Tuesday, February 28, 2017

तिची जिद्द जगण्यासाठी, जगविण्यासाठी...




















                                                                                    शब्बो



हर्षदा परब
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. 27: आईवर अॅसिड हल्ला झाला. त्यावेळी आईच्या मांडीवर असलेल्या अडीच वर्षांच्या शब्बो शेखवरही अॅसिड पडलं. तिची मानेपर्यंतची त्वचा जळाली. त्या घटनेनंतर तिने आई, कुटूंब सारं काही गमावलं. जिद्दीने जगणाऱ्या शब्बोला आता अॅसिड सर्व्हायवर्ससाठीच्या साहस फाउंडेशन संस्थेला मोठं करायचं आहे आणि अॅसिड सर्व्हायवर्सना त्यांचा हक्क, उपचार मिळावेत म्हणून काम करायचं आहे. 

अॅसिड हल्ल्यानंतर छोट्याशा शब्बोवर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार झाले. कुटूंब गमावलेल्या चार वर्षांच्या शब्बोला नियमबाह्य (रुग्णाला उपचारांशिवाय ठेवता येत नाही) पद्धतीने रुग्णालयात आश्रय देण्यात आला. नंतर, तिला सरकारी आश्रमात ठेवलं. त्यानंतर पुढे श्री मानवसेवा संघ या खासगी आश्रमात ती वाढली. मानवसेवा आश्रमाने पंखांना बळ आणि जगण्याला स्वप्न दिली असं शब्बो सांगते. त्यांच्या मदतीने शब्बोने बीसीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 68 टक्क्यांनी पास झालेल्या शब्बोला नोकरी मिळाली. तिने आश्रमातून बाहेर पडून स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नोकरी गेल्याने तिच्यावर आभाळ कोसळलं. हॉस्टेलवरच्या रुममेट ललिता गोमाने हिने शब्बोला वर्षभर मदत केली. या वर्षभरात शब्बोच्या कामाच्या अनुभवावर आणि गुणांवर तिला अनेक नोकऱ्यांचे कॉल आले. इण्टरव्ह्यूला चेहरा पाहून अनेकांनी नाकारलं. हे पहिल्यांदा झालं नव्हतं. शाळेतल्या मुलांना या चेहऱ्याची सवय होती म्हणून फार त्रास झाला नाही. कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र, विश्व बदललं. सर्वांनी नाकारलं, टाकलं, थट्टा केली. तेव्हा अभ्यासावर आणि गुणांवर परिणाम झाला होता. त्यावेळी क्रिना गांधी या आश्रमात येणाऱ्या शिकवणी शिक्षिकेने  'ध्येयावर लक्ष केंद्रीत कर' असा सल्ला दिला. त्या सल्ल्याने आयुष्यभराची शिकवण दिली. त्यानंतर डगमगले नाही असं शब्बो सांगते. 
खासगी आणि सरकारी बँकांकरीता क्रेडिट कार्डाच्या सेल्ससाठी काम करणाऱ्या स्कॉट कन्सल्टन्सी या प्रिती ठाकर अरोरा यांच्या कंपनीत शब्बो बॅक ऑफिस एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करते. कंपनीत 20 टक्के जागा अॅसिड सर्व्हायवर आणि शारिरीकदृष्ट्या विशेष व्यक्तींसाठी असल्याने ही नोकरी मिळाल्याचं शब्बो सांगते. रोजगार असला तरी खासगी कंपनीत, उपचारांसाठी घ्याव्या लागणाऱ्या सुट्ट्यांचा पगार कापला जातो. ती खंत व्यक्त करते.  
तिच्या चेहऱ्याची त्वचा मानेपर्यंत जळली आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा डावा डोळा पूर्ण निकामी झाला आहे. तिला अन्न गिळायलाही त्रास होतो. न केलेल्या गुन्ह्याची आयुष्यभर शिक्षा भोगणार नाही या निश्चयाने बालपण हिरावून घेणाऱ्या त्या घटनेचा पाठपुरावा शब्बोनो सुरू केला आहे. शब्बो सचिव असलेल्या अॅसिड सर्व्हायवर्स साहस फाउंडेशन या संस्थेच्या प्रमुख दौलतबी खान यांनी शब्बोच्या केसची एफआयआर कॉपी मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. एफआयआरची कॉपी हातात मिळाल्यावर स्वतःच्या हक्कांसाठी लढणार असं शब्बो सांगते. स्वतःच कुटूंब, आई गेल्यावर हॉस्पिटलमध्येही न परतलेले बाप, आयुष्यभरासाठी जखमा देणारा अॅसिड अटॅकर या सर्वांचा काय झालं ते जाणून घेणार असं ती सांगते.
 


