Sunday, January 10, 2016

सेक्स, सेल्फी आणि सोशल मीडिया


सेल्फी काढणं हा आजार बळवण्यामागे सोशल मीडिया, स्मार्ट फोन यांबरोबर फॅशन आणि ट्रेण्डचं अंधानुकरण तसंच प्रसिद्धीची आणि स्तुतीची भूक असल्याचं दिसून येतं. लाईक्स, कमेंट्स या सोशल माध्यमांच्या दोन शब्दांभोवती मग सगळं भावविश्व उधळलेलं दिसून येतंय सध्या. 
पण म्हणून सेल्फी काढणं वाईट मुळीच नाही. सेल्फीचा अतिरेक आणि त्यासाठी जीव धोक्यात घालणं वाईट असं तज्ज्ञांच मंत आहे. पण आपण फॅशन आणि ट्रेण्ड या शब्दांनी निर्माण केलेल्या शर्यतीसाठी किती पळावं याला बंधन असण्याची देखील आवश्यकता निर्माण झाली आहे हे या निमित्ताने वाटू लागलंय. जे सेल्फी आणि त्यातून होणा-या अपघातांच्या माध्यमातूून अधोरेखित होत आहे. ज्याप्रमाणे इन फॅशन असलेला एखादा कपड्याचा प्रकार आपल्याला, आपण जात असलेल्या कार्यक्रमात किंवा वातावरणात शोभून, उठून दिसेल हा विचार दुय्यम असतो त्याप्रमाणे सेल्फीचं झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सेल्फीच कशाला एकूणच फोटो काढण्याचं वाढणारं फॅड याच पद्धतीत मोडतं. यात केवळ आनंदाचा, किंवा महत्त्वाचा क्षण टिपणं एवढंच नाही. तर, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याची आणि त्यातून स्तुती आणि प्रसिद्धी मिळविण्याची भूकही कारण आहे. किंवा केवळ सेल्फी हे वेढ नाही तर प्रसिद्धी आणि स्तुतीसाठीचा हपापलेपणा देखील याला कारण ठरु लागलंय. की आपण सोशल माध्यमांवरही शर्यत निर्माण केलीय? पहिली सेल्फी कोण टाकतं? दिवसभरात जास्त अपडेट्स कोण देत? वेगळ्या आणि चांगल्या ठिकाणी जाऊन सेल्फी किंवा फोटो कोण काढत याची शर्यत आहे का ही ?
सेल्फी पॉइंट्सही काही ठिकाणी तयार झाले. ते जेव्हा तयार झाले तिथे जाऊन किंवा तिथे गेल्यावर अनेकांनी फोटो काढले. पण काही तरी वेगळ करण्याच्या नादात असे जीवावरचे खेळ केले जातात. 
सेल्फी हा  सेक्स अपिलिंगचा भागही ठरू लागलाय का?. तोंडाचा चंबू (पाउट) करुन  फोटो काढणं हे एकेकाळी सेक्स सिंबॉल मानलं जायचं. मेरलिन मेन्रोचा फोटो आठवा. हल्ली तसे पाउट करुन किंवा डक लिप्स, स्परो फेस करुन सेल्फी काढण्याचे प्रकार मुलींमध्ये सर्रास दिसताहेत. कदाचित त्यांना या पाउटचा अर्थ माहित असावा किंवा नसावा पण ते होताना मात्र दिसतंय. किती पालकांना असे ओठांचे चंबू का केले जातात हे माहित आहे ? किती पालकांना असं ओठांचे चंबू करुन फोटो काढण हे चुकीचा सिग्नल देणारं आहे हे माहित आहे?  
केंब्रिज ऑनलाईन डिक्शनरीत पाऊटचा मिळालेला अर्थ  (to ​push the ​lower ​lip ​forward to show you are ​annoyed, or to ​push both ​lips ​forward in a ​sexually ​attractive way)

Monday, October 26, 2015

आई मी उद्या काय बनून शाळेत जायचं?



