मी मटा डॉट कॉमसाठी काम करत असताना हा लेख लिहिला होता. त्यावेळी मुंटाचा शुक्रवारचा अंक वीकेण्ड साठी ३१ डिसेंबर निमित्ताने कव्हर स्टोरी हवी होती. प्रगती बाणखेलेने मला लेख लिहायला सांगितला. लेख वाचून प्रगतीने खूप तारीफ केली. तिने मग तो त्यावेळचे मुंटाचे एडिटर मुकेश माचकरांनीही दाखवला. सरांनी लेख वाचून मला प्रतिक्रिया दिली आणि त्याबरोबरच 'लेडी भाऊ पाध्ये' असं नावही दिलं. जयंत पवारांनी हा लेख वाचला आणि मी चांगली कथा लेखिका होऊ शकते असं सुचवलं... हा लेख प्रसिद्ध झाला नाही. पण त्यावेळी मिळालेल्या प्रतिक्रियांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. म्हणून थोडे बदल करुन हा लेख 'एक्सक्लुझिवली' फक्त तुमच्यासाठी……..
३१ डिसेंबर, इयर एण्डिंग, पार्टी टाइम... आपल्या नाक्यावरच्या, कॉलेजमधल्या आणि क्लासमधल्या पोरापोरींसाठी नाचण्या, गाण्याचा, खाण्याचा, नवीन गोष्टी ट्राय करण्याचा आणि महत्त्वाचं म्हणजे त-हेत-हेच्या दारवा पिऊन रडण्याचा, लोळण्याचा, मारामा-या करण्याचा दिवस. हो आणि उलट्या करण्याचाही... उद्या कोणी म्हटलं याच दिवशी मोठ्या संख्येने लोक उलट्या करतात. तर त्याला आपला फुल्ल सपोर्ट असेल.
या दिवशीचा आपला प्लान पण ठरलेला असतो. बाटल्या आणायच्या गच्चीत खाऊन, पिऊन, दोन ती पेग लावायचे त्यानंतर एखादी सिगारेट शेअरमध्ये मारायची. क्लोर मिंटच्या कॅटेगरीत मोडणारी एखादी गोळी खायची. नंतरच्या अॅक्शन रिअॅक्शन प्रत्येकाच्या निराळ्या असतात. आपला ग्रुप एकदम एन्जॉय करणारा आहे.
या वर्षी गच्चीतली पार्टी उरकून आम्ही बाहेर पडलो. यातलं काहीएक खोटं नाही बरं का. आमच्या अथ्याला विचारा. अथर्व कुलकर्णी हो. यावर्षी पहिल्यांदा आमच्याबरोबर पार्टीला आला होता. आम्ही विचार केला ‘सालं शास्त्रीय संगीताच्या बैठकीला जाणारं पोरगं आपल्याबरोबर कसं?’ पण या दिवशी आपण कोणाला अडवत नाय. सगळे आपले असतात. आम्हाला वाटलं चला च्याआयला बिल भरायला बकरा सापडला. पोरं जमल्यावर सवयीप्रमाणे तीर्थ प्याल्यासारखा प्रत्येकाने एक पेग मारला. ही बाटली आपल्या जॉनची. तो ज्या क्लबमध्ये कामाला आहे तिथे त्याला मिळते. मग ती काय असेल ती. या दिवशी लेबल नाही बघत आपण. खिशात पाचशे रुपये घेऊन फिरणारी आणि कॉण्ट्रिब्युशनमध्ये पार्ट्या करणारी माझ्यासारखी पोरं तरी हा नियम अचूक पाळतात. हां. तर आपला अथ्या या पहिल्या पेगला मुकला. पहिलीच वेळ होती ना त्याची, म्हणून. मग नाक्यावरच्या बारमध्ये बसलो. अथ्याला पाजला एक ग्लास. प्यायला. आम्ही आमच्या टाक्या हाफ केल्या. वाटलं बरं झालं पोरगा शुद्धीत आहे ते. बिल भरेल. काउंटरपर्यंत बरोबर गेलो. तर हा साला मटकन खाली बसला. आम्हाला वाटलं उठून बिल देईल. तर साला लोळायला लागला. वाटलं त्याला चढलीय. मग मीच खीसा रिकामा केला. दादाने जोड लावली. बाहेर पडलो तर अथ्या एकदम ताठ उभा. साला त्याच्या इतका चालू कोणी नाही. अथ्याच्या डायरीत नोंदही आहे त्या ऐतिहासिक दिवसाची. ज्या दिवशी अथ्याने पहिल्यांदा थोडीशी घेतली. आता तर आमचा अथ्या फुल्ल टाकी झालाय.
