Monday, February 8, 2016

हेल्मेट सक्ती !


हेल्मेट सक्ती गरजेचीच आहे. तसंच बाईक चालविणा-या व्यतिरिक्त बाईकवर असलेल्यांनाही ही हेल्मेट सक्ती हवी. विशेषतः महाराष्ट्राच्या इतर भागात एका बाईकवर जिथे तीन ते चार जण सर्रास बसून फिरतात तिथे ती फार गरजेची आहे. कारण अशा ठिकाणी ब-याचदा नवरा बायकोबरोबर दोन मुलं किंवा नवरा बायकोबरोबर शेतावर काम करणारे म्हातारे असतात. विचार करा एकावेळी किती प्राण जाऊ शकतात. तसंच लहान मुलांसाठीही चांगल्या पद्धतीची हेल्मेट बाजारात आणणं आवश्यक आहे. 

हेल्मेट सक्तीमुळे आता तकलादू हेल्मेट हायवे आणि रस्त्याच्या कडेला घेऊन बसणारे दिसतील. केवळ हेल्मेट न घालता फिरणा-यांवर कारवाई करण्यापेक्षा असे हेल्मेट विकणा-यांवरही कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. 

विशेषतः शेतातून परतताना संध्याकाळी किंवा रात्री गाडी रस्त्यावर किंवा हायवेवर येताना अनेकजण गाडीने भरधाव रस्ता क्रॉस करतात. अशा वेळेस ब-याचदा अपघात होण्याची शक्यता उद्वभवते.  

हेल्मेट सक्ती बरोबरच  रस्त्यावर चालणा-यांनाही काही नियम घालून दिले पाहिजेत. विशेषतः हायवे किंवा रस्त्याच्या कडेला शेतातून बाहेर येणारे लोक रात्रीच्या वेळी सहसा दिसत नाहीत अचानक गाडीसमोर येतात. ज्या पद्धतीने पायी शिर्डीला जाणारे लोक अंधारात चमकणारं जॅकेट किंवा हातात चालू बॅटरी घेऊन चालतात त्याप्रमाणे पादचाऱ्यांनाही सुचवलं पाहिजे. 


  हेल्मेट सक्तीला समर्थ का देतेय ? 
अपघातात अनेकदा डोक्याला मार बसतो. हा मार मोठ्या प्रमाणावर असेल तर मेंदूला ईजा होते. रस्ते अपघतातात शरिरावर इतर ठिकाणी मोठा आघात झालेला नसला तरी मेंदूला मार लागल्यामुळे मेंदूमध्ये रक्त स्त्राव होणे किंवा मेंदूला सुज येणे अशा समस्या दिसतात. मेंदू मृत होणे किंवा मेंदू कमी काम करणे अशा समस्या उद्भवल्यास त्याने शरिरातील इतर अवयवांवरील मेंदूचे नियंत्रण सुटून अंतर्गत रक्तस्त्राव होतो. ज्याने मृत्यूच्या शक्यतेत वाढ होते.  


(स्वतःच्या गाडीतून वर्षभर प्रवास करताना या गोष्टी सुचल्या. पण हेल्मेट सक्तीने निमित्त दिलं.)

No comments:

Post a Comment