     माझ्या मुलाने आराध्यने (३वर्षे) रविवारी रात्री (२५ ऑक्टोबर २०१५) ला हा प्रश्न विचारला आणि मला आणि प्रशांतला काय आश्चर्याच्चा धक्का बसला आणि आपलं चूकतंय असा साक्षात्कार झाला. एका सेकंदातला हा झटका पुरे होता आमच्यासाठी... वेळीच भानावर येण्यासाठी.
प्रशांतने यावर उत्तर दिलं... आराध्य बनून जायचंय तूला शाळेत.

नर्सरीत जाणाऱ्या आराध्यला शाळेत वेगवेगळ्या डे चं सेलिब्रेशन म्हणून वेगवेळ्या कपड्यात जायचं असतं.
पहिल्यांदा १४ ऑगस्टला तो टिळक बनून गेला. मग त्यानंतर श्रीकृष्ण जन्मासाठी त्याला श्रीकृष्ण बनवून पाठवायचं होतं. पण तो आजारी असल्याने ते शक्य झालं नाही. त्यानंतर नवरात्र सेलिब्रेशन म्हणून पारंपारिक वेशभूषेत जायचं होतं. मग दसऱ्याच्या आदल्या दिवशी तो राम बनून गेला. दसऱ्याच्या सुट्टीनंतर जुसऱ्याच दिवशी दैनंदिन जीवनात मदत करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या पोषाखात जायचं होतं. तेव्हा तो सैनिक बनून गेला. रविवारची सुट्टी. शनिवार रविवार अशी दोन दिवस सुट्टी झाल्यानंतरही त्याने साहजिक प्रश्न विचारला. 'उद्या मी उद्या काय बनून शाळेत जायचं?'

 शाळेच्या म्हणण्यानुसार यातून ते शिकतात. पण पालकांची आणि मुलांची धावपळ घडवून आणणारे हे दिवस इतके महत्त्वाचे आहेत? प्रॅक्टिकल शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आणि मुलांची काय मानसिकता होते  हे शिक्षकांना त्यांच्या मुलांच्या शाळेत येणाऱ्या अनुभवावरुन माहितच असेल. का शिक्षण महाग होत चाललंय त्यात हेही एक कारणच आहे. जसे शाळेतल्या प्रोजेक्टवर आक्षेप घेतात पालक तसाच आक्षेप या अशा डे सेलिब्रेशनवरही घ्यायला हवा असं  प्रशांत सारखं घरी सांगतो.

मुलांना भलेही मोठं झाल्यावर असे वेगवेगळ्या वेशभूषेतले फोटो पाहून आनंद होईल. पण त्यांना ते टोचणारे कपडे, होणारी धावपळ लहानपणी अन्यायकारक वाटते. बरं ड्रेस न घालता पाठवलं तर फोटो काढताना अशा मुलांना बाजूला ठेवलं जातं. मानसिक त्रास देणारीच वाटते.

मुलांना माहिती देण्यासाठी काही दुसरे पर्याय नक्कीच निघतील. सुचतील. पण कसं थांबू शकेल हे सारं ?