दहा बारा पोरं होतो आम्ही. गाड्या काढल्या आणि निघालो. आम्हाला आधी माहिती नव्हतं. आबांनी दाखवलं. बार बंद करण्याचं त्यांच्यावर संचारलं होतं तेव्हा आम्हाला ही ठिकाणं माहीत झाली. आबा म्हणजे कोण ते तुम्ही नक्की ओळखत असाल. हा तर त्या बारमध्ये गेलो. नाही. त्या बारचं नाव नाही सांगणार. आबांना कळलं तर ते रागवतील. आमचे पिताश्री हो. तसं त्या बारचं नाव आठवत पण नाही.
वाटेत चार बिअर ईच झाल्या होत्या. पण त्याचा काय वांदा नाय. यादिवशी किती ढोसली तरी गाडी चालवताना सगळे एकदम सज्जन. हां, आपल्या अथ्याने मात्र कहर केला होता. थोड्या थोड्या अंतरावर सारखा साला व्यॅक व्यॅक करत होता. हां, तर बारमध्ये गेलो. अंधेरीचा एक डान्सबार होता. सगळ्या आयटम एकदम फुल्ल टू नाचत होत्या. आपला दिनू जाम भडकला होता त्यादिवशी. त्याला असलं काही आवडत नाही. त्याच्या समता आणि समानता या शब्दाला धरुन तो दूर खांबापाशी उभ्या असलेल्या एका सोज्वळ कन्येपाशी जाताना आमच्यातल्या एकाने पाहिला. त्यानंतर आमच्या राखीव खाणा-खूणांनी दिनूची ही भानगड आमच्या सर्व ग्रुप पर्यंत पोहोचली. आम्हा सगळ्यांसाठी तो धक्काच होता. मग सागळ्यांच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या.
काहीसा घाबरत पण धैर्याचा आव आणत दिनू तिच्या जवळ गेला. वाटलं दिनू आता तिला लग्नासाठीच विचारेल. दिनू जवळ येताना पाहून तिने एक गुटख्याचं पाकीट काढलं. थोडं हलवलं, टिचक्या मारल्या आणि तोंडवर करुन तोंडात मोकळं केलं. ते पाहून दिनूचं सारं अवसानच गळालं. त्याच्या अवसानाबरोबर शिगेला पोहचलेली आमची उत्कंठाही खाली आली.
दिनूच्या चेह-यावर वैताग तांडव करत होता. तो तडक बाहेर गेला. आम्ही सगळ्यांनी ती मजा पाहिली. त्यानंतर पुन्हा नाचणा-या आयटमकडे नजरा वळवून बारमधल्या थंडीत डोळे शेकत बसलो. बाहेर गेलेल्या दिनूला कोणीच बोलवायला न गेल्यामुळे त्याने बाहेरूनच फोन करून त्रास द्यायला सुरूवात केली. आम्हा सगळ्यात अन्या कुठे दिसेना म्हणून त्याला शोधायला गेलो. एव्हाना प्रत्येकजण पावलं मोजत चालत होता.‘आयुष्यात किती नागमोडी वळणं असतात ते पोटात थोडी जास्त गेल्यावर कळतं.’ पुन्हा एकदा बारमध्ये चेक करावं म्हणून आत आलो. डोळे मिचकावून पुन्हा चेक केलं तर स्पष्ट दिसत होतं की अन्या एका फाकडू पोरीवर पैसे उडवण्याच्या बेतात होता. पिताना साल्याकडे पैसे नसतात. कायम सगळं उधारीवर चालतं. धरला बकोटीला काढला बाहेर. कानात सगळं ढिंकचॅक ढिंकचॅक, मन सात समुंदर.., चढती जवानी..., साकी साकी..., शिला की जवानी.., मुन्नी बदनाम हुई... असं काहीसं होतं.
