गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची मुलगी पंकजा पालवे–मुंडे
हिने त्यांना मुखाग्नी दिला. सगळ्यांनी पंकजाच्या या निर्णयाचे कौतुक केले. ही बाब
स्वागतार्ह आहेच. एबीपी माझा या चॅनलवर देखील ‘त्या दोघी’ या कार्यक्रमात पंकजा आणि शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा
पवार यांनी सहाव्या वर्षी त्यांच्या वडीलांना मुखाग्नी दिल्याचे समाजापुढे आणले.
त्या दोघींच्या निमित्ताने समाजातील ‘मुखाग्नी’ या विषयावर वेगळा कार्य़क्रम करण्याचे धाडस केले. असो...
अनेक वर्षांनंतर पंकजा यांनी वडिलांना मुखाग्नी दिल्याच्या निमित्ताने
पुन्हा एक मुद्दा समाजात चर्चेला आला. मुलीने मुखाग्नी देण्याचा. वंशाचा दिवा जिथे
मोक्षाचा मार्ग असतो तिथे मुलीने मुखाग्नी दिला तर मोक्ष मिळत नाही असं सिद्ध
करणारा एकही जण पुढे आला नाही हे स्तुत्य वाटतं. किमान, काही गोष्टी तरी धर्माच्या
जोखडातून सुटल्या तर त्याचा फायदा समाजाला होईल आणि त्यासाठी एक एक पाऊल का होईना
पुढे पडतंय याबाबत दिलासा वाटतो...
यानिमित्ताने आमच्या एका व्हॉट्स अपच्या ग्रुपवर झालेल्या चर्चेत आणखी दोन
मुली सापडल्या सोनाली आणि रश्मी... माझ्या ओळखीत माझी मामे बहिण सिद्धी,
शेजारच्यांची एक नातेवाईक आणि मी स्वतः.. मी माझ्या मावशीला मुखाग्नी दिला होता.
आम्ही प्रत्येकीने हे धाडसाचे पाऊल उचलले तेव्हा आक्षेप घेण्यात आला होता. पण
तरीही कुटुंब पाठीशी ठाम राहिलं म्हणून आम्ही आमच्या आप्तांना तथाकथित मोक्षाचा
मार्ग दाखवू शकलो.
माझ्या मावशीचा मृत्यू झाला तेव्हा माझ्या एका मावशीने मी मुखाग्नी देणार
असं जाहीर केलं. अनेक नातेवाईकांच्या भुवया उंचावल्या. एक तर मुलगी, त्यातही बहिणीची
मुलगी, त्यातही लग्न झालेली, नवरा जिवंत असलेली, आई-वडील हयात असलेली... लोकांच्या
म्हणण्याप्रमाणे मी असे केले तर माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे. पण माझ्या
नवऱ्याने निर्णय घेतला मी मुखाग्नी द्यावा असं तो म्हणाला. एका फोनवर. माझ्या
सासऱ्यांनी याला पाठिंबा दिला त्यांच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न होता तरी.
माझ्या आई –वडिलांनी याला पाठिंबा दिला. त्यांच्या मोठ्या मुलीच्या संसाराचा
प्रश्न होता तरी देखील. मुद्दाम सांगावंस वाटतं यातले माझे वडील आणि सासरे मुलींना
घर सांभाळावं आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी कराव्यात या विचारांचे आहेत. माझा नवरा ‘डिपेन्ड्स’ या कॅटेगरीत मोडणारा
आहे. माझी आई कायम चूल आणि मूल सांभाळणारी आहे. माझी मावशी देखील फारसं शिक्षण
घेतलेली किंवा मॉडर्न लाइफस्टाईल जगणारी नाही. पण ते त्यांच्या त्यांच्या परीने
मुलगी किंवा स्त्री यांच्या हक्कांना वाव देणारे आहेत. त्यांच्या या निर्णयामुळेच
माझ्या मावशीची माझ्या हातून मुखाग्नी देण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली. या सर्वांचे
आभार. माझ्या मावशीच्या मताला आणि माझ्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी....
मुलीने, स्त्रीने किंवा महिलेने मुखाग्नी देऊ नये यासाठी काही मंडळी अनेक
कारणं सांगतात. स्त्रिया या नाजूक असतात, त्या या धक्का पचवू शकत नाहीत, स्मशानात
अनेक मृतदेह अंत्यविधीसाठी येतात ते पाहून स्त्रिया घाबरू शकतात, वगैरे...
खऱंय... माझ्या मावशीला मध्य रात्री दोन – अडीचच्या सुमारास मुखाग्नी दिला
मी. आजही तो प्रसंग मला आठवतो. सरणावर ठेवलेला माझ्या मावशीचा देह आणि तेव्हाची
स्मशानातील परिस्थिती मला व्यवस्थित आठवते. या घटनेला येत्या ऑगस्टमध्ये तीन वर्ष
होतील. माझ्या मावशीची ही इच्छा पूर्ण करू शकले याचं समाधान माझ्या मनात कायम
राहील. पण, एखाद्या पुरुषालाही आपल्या प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप लक्षात राहत
नाही?