Thursday, October 15, 2015

माझी वाचनाची आवड


वाचायला लहान पणापासून खुप आवडायचं. आठवतंय खुप वाचायचे. आजूबाजूला काय घडतंय याचं भान नसायचं. पुस्तक हातात घेऊन एका जागी बसले की संपला विषय. मग पुस्तक संपेपर्यंत उठायचं नाही.
शाळेतली पुस्तक हातात आली की वाचून पूर्ण. गंमत म्हणजे एका वाचनात धडा पाठ होऊन जायचा. दोन-तीन वाचनानंतर कुठली ओळ कितव्या पानावर कुठल्या पॅराग्राफमध्ये आहे, लेखक कोण वगेरे सगळं पाठ व्हायचं. या वाचनामुळेच चेव्हा माझा शाळेत पहिल्या पाचात नंबर होता. तेव्हा पुस्तक विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. शाळेची पुस्तकही इतरांपेक्षा उशीराच मिळायची. पण वाचायला इतकं आवडायचं की आईची हाक आणि पोटातल्या कावळ्यांचा कालवा काहीच लक्षात यायचं नाही. आठवतंय. तेव्हा आई हाकेला ओ दिली नाही किंवा सारखी वाचत बसले की मला झाडूने मारायची. चष्मा लागेल या भितीने ते ओराडाओरड करायची माझ्या कानावर पडलं नाही की ऐकू येण्यासाठी ती हा उपचार करायची. पुढे तिच्या आणि बाबांच्या मेहनतीनचे शिक्षण शक्य झालं.
वाचनासाठी शाळा मला परवडायची. मी गिरगावातल्या एस.एल.अॅण्ड एस.एस.गर्ल हायस्कूल शाळेत शिकायचे.  पाचवी अ च्या वर्गासमोर शाळेची लायब्ररी होती. मधल्या सुट्टीत तिथे बसणाऱ्या ग्रंथपाल बाईंकडे जाऊन पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. तेव्हा आठवड्याला एक पुस्तक मिळायचं. म्हणजे त्या आधी वाचून झाल तर दुसरं पुस्तक घेता यायचं. पुस्तक घ्यायला येणाऱ्या मुलींवर त्यांचा विशेष जीव. पुस्तकं सुचवायच्या, हवं असलेलं पुस्तक दुसऱ्याला दिलं असेल तर आठवणीने ते परत आलं की बाजूला ठेवायच्या. कधी उशीर झाला पुस्तक द्यायला तर त्या ज्यांना दंड भरणं शक्य नाही अशा मुलींना रागवून सोडून द्यायच्या. मी त्यातली एक होते. त्यांचा चेहरा आजही डोळ्यासमोर आहे. पण नाव आठवत नाही. नाव लक्षात ठेवण्यात मी थोडी कमजोर आहे.
प्रत्येक वर्गात एक पेटी होती. हिरव्या रंगाची लोखंडी पेटी. ऑफ पिरिएड (शिक्षक नसतील तो तास)त्या पेटीतली पुस्तक वाचायला दिली जात. वर्गातला मॉनिटर किंवा प्रिफेक्ट ती पुस्तक वाटायचा तो तास संपला की पुस्तक परत घेतली जायची. कधी घरी पण द्यायचे.
शाळेत असतानाच आमच्या वाडीत (कामत चाळीत ) राहणाऱ्या एका मुलाने त्याचा पुस्तक संग्रह सर्वांसाठी खुला केला. घरगुती लायब्रकी वगैरे. आठवड्याला एक रुपया भरुन तो पुस्तक द्यायचा. मी पुस्तक घेतलं की अर्ध्या एक तासाने ते पुस्तक परत करायचे. मिळेल ती पुस्तक एका दिवसात दोन - तीन वगैरे पुस्तकं वाचायचे. एक दिवस परिक्षा संपल्यानंतर मी पुस्तक आणायला गेले. तर त्याने पुस्तक दिलं नाही. म्हणाला आईने सांगितलंय पुस्तक द्यायचं नाही. बस मग पुन्हा त्याच्याकडे पुस्तक मागायला गेले नाही.
विल्सन कॉलेजमध्ये गेले आणि विल्सनची मोठी लायब्ररी पाहून वेडावून गेले. पण माझ्या आवडीची मराठी पुस्तक तिथे फार नव्हती. तरी माझ्या शिक्षिकांच्या कृपेने लायब्ररीयन माझ्यासाठी पुस्तक राखून ठेवत. कॉलेजमधल्या माझ्या प्रोफेसर तारकर बाई खास पुस्तकांची यादीसुद्ध द्यायच्या. या काळात श्री.ना.पेंडसे, जयवंत दळवी, भाऊ पाध्ये अशा
लेखकांची ओळख झाली. तेव्हा वाचलेलं आणि आजही आठवणारं पुस्तक म्हणजे नॉट विदाऊट माय डॉटर. गार्गी अजून जीवंत आहे (मंगला आठलेकर लेखिका), रारंगढांग आणि माणसं. त्यानंतरच्या काळात म्हणजे जर्नलिझमला असताना वाचलेल्या पुस्तकांपैकी ही वाट एकटीची, हे दुःख कोण्या जन्मीचे (समलैंगिक विचारांवर प्रकाश टाकणारे), तू भ्रमत आहासी वाया. इंग्रजी जे वाचलं त्यातलं लक्षात राहणार पुस्तक म्हणजे ट्युसडे विथ मॉरीस.
गरोदरपणात भरपूर छोटी पुस्तक वाचली त्यामध्ये जिजाबाई, बाबा आमटे, यशवंतराव चव्हाण, शिवाजी, व्ही. राधाकृष्णन यांची माहिती देणारी छोटी पुस्तक आणि नापास मुलांच्या गोष्टी तसंच हाती ज्यांच्या शून्य होते. 
काही महिन्यांपूर्वी वाचलेली पुस्तक म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर झीरो आणि शिवाजी कोण होता.
भावाने मला दिलेलं सिक्रेट आणि पॉवर ही दोन पुस्तक चाळली फक्त पण बरंच शिकले त्यातून.
आता पुस्तक विकत घेता येतं पण खंत आहे ते सलग वाचायला मिळत नाही. हल्ली वाढदिवसालाही कोणी पुस्तक भेट देत नाही याची असो. पव वाचत राहीन आयुष्यभर.