बाहेर येऊन थंड्याच्या दुकानात दादूने एक सोडा मारला. त्याला भणभणत होतं. त्याला भणभणलं की आम्हाला गरगरत. सु सु सु सु सु हांssssssssssssssssssssss… झालं दादूने भोकाड पसरलं. दरवर्षीचं सालं नाटक याचं. एक पोरगी काय सोडून गेली. दरवर्षी साला आम्हाला त्रास देतो.
“तुम्हाला सांगतो रापचिक होती साली”. सु सु सु सु... “सोडून गेली रेssssssss” “मी लग्न करणार होतो xxx”. “ पण xxxxx सोडून गेली” ‘आय-माय’ ने सुरुवात होणा-या शिव्या घालून तो जिच्याबद्दल बोलत होता, ते सगळं त्या xxxxx च्याच नव-याच्या खांद्यावर हात ठेवून दादू बरळत होता. नाही. या दिवशी या आणि असल्या विषयांवर भांडणं होत नाहीत. दादूच्या प्रत्येक ‘आय-माय’युक्त शब्दांच्या वाक्याचा अंत छीxx या शब्दाने होतो. यंदाही तो तसाच झाला...
झालं. थोडावेळ बारच्या बाहेर रेंगाळलो. “साहब चाहिए क्या? ” आवाजाने त्या बाहेर रेंगळण्याला थोडी दिशा आली. आतल्या व्हिस्की, स्कॉच, बियर, मॅकडॉवेल्स, टकीला, रम आणि कॉकटेलचाही परिणाम आता ओसरला होता. आम्हाला भानावर आणणा-या आवाजाकडे आम्ही दुर्लक्ष केलं. त्यानंतर तिथून कलटायच्या तयारीत असणा-या आम्हाला “वो गल्ली मे एक पब है. वहाँ सब बडे घरके लडके-लडकीयाँ आती है” या वाक्याने अट्रॅक्ट केलं. त्या अज्ञात इसमाने बोट दाखवलेल्या गल्लीत जाऊन पोहोचलो. पबच्या दूर पण पबमध्ये येणारे-जाणारे दिसतील एवढ्या अंतरावर उभे राहिलो. पोरी, पोरींचे कपडे, त्यांचे बॉयफ्रेण्ड, नवरे, प्रेम, भांडणं, चाळे, अवतार सारं काही बघितलं. तिथेही उलट्यांची सत्रे सुरू होतीच.
वैतागलो. घरी निघायच्याच बेतात होतो. तर पुन्हा “साहब चाहिए क्या?” ने आमचं लक्ष वेधून घेतलं. आम्ही विचारलं “क्या देगा?” तो आम्हाला काय खपवायला आला होता ते माहित नव्हतं आणि अंदाजही लावला नाही. बरं तो ‘अय्या कॅटेगरी’तलाही दिसत नव्हता. “साब आप कितने मे लोगे?” असा प्रश्न केला आणि त्याच्यावर आमचा पम्या भडकला “क्या है क्या रे तेरे पास? क्या दे रे ला है वो तो बताव शही…” पक्याची जीभ घसरली. त्याने एक छोटी डबी काढली आणि हलणारे आम्ही सगळे जागच्या जागीच हललो. ‘हे काय है? हम ये नही पिता.’ आमच्या म-हाटीला एव्हाना हिंदी क्रियापद लागायला लागली होती. असं झालं की शहण्याने समजायचं लवकरच दोन ‘सेना’ तयार होऊन आपापसात राडे होणार... “साहब कसम से एक बार ले लो. भारी माल है.”
