वाचायला लहान पणापासून खुप आवडायचं. आठवतंय खुप वाचायचे. आजूबाजूला काय घडतंय याचं भान नसायचं. पुस्तक हातात घेऊन एका जागी बसले की संपला विषय. मग पुस्तक संपेपर्यंत उठायचं नाही.
शाळेतली पुस्तक हातात आली की वाचून पूर्ण. गंमत म्हणजे एका वाचनात धडा पाठ होऊन जायचा. दोन-तीन वाचनानंतर कुठली ओळ कितव्या पानावर कुठल्या पॅराग्राफमध्ये आहे, लेखक कोण वगेरे सगळं पाठ व्हायचं. या वाचनामुळेच चेव्हा माझा शाळेत पहिल्या पाचात नंबर होता. तेव्हा पुस्तक विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. शाळेची पुस्तकही इतरांपेक्षा उशीराच मिळायची. पण वाचायला इतकं आवडायचं की आईची हाक आणि पोटातल्या कावळ्यांचा कालवा काहीच लक्षात यायचं नाही. आठवतंय. तेव्हा आई हाकेला ओ दिली नाही किंवा सारखी वाचत बसले की मला झाडूने मारायची. चष्मा लागेल या भितीने ते ओराडाओरड करायची माझ्या कानावर पडलं नाही की ऐकू येण्यासाठी ती हा उपचार करायची. पुढे तिच्या आणि बाबांच्या मेहनतीनचे शिक्षण शक्य झालं.
वाचनासाठी शाळा मला परवडायची. मी गिरगावातल्या एस.एल.अॅण्ड एस.एस.गर्ल हायस्कूल शाळेत शिकायचे. पाचवी अ च्या वर्गासमोर शाळेची लायब्ररी होती. मधल्या सुट्टीत तिथे बसणाऱ्या ग्रंथपाल बाईंकडे जाऊन पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. तेव्हा आठवड्याला एक पुस्तक मिळायचं. म्हणजे त्या आधी वाचून झाल तर दुसरं पुस्तक घेता यायचं. पुस्तक घ्यायला येणाऱ्या मुलींवर त्यांचा विशेष जीव. पुस्तकं सुचवायच्या, हवं असलेलं पुस्तक दुसऱ्याला दिलं असेल तर आठवणीने ते परत आलं की बाजूला ठेवायच्या. कधी उशीर झाला पुस्तक द्यायला तर त्या ज्यांना दंड भरणं शक्य नाही अशा मुलींना रागवून सोडून द्यायच्या. मी त्यातली एक होते. त्यांचा चेहरा आजही डोळ्यासमोर आहे. पण नाव आठवत नाही. नाव लक्षात ठेवण्यात मी थोडी कमजोर आहे.
प्रत्येक वर्गात एक पेटी होती. हिरव्या रंगाची लोखंडी पेटी. ऑफ पिरिएड (शिक्षक नसतील तो तास)त्या पेटीतली पुस्तक वाचायला दिली जात. वर्गातला मॉनिटर किंवा प्रिफेक्ट ती पुस्तक वाटायचा तो तास संपला की पुस्तक परत घेतली जायची. कधी घरी पण द्यायचे.
शाळेत असतानाच आमच्या वाडीत (कामत चाळीत ) राहणाऱ्या एका मुलाने त्याचा पुस्तक संग्रह सर्वांसाठी खुला केला. घरगुती लायब्रकी वगैरे. आठवड्याला एक रुपया भरुन तो पुस्तक द्यायचा. मी पुस्तक घेतलं की अर्ध्या एक तासाने ते पुस्तक परत करायचे. मिळेल ती पुस्तक एका दिवसात दोन - तीन वगैरे पुस्तकं वाचायचे. एक दिवस परिक्षा संपल्यानंतर मी पुस्तक आणायला गेले. तर त्याने पुस्तक दिलं नाही. म्हणाला आईने सांगितलंय पुस्तक द्यायचं नाही. बस मग पुन्हा त्याच्याकडे पुस्तक मागायला गेले नाही.
विल्सन कॉलेजमध्ये गेले आणि विल्सनची मोठी लायब्ररी पाहून वेडावून गेले. पण माझ्या आवडीची मराठी पुस्तक तिथे फार नव्हती. तरी माझ्या शिक्षिकांच्या कृपेने लायब्ररीयन माझ्यासाठी पुस्तक राखून ठेवत. कॉलेजमधल्या माझ्या प्रोफेसर तारकर बाई खास पुस्तकांची यादीसुद्ध द्यायच्या. या काळात श्री.ना.पेंडसे, जयवंत दळवी, भाऊ पाध्ये अशा
लेखकांची ओळख झाली. तेव्हा वाचलेलं आणि आजही आठवणारं पुस्तक म्हणजे नॉट विदाऊट माय डॉटर. गार्गी अजून जीवंत आहे (मंगला आठलेकर लेखिका), रारंगढांग आणि माणसं. त्यानंतरच्या काळात म्हणजे जर्नलिझमला असताना वाचलेल्या पुस्तकांपैकी ही वाट एकटीची, हे दुःख कोण्या जन्मीचे (समलैंगिक विचारांवर प्रकाश टाकणारे), तू भ्रमत आहासी वाया. इंग्रजी जे वाचलं त्यातलं लक्षात राहणार पुस्तक म्हणजे ट्युसडे विथ मॉरीस.
लेखकांची ओळख झाली. तेव्हा वाचलेलं आणि आजही आठवणारं पुस्तक म्हणजे नॉट विदाऊट माय डॉटर. गार्गी अजून जीवंत आहे (मंगला आठलेकर लेखिका), रारंगढांग आणि माणसं. त्यानंतरच्या काळात म्हणजे जर्नलिझमला असताना वाचलेल्या पुस्तकांपैकी ही वाट एकटीची, हे दुःख कोण्या जन्मीचे (समलैंगिक विचारांवर प्रकाश टाकणारे), तू भ्रमत आहासी वाया. इंग्रजी जे वाचलं त्यातलं लक्षात राहणार पुस्तक म्हणजे ट्युसडे विथ मॉरीस.
गरोदरपणात भरपूर छोटी पुस्तक वाचली त्यामध्ये जिजाबाई, बाबा आमटे, यशवंतराव चव्हाण, शिवाजी, व्ही. राधाकृष्णन यांची माहिती देणारी छोटी पुस्तक आणि नापास मुलांच्या गोष्टी तसंच हाती ज्यांच्या शून्य होते.
काही महिन्यांपूर्वी वाचलेली पुस्तक म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर झीरो आणि शिवाजी कोण होता.
भावाने मला दिलेलं सिक्रेट आणि पॉवर ही दोन पुस्तक चाळली फक्त पण बरंच शिकले त्यातून.
आता पुस्तक विकत घेता येतं पण खंत आहे ते सलग वाचायला मिळत नाही. हल्ली वाढदिवसालाही कोणी पुस्तक भेट देत नाही याची असो. पव वाचत राहीन आयुष्यभर.


No comments:
Post a Comment