Tuesday, October 13, 2015

ट्रेड सिक्रेट की अनुभव


संध्याकळची वेळ
जी.टी. हॉस्पिटलहून परेलला ऑफिसकडे जाण्यासाठी सी.एस.टीला ट्रेन पकडली. अंतर थोडंच असल्याने दरवाज्यात उभी राहिले ४ ते ४.३० ची वेळ असेल ट्रेनला फर गर्दी नव्हती. ट्रेन सुरू होण्यापूर्वी दोन बायका ट्रेनमध्ये चढल्या. त्यातली चांगली साडी नेेसलेल्या बाईने मला दरवज्यात बसायचंय असं सांगून आत सरकवलं. तिच्या भसाड्या आवाजावरुन ही बाई तृतीयपंथी असल्याचं लक्षात आलं. तिच्याबरोबर चढलेली दुसरी बाई म्हणजे तृतीयपंथीच होता. समोरच्या बाईला बाजूल हो माझ्या मैत्रिणीला बसायचंय आम्ही थोड्या वेळाने उतरणार असं तो सुंदर तृतीय पंथी सांगत होता. ती बाई काही हलेना.

दोघांच्या गप्पा सुरू होत्या मी उभ्या असलेल्या दरवाज्यात बसलेल्या तृतीयपंथीने (१)मग  तोंडात मळी लावली आणि समोरच्या (२) तृतीय पंथीबरोबर गप्पा करायला सुरुवात केली. तो नवीन अफेअरबद्दल सांगत होता.
१- पहिले वो सिर्फ देखता था. बादमे पता चला कोली है. हप्तेभर एकदुसरे के तरफ देखते रहे. एकदीन मैनेही सामनेसे आख मारी
माझं सगळ लक्ष समोर बसलेल्या तृतीयपंथीकडे होतं. तो त्या सुंदर तृतीयपंथीचं बोलण मन लावून ऐकत होता. चेहऱ्यावरचे भाव समोरच्याच्या बोलण्यानुसार बदलत होते. उत्सुकता, नवल, शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी आतूरता आणि हे आपल्याला कधी जमेल असा प्रश्न सतत चेहऱ्यावर बदलत होते.

एखादी पोरं पटवण्यात हुशार असलेल्या तरुणींच नवशिकी तरुणी जसं ऐकेल अगदी तसं.
१- आख मारी तो मेरे पास आया. बोला आख क्यू मारी? मैने बोला तुम देखते तो आख मारी. उसने पुछा मेरे पिछे क्यो पडी. मै भी बोली हम किसी के पिछे नही पडते लोग हमारे पिछ आते हे. फिर १०० रु. देकर चला गया.
२- हा (आश्चर्य आणि उत्सुकता)
प्रत्येक वाक्यागणिक एक टाळी स्वतःच्या हातावर वाजवून (तृतीयपंथी वाजवतात तशी) तो पुढे सांगतच होता. उसके बाद एक दीन ५०० रुपये दिए उसने. अभी बोलता हे शादी बनाएगा. छोडूँगी नही. बाद मे पता चला वो कोली है.
अरे यला तर लॉटरीच लागली. आपल्याल असं कधी मिळणार असे भाव त्या दुसऱ्या तृतीयपंथीयाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
१- बोल रहा था शादी करेगा. अब हाजीअली लेके जाऊंगी कागद बना के शादी करुँगी. पाच ग्रॅम का मंगलसुत्र लूँगी. जितना आए उतना पैसा ले लूँगी. दो तीन महिने के बाद तू नही मेरा मै नही तेरा. मेरा ये तिसरा बॉयफ्रेण्ड. अभी एक को छोडा. गले ने सिसा विसा मै नही डालूँगी.

त्या दरम्यान एका स्टेशनवर तिने एका पोलिसाला हाय केलं. उत्तरादाखल त्यानेही हाय करुन ओळख दाखवली.
माझ्या समोर उभ्या असलेल्या एका बाईने त्या सुंदर तृतीयपंथीयाला त्याने लावलेलं लायनर कुठून आणलं असं विचारताच त्याने 'बॉयफ्रेण्डने दिया' असं सांगून पुन्हा आपल्या साथीदाराशी चर्चा सुरू ठेवली.

एखादी मुलगी, बाई जसं बोलेल तसंच हे बोलणं. पण स्वरातून दुनियादारी डोकावत होती. अनुभवातून आलेलं शहाणपण स्वतःपुरता न ठेवता बरोबरच्या त्या तृतीयपंथीयाला सांगण्यात कोणतीही लपवाछपवी नव्हती. पण आयुष्यात जे चांगलं सुरू आहे त्याला नजर लागू नये म्हणू मध्ये मध्ये हाताची बोटं मोडणं सुरू होतं.

करीरोड स्टेशनला ते दोघेही उतरले. उतरताना त्या सुंदर तृतीयपंथीयाने त्याच्याबरोबरच्याला सामने आया तो बार बार दामन ठीक करने का. ये देख ऐसे. थोडा इधर उधर देख के शर्माने का असं म्हणून टिप्स देणं सुरू केलं. त्या नवशिख्या तृतीयपंथीयाने सांगितल्याप्रमाणे निमूटपणे पदर घेऊन दाखवला. त्यावर त्या सुंदर तृतीयपंथीयाने 'थोडा हसके' असं म्हणत परफेक्शनिस्ट टच. दिला उतरताना ज्या बाईने लायनरबद्दल विचारलं तिला बाय करायला तो सुंदर तृतीयपंथी विसरला नाही.

बाईपेक्षा अधिक पण खानदानी लचकणं. पण जगण तर तृतीयपंथी, हिजडा, छक्क्याचं... तिरस्कार, कमीपणा, दबलेलं. पण, बोलण्यात थेटपणा. परिस्थिती ने अनुभव भले कटू दिले पण चेह-यावर सदैव हास्य. कुठून येते ही ताकद असा प्रश्न मला पडला होता. 

टी.व्ही.चा हप्ता बंद !




फ्लॅट टी.व्ही.चं फॅड येऊन वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लोटला असेल. #Prashant Jadhav (माझा नवरा) ने घरी त्या पद्धतीचा टी.व्ही. घेण्याचा हट्ट धरला. मला नकोसं वाटत होतं. उगीचची चंगळ आम्ही दोघेही टाळतो.
गिरगावातलं भाड्याचं घर सोडतो आहोत तर घेऊन टाकू टी.व्ही.  आर्थिक गणित जमेल असा हिशोब झाल्यानंतर टी.व्ही. घ्यायचं असं दोघांचही ठरलं.
ऑपेरा हाऊस येथल्या #vijay sales च्या दुकानात जाऊन टी.व्ही. बघितले. अनेक टी.व्ही. पसंत केले आणि घेतला तो खिशाला परवडणारा टी.व्ही. सुमारे २१,००० हजार किंमतीचा टी.व्ही. दोघेही नोकरी करणारे असलो तरी जबाबदाऱ्या बऱ्याच असल्याने आम्ही महागड्या वस्तूंपासून आजही कोसो दूरच आहोत. तो नियम टी.व्ही.खरेदीच्या स्वप्नाला लागू झाला. शोरुम मध्येच बसलेल्या # Bajaj finance च्या एजंटने स्वत: बोलवून कर्ज देण्याची तयारी दाखवल्याने आम्ही आणखी खूष झालो. मग काय सुमारे आठ हजाराचा पहिला हप्ता एक रक्कमी दिला आणि हप्त्यावर घेतलेला २१ इंची टी.व्ही. घरी आला. १७०८ रुपयांचा ८ महिन्यांच्या  हप्त्यासह आलेला टी.व्ही. मला फारच लहान आणि आकाराच्या मानाने महाग वाटला.

तर, हा हप्ता भरणार कोण? या प्रश्नाला नेहमी प्रमाणे मी जबाबदारी घेण्याचं नाटक केलं. पण यावेळी प्रशांतने ८ हजार  एक रकमी हप्ता भरण्याचा निर्णय घेतला. तर, १७०८ रुपयांचे ८ महिन्यांचे हप्ते भरण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. बापरे ! (माझ्यावर अशी जबाबदारी येईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं.)पण आलीच जबाबदारी माझ्यावर.  

७ तारखेला पगार होणाऱ्या माझी अकाउंटमध्ये १७०८ रुपये  राहतील यासाठी तारांबळ उडू लागली. हप्त्याची तारीख होती महिन्याची २ तारीख. हा हप्ता घेतल्यानंतर प्रशांतने मला सांगितलं होतं. हप्ता भरणं इतकं सोप्प नाही. डोक्याला टेन्शन असतं. घर हप्त्यावर घेण्याचं टेन्शन काय असतं याची कल्पना या हप्त्याने तुला येईल. मग घर घेण्याचा विचार कर. कारण एक रक्कमी घर घेणं सहज शक्य होत नाही. दर महिन्याला तेवढे पैसे अकाउंटमध्ये रहावे म्हणून भरपूर मेहनत घ्यावी लागते. घराच्या हप्त्याचं टेन्शन त्याने घेतलेलं आहेच. त्या अनुभवावरुन त्याने सांगितलं होतं. प्रशांतचं हे म्हणणं मला दर महिन्याला आठवत होत.

जुलै २०१५ या महिन्यात अगदी रोजच आठवायचं. नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याने आता हा हप्ता कसा जुळवायचा असं सारखं गणित मांडत होते. आणखी किती महिने राहिले वगैरे विचार करत होते. सरते शेवटी आज #Bajaj finance चा मेल पाहिला (२९ जुलै) आणि घाबरतच उघडला. स्टेटमेंटच्या पीडीएफ फाईल वाचली तर हप्ता संपल्याचं दिसलं आणि कोण आनंद झाला. हप्ता बंद झाल्याचा हा आनंद होताच पण त्याबरोबर आनंद होता तो मी घेतलेलं बँकेचं कर्ज एकटीने फेडल्याचं. हे मी बँकेकडून घेतलेलं पहिलं कर्ज.