त्याच्या त्या शाब्दीक आव्हानांना आम्हाला बळी पडावं लागणारचं होतं... कारण इथे काही जण म-हाटी आणि हिंदी, महाराष्ट्र आणि बिहार यावर ‘च्या’ यच्या सकट वाद-विवादात गुंतू लागले होते. इतक्यात... कोणी तरी ओरडलं... “अरे होऊन जाऊ दे एवढ्याशा पुडीने काय होणार?” कोणाचा का असेना आम्हाला विचार पटला होता. इतक्यात नित्याला काय झालं कोणास ठाऊक त्याने खिशात हात घालून घालून त्या डबीचे पैसे दिले. “माल असली है ना?” सगळ्यांकडे बघत बहतच नित्याने त्याला एकदम प्रश्न टकला. पिक्चरचा असा उपयोग होतो एकदम. नाहीतर असले डायलॉग आपण काय रोज विचारतो. “बॉस आज थोडा अपुन को भी पार्टी को जाने का है. इसलिए चार का एक इतना दाम मे दिया. नही चाहिए तो कोई जबरदस्ती नही बॉस” माल विकत घेतल्यावर तो साहबवरनं बॉसवर आल्याने नित्यासकट आम्हा सगळ्यांना आतून डील कॅन्सल करावीशी वाटत नव्हती. “नही चल फूट ले …” नित्याची फिल्मी स्टाईल आणखी एक गुगली. मग लुख्क्या कुठल्या कुठे पसार झाला... आणि आम्ही देखील डबी घेऊन xxx पाय लावून पळालो. पोलिसांनी पाहिलं तर सालं झिंगाट नको. आमच्या सगळ्या गाड्या बॅक टू एरिया सुस्साट गेल्या. सिगारेट, दारू आणि पोरगी अशा कुठल्याही कॅटेगरीतल्या सगळ्या व्यसन लावणा-या गोष्टींचा पहिला अनुभव घ्यायची आमची हक्काची जागा म्हणजे गच्ची. गच्चीत पोचल्या पोचल्या पहिला प्रश्न पडला ही पावडर घ्यायची कशी? हा प्रश्न तोंडातून बाहेर आल्या आल्या परत कोणी तरी बोललं “सिगारेटमधनं, भाऊ दम लावायचा” मग गच्चीतलं आमचं राखीव पाकीट खाली आलं. नित्यानेच सिगारेट भरली आणि सगळ्यांनी एक एक दोन दोन कश मारले. हो थोड्या वेळाने सिगारेटच्या सुट्ट्याला आम्ही कश म्हणू लागलो होतो. मध्ये तोंडाला बाटल्या लागतच होत्या. गच्चीवरचा स्टॉक संपवायचा असतो या दिवशी... मग अर्ध्या-पाऊण तासाने जन्नत-जन्नत म्हणत सगळे लुडकले. मधू आणि मी त्या जन्नतच्या वाट्यालाही गेलो नाही. कॉण्ट्रिब्युशनमधून आणलेल्या बाटल्या मात्र सोडत नव्हतो. इतक्यात मधूला हुक्की आली. “अरे हातात आली तर बघू तरी कशी आहे ती…” असं म्हणत मधूने पावडरची डबी उचलली. मी ही धैर्य करुन पावडर कशी असते ते बघायला गेलो. चक्क खडूची भुकटी घेऊन आलो होतो आम्ही. उल्लू बनलो होतो. लक्षात आल्यावर थोडं वाईट वाटलं पैसे गेल्याचं... पण नंतर म्हटलं साल्या फुकट्या नित्याला असंच हवं... आमच्यासमोर रुबाब दाखवतो साला... थांब उद्या कसा घेतो त्याला... मी आणि मधू पुढच्या रविवारच्या पार्टीची सोय झाली या सुंदर विचाराने हुरळून गेलो. आमचे सारे दोस्त गच्चीच्या कुशीत लुडकलेले पाहून गार वा-याने आलेल्या शहा-यानंतर आम्ही पण भिंतीला टेकून डोळे लावून घेतले.



Harshada....khupach chaan lihilas ga!Mazaa aali ...aaani aamchi gacchi athavli..kay to utsah asaycha...ofcourse te vay pan veda hota.
ReplyDeletePan chan tiplay chotya chotya goshti...charcters pan aaplich vatatat...Keep posting.
Best Wishes
Dinesh Chindarkar
दे धमाल... रावडी आणि अस्सल मुंबईय्या..
ReplyDelete