांचं रे? तुझा कळस, ती नामदेव पायरी, नुसता मंदिरावरच्या पताकात तू त्यांना दिसणं, सोललेल्या मांड्या आणि भेगाळलेल्या पायांनी तिष्ठत तासन तास रांगेत उभं राहून फक्त तुझ्या गाभऱ्यासमोर पाय टेकवून सुरक्षा रक्षकांकडून भिरकावून, ढकलून दिल्याचं दु:ख, जाणीवही नसणं, तुझ्या मुकुटाचा, हाताचा, नाहीच तर गळ्यातल्या हाराच्या ओझरत्या दर्शनासाठी सेकंदाच्या 100 व्या भागाचा जो काही काळ असेल तेवढा पण ज्यांच्या नशिबात तासंन तास रांगा लावल्यावर येत नाही ते तुझे घामेजलेले, थकलेले, रापलेले, फाटक्या खिशाचे मळक्या कपड्याचे वारकरी कसे रे राहतील तुझ्या दर्शनाशिवाय? डोळ्यात आसवं जमली असतील त्यांच्या. गळ्यात आवंढा दाटला असेल. तू त्यांची आशा, प्रेरणा आहेस पांडुरंगा. जग भ्रमंतीपेक्षा वेगळा अनुभव देणारा वारीच्या वाटेवरचा तुझा तो सहवास त्यांना मिळाला नाहीच. पण तू पण दिसणार नाहीस म्हणून त्यांना आषाढी वाटणारच नाही. यंत्रवत उपास,वगैरे होईलच त्यात तू असशीलच पण तू कसा रे सगळ्यांबरोबर राहशील? या वेळी खरी परिक्षा तुझी आहे रे बाबा. तुझी वारी आहे त्या लाखो लोकांतल्या खऱ्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची.
खरं सांगू च्यायला गाडीतून आरामात पंढरपूर गाठणाऱ्या मलाही पार अस्वस्थ होतंय. काय नाय पण आषाढीला पंढरपूरात होतो म्हटलं की आताशा मलाही थोडं तरतरीत वाटतं आणि काय तरी उर्जा संचारते अंगात. कसली तरी प्रेरणा मिळते. पण तुला पहायची नसते ती ओढ. मला तुझ्यापेक्षा तुझ्या दारात तुझ्या ओढीने आलेले ते फाटके, घामट वारकरी गुंगवून टाकतात, भन्नाट वाटत. सॉरी! पण हेच खरं आहे. ते मोठमोठ्या पालख्यांबरोबर येणारे, पालखी तळावर राहणाऱ्या वारकऱ्यांपेक्षा काही माणसं जमून आपली आपण अरेंजमेट करुन स्वत:ची दिंडी करुन येतात त्या वारकऱ्यांचं मला कौतुक वाटतं. त्या पालखी सोहळ्यात त्यांचा तसा काय मान-पान नाही. पण वेड्या आशेने त्या पंढरपुरात पोहोचले की त्यांची देवळसमोर उभी राहून जी मान उंचावते, डोळे भरुन येतात आणि विठ्ठल-विठ्ठल म्हणत ते ज्या काही कान धरून उड्या मारतात मला वाटतं अरे हे प्रेम मिळवायला मी विठ्ठल असायला हवं होतं. तो तसला आनंद मी आईला बघितल्यावर बाळाच्या चेहऱ्यावर पाहिलाय. बस्स त्या निरागस, भोळ्या, वेड्या आनंदाची मी फॅन आहे. तुझ्या आशेने आलेल्या आणि तुझ्यासाठी डोळ्यात पाणी आणून बघणाऱ्या त्या वारकऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी नातं वाटतं मला. पण, तुझ्यापेक्षा त्याचं कौतुक भारी वाटतं.
मला वाटतं यंदा तुला तेज नसेल. सगळी पूजा अर्चा केली, छान, साज कपडे चढवले तरी ते नसेलच. ते तुझ्या चेहऱ्यावरच तेज आलंच कुठेय पंढरपुरात. लाखो वारकरी आणि भक्तांच्या मेहनतीचं तेज तुझ्या पायापर्यंत पोहोचलंच नाही. तर तुझा काळा चेहरा तेजाने उजळून कसा निघेल?
जसे आम्ही तुला मिस करतोय तसा तू तुझ्या भेटीच्या वेड्या आशेने पंढरपुराकडे धावणाऱ्या अध्यात्माचं ज्ञान नसलेल्या पण नसानसातून तुझी भक्ती भिनलेल्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना मिस करतोयस ना? करतच असशील.... मला माहितेय तू त्या षोडशोपचार आणि नैवेद्यासाठी थांबणारा थोडी ना आहेस... असशील कुठे तरी बांधावर शेतकऱ्याबरोबर, रुग्णाची सेवा करत, नाहीतर झोपडीतल्या तुझ्या लेकराबरोबर... मस्त आनंदात...

No comments:
Post a Comment