प्रशांत तू म्हणत होतास तसं हप्ता फेडणं फार जिकिरीचं आणि टेन्शनचं असतं हे पटलंय मला. पण आता मी घर घेण्याचं स्वप्न बघू शकते हे सुद्धा सांगायचंय तूला. ख्वाब देखने के लिए ना पैसे पडते है और ना किश्त भरनी पडती है.


(हा ब्लॉग ३१ जुलै रोजी लिहिला होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच हप्ता बंद झाल्याने होणार आनंद व्यक्त करण्यासाठी ट्रेनमध्ये बसून हा ब्लॉग लिहिला)



Tuesday, April 14, 2015

फकीर बाबा...

ट्रुम.... ट्रुम ट्रुम असा आवाज आला आणि लगेच चिल्लरसाठी जीव खालीवर झाला... हातात पैसे आलेच नाहीत. पण फकीर बाबा जाऊ नये म्हणून झर्रकन घराचा जीना उतरुन गॅलरीत आले.... तेव्हा तर द्यायला पैसेच नव्हते पण फकीर बाबा आला की गॅलरीत पळायचं एवढं ठरलेलं. 'बाबा'असा आवाज देताच ग्राउंड फ्लोअरवरुन आवाज आला 'हा बेटा' पोट माळ्यावर असलेल्या घरुन आवाज आला 'काय गं'
तळ मजल्यावर ओरडून सांगितलं 'बाबा रुको बच्चा आ रहा है' घराकडे तोंड करुन ओरडले 'बाबा बछडूला खाली आणा... फकीर बाबा आलाय'
बाबा आराध्यला (माझा अडीच वर्षांचा मुलगा) घेऊन खाली आले. मी न सांगताच हातात पाचचं नाणं घेऊन आले. आराध्यच्या हातात नाणं दिलं.
'बाबा' मी आणि माझ्या बाबांनी एकत्र हाक दिली.
तळ मजल्यावरुन 'हा बच्चा' असा आवाज आला
फकीर बाबाने छत्री उघडली माझ्या बाबांनी आराध्यला पैसे टाकायला सांगितलं. तेव्हा मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल. उत्सुकता दिसली चेहऱ्यावर आणि काहीतरी नवीन कळल्यानंतर ती गोष्ट टिपून लक्षात ठेवण्यासाठीची आतुरताही स्पष्ट दिसत होती. 'अल्लाह भला करे' त्यापाठोपाठ फकीर बाबाचं 'बाय' ऐकू आलं. माझ्या मुलानेही सवयीने हातानं बाय केलं पण बाय बोलणं तो विसरुन गेला. तोवर फकीर बाबाने छत्रीतले पैसे घेतले झग्याच्या खिशात ठेवले. मग फकीर बाबा ट्रुम ट्रुम असं त्या डमरुसारख्या वाद्याचा आवाज करत निघून गेला.

कामत चळीत आले की लहानपणीचे दिवस आठवतात. आज फकीर बाबाचं निमित्त. लहानपणचे दिवस आठवले. रविवारी फकीर बाबा यायचा. शक्यतो काळोख पडल्यावरच यायचा. माझ्या माहेरी कामत चाळीसह आसपासच्या वाड्यांमध्ये आज आलाय तसाच पैसे गोळा करत फिरायचा. त्या ट्रुम ट्रुम आवाज तो आल्याची खुण होती.

