Sunday, November 28, 2010

मुलींना दिलासा देणारी ‘सुकन्या’

हर्षदा परब
मुंबई, दि. २८ - स्त्री अर्भकांचा मृत्यू रोखण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी सुकन्या योजना आणण्याचा विचार महिला व बालविकास विभागातर्फे सुरू आहे. ११४ कोटी रुपयांची ही योजना असून अर्थ मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवताच महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या योजनेचा आराखडा तयार असून अर्थ मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. या योजनेनुसार बीपीएल कुटुंबात मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावे सरकारतर्फे पाच हजार रुपये जमा करण्यात येतील. मुलीच्या अठराव्या वर्षानंतर तिला हे पाच हजार रुपये व्याजासह देण्यात येतील. परंतु त्यासाठी अठरा वर्षांपर्यंत मुलगी अविवाहित असणे आणि तिचे १२ वी पर्यंतचे किमान शिक्षण असावे अशी अट घालण्यात येणार आहे.
महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनीही अशा तर्‍हेच्या योजनेचा विचार सुरू असल्याचे मान्य केले आहे. आजही स्त्री भ्रुण हत्येचे प्रमाण मोठे आहे. तसेच अपुर्‍या आहारामुळे आजही मुलींचा मृत्यू होतो. जन्मलेली मुलगी कुटुंबावर भार होते आणि तिचा वापर घरातील काम करण्यासाठी होतो. परिणामी मुली शिक्षणापासून वंचित राहतात. या सर्वाचा विचार करून ही योजना आणण्यासाठी महिला व बालविकास मंत्री या नात्याने त्या उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

योजनेच्या काही अटी
* मुलगी ही पालकाचे पहिले किंवा दुसरे अपत्य असावे
* दुसर्‍या अपत्यावेळी जुळ्या मुली झाल्यास दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल
* मुलगी १८ व्या वर्षापर्यंत अविवाहित असावी
* मुलीचे किमान शिक्षण १२ वी असावे

1 comment:

  1. maharashtrat asha kaydyachi nitant garaj ahe avghya bhartat stri shikshnacha paya ghatta rovnyachimuhurtmedh pratham savitribai phule jyotiba phule maharshi karveni rovli.tyamule stri arbhak mrutuche praman rokhnyasathi ek nava krantikari vicharache parv maharashtrat suru hoil. ashach prakarchi upay yojana mayavati sarkarne up madhye rabvili ahe.

    ReplyDelete