मी स्त्रीवादी किंवा निरिश्वरवादी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीची
कार्यकर्ता वगैरे नाही. मी एक आर्ट्स स्टुडंट असल्याने विज्ञानाचा शाळेपुरता
मर्यादीत अभ्यास करणारी ‘अ गर्ल नेक्स्ट डोअर’ अशीच आहे. सर्वांना समान अधिकार मिळावा आणि कोणावर अत्याचार होऊ नये असं
वाटणारी एक सामान्य महिला आहे. जेव्हा स्त्रीने मुखाग्नी देऊ नये या समाजाच्या
कारणांचा विचार करते तेव्हा मात्र त्यांची ही कारणं पोकळ वाटतात.
जेव्हा मी माझ्या मावशीचा एक मुलगी असूनही सांभाळ करू शकते तेव्हा मला तिला
मुखाग्नी देण्याचा अधिकार का नसावा. माझ्या मावशीचं लग्न झालं नव्हतं पण प्रत्येक
स्त्री प्रमाणे ती माझ्यात स्वतःचं मुलं शोधायची मग का मी तिला मुखाग्नी देऊ नये.
तिच्या आजारपणात, तिच्या एकटेपणात मी तिच्या भावना ऐकण्याचं धाडस ठेवू शकते तर का
तिला मुखाग्नी देऊ शकत नाही.
मी मुखाग्नी देऊ शकत नाही समाजासाठी, काही नातेवाईकांसाठी... कारण,
मुखाग्नी देणं = ईस्टेट, प्रॉपर्टी, दाग –दागिने खिशात घालणं अशी
एक समाजाने स्वतःची केलेली रीत आहे. सुदैवाने माझ्या मावशीकडे यातलं काहीच
नव्हतं...त्यामुळे माझ्या मुखाग्नी देण्याला फार विरोध झाला नाही.
काही कुटुंबांमध्ये अशा अनेक एकट्या राहणाऱ्या व्यक्तींसाठी मुखाग्नी देण्याची चढाओढ लागते. मृत व्यक्तीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी देताना ‘याने अग्नी दिला होता’ तेव्हा मृत व्यक्तीच्या मालकीचा जागा, वस्तू मुखाग्नी देणाऱ्या व्यक्तीला मिळावी याकरीता अशा व्यक्तीचं नाव सहज पुढे येतं. मग भले आयुष्यभर त्या व्यक्तीच्या तब्येतीची चौकशीसुद्धा मुखाग्नी देणाऱ्या व्यक्तीने केली नसेल. त्या व्यक्तीच्या घरी जर महिला असतील तर मग त्यांच्याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार अग्नी देणाऱ्या व्यक्तीकडे सहज दिला जातो. मग ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यास अपयशी ठरलेली का असेनात...
मी विल्सन कॉलेजमध्ये होते तेव्हा मला एक प्राध्यापिका शिकवायला होत्या.
डॉ. मंगला आठलेकर. त्यांनी लिहिलेल एक पुस्तक आठवतं...’गार्गी अजून जिवंत आहे’. उत्तर प्रदेशात एका
छोट्याशा खेड्यात जन्मलेली मुलगी. बालविवाहानंतर थोराड पतीच्या मारहाणीला कंटाळून घरातून
पळून जाते. स्मशानात राहते त्यानंतर तिथल्या स्मशान सांभाळणाऱ्या व्यक्तीकडून
मृतदेहावर करायचे विधी शिकते आणि स्मशानातू राहून तसे विधी करू लागते. स्मशानात
राहून स्वतःचा उदरनिर्वाह करते... वैदिक काळातही तथाकथित पंडितांना आपल्या
वेदमंत्राच्या अभ्यासाने चकीत करणाऱ्या गार्गी आणि मैत्रेयी या दोन्ही स्त्रियाच
होत्या.
मग का नाकारला जातो स्त्रीयांना हा अधिकार? जी रानावनात एकटी काम करू शकते, जी दिवसभर काबाडकष्ट करते, जी आजारपणात
सेवा – शुश्रुषा करते, जी एका जीवाला जन्म देऊ शकते, जी सर्व अपमान पचवते, जी
कोणत्याही अधिकाराविना सर्व कर्तव्य पार पाडू शकते ती एका मृत देहाला मुखाग्नी देऊ
शकत नाही?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुखाग्नी दिल्यानंतरही ती कुटुंबासाठी मुलगी, बहीण,
पत्नी, आई आणि स्त्री राहते... स्वखुशीने...
No comments:
Post a Comment