काही वर्षांची होते ट्रुम असा आवाज आणि बाबा या हाकेला 'हा बाबा' किंवा 'हा बेटा' किंवा ' या आवाजाने प्रतिसाद देणारा आवाज यायचा. छत्रीत टाकलेले पैसे कधी बाहेर पडले तर त्या नाण्याचाही आवाज यायचा. आम्हा मुलांचा फकीर बाबाला पैसे देण्यासाठी एकच गलका. रविवारची सुट्टी संपली हे लक्षात घेण्यासाठीची एक खुण. काही वेळा तर वयाने मोठी माणसंही फकीर बाबाला पैसे देण्यासाठी धावत यायची. तळ मजल्यावर राहणारी मुलं हमखास या फकीर बाबाच्या पाया पडायची. तोही हात उंचावून आशिर्वाद द्यायचा. उर्दूत काही तरी बोलायचं. आजही ८० पेक्षा जास्त वय असलेले सुदाम ठाकूर आजोबा भाई जान अशी हाक मारत आले. फकीर आजोबा आणि ठाकूर आजोबा यांच्यात दोन तीन ओळीचा संवादही झाला.  

फकीर बाबा लुंगी नेसून, डोक्यावर मुसलमानी फेटा आणि गुडघ्यापर्यंत लांब सदरा घालून यायचा. 'या बाबा .... ' असं काहीतरी पुटपुटत रहायचा. त्यावेळी रात्रीच्या अंधारातही फकीर बाबाच्या येण्यान जितकं प्रसन्न वाटायचं तितकं प्रसन्न आजही वाटतं.

ही फकीर बाबाची कितवी पिढी माहित नाही. ठाकूरद्वारसारख्या मराठ मोळ्या वस्तीत आजही हा फकीर बाबा येतो याचा वेगळाच आनंद वाटतोय. तो तेव्हाही यायचा अगदी ९२ च्या दंगलीनंतर, ९३ च्या बॉम्बस्फोटानंतर, हल्लीच्या २६/ ११ च्या हल्ल्यानंतर... हा कधी खंड पडला. तर फकीर बाबा का आला नाही या प्रश्नाला उत्तरं देऊन थकलेले आई- बाबा, आजी - आजोबाच तो आल्यावर त्याला लिचारायचे त्याच्या न येण्याचं कारण. गाव गया था, बेटे की शादी अशी काही तरी कारणं तो सांगायचा. अगदी मुलं पळवणाऱ्या टोळीने मुंबईत धुडगूस घातला होता. तेव्हाही फकीर बाबा कोणालाच खटकला नव्हता. मला आठवतंय त्याच्या मागे पळत जाणाऱ्या पोरांना तो वाडीच्या बोळातून परत जायला सांगायचा. त्याचं कोणी नाहीच ऐकलं तर वाडीतल्या मोठ्या माणसांना आम्हा मुलांना रागवायला सांगायचा. पण फकीर बाबा आमच्यासाठी आमच्या विश्वासाचा होता आणि आजही आहे.

त्याच्या शांत आणि प्रसन्न चेहऱ्यात, त्याच्या त्या ट्रुम अशा डमरुसारख्या वाद्यातून येणाऱ्या आवाजात असलेली जादू आजही कायम आहे. त्याच्याशी आम्हा मुलांच आणि मोठ्यांच नातं होत आणि आजही आहेच.

टॉवर होऊ दे, पोरं एसी गाड्या आणि बंगल्यात फिरू दे, सायबाला लोळवेल असलं फर्ड इंग्लीश बोलू दे, पण देवा आमचा फकीर बाबा आम्हाला भेटत राहू दे. त्याच्याशी असलेलं नातं टिकून राहू दे.

Sunday, June 8, 2014

मुखाग्नी




गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची मुलगी पंकजा पालवे–मुंडे हिने त्यांना मुखाग्नी दिला. सगळ्यांनी पंकजाच्या या निर्णयाचे कौतुक केले. ही बाब स्वागतार्ह आहेच. एबीपी माझा या चॅनलवर देखील त्या दोघीया कार्