'पाच महिन्यांपासून एक एफआयआरची कॉपी शोधतो आहोत. माहितीचा अधिकार, पोलिस स्टेशनमधील चकरांनतर फक्त एफआयआर नंबर आणि हल्लेखोराचं नाव एवढचं हाती लागल्याचं दौलतबी सांगते. नवऱ्याने सोडून दिलेल्या, तीन मुलांची एकल माता असलेल्या दौलतबीने शब्बोला तिच्या घरात ठेवून घेतलं आहे. पैसे भरुनही भाड्याचं घर मिळत नाही. रस्त्यावर राहता येत नाही म्हणून हा हक्काचा पर्याय असं शब्बो हसत सांगते. 

योगायोग
सेहतर्फे आयोजित एका परिषदेत शब्बोची केस सायन रुग्णालयाच्या बर्न विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. माधवी गोरे यांनी सादर केली. त्यावेळी त्या परिषदेत शब्बो असल्याचं त्यांना माहित नव्हतं. ही भेट एक योगायोग असल्याचं शब्बो सांगते.   

आज मुख्यमंत्री बंगल्यावर होत्या त्या
अमृता फडणवीस आयोजित करत असलेल्या फॅशन शो मध्ये शब्बो आणि दौलतबी सहभागी होणार आहे. 5 मार्च रविवारी होणाऱ्या या फॅशन शोसाठी त्या दोघी उत्सुक आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चहा प्यायल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. मात्र हक्कासाठी लढण्यातही राजकारण्यांची आणि मोठ्या व्यक्तींची मदत व्हायला हवी असं दौलतबी सांगते.   

एनजीओ फक्त आमचा वापर करतात 
अॅसिड सर्व्हायवर्ससाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. मात्र, त्या सर्व्हायवर्सचा वापर फंडसाठी करतात. मिळणारे पैसे वाटून घेतात आणि सर्व्हायवर्सना विसरून जातात. गरज असते तेव्हा वापर व्हावा म्हणून सर्व्हायवर्सकडे बघण्याची वृत्ती थांबवायची आहे. यासाठी सर्व्हायवर्सनी मिळून स्थापन केलेल्या साहस या संस्थेच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे. केवळ अॅसिड सर्व्हायवर्स, बलात्कारपिडीत, विधवा अशा वंचितांसाठी या संस्थेमार्फत काम करायचं आहे. भीक नकोय. स्वतःच्या पायावर उभं राहून ही मदत मिळावी म्हणून. साहस संस्थेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्या माध्यमातून घरात लपून राहणाऱ्या अॅसिड सर्व्हायवर्सचा स्टॉल ताज हॉटेलमध्ये लावण्यासाठी त्यांनी कार्यक्रमाची तयारी केली होती. आयत्यावेळेस स्पॉन्सरर गळून गेल्याने ही मेहनत वाया गेली. ज्या पैशातून अनेक सर्व्हायवर्सच्या उपचारांसाठी मदत झाली असती ते पैसे डोळ्यांदेखत संपले. - दौलतबी खान, अध्यक्ष, सहास फाउंडेशन  

No comments:

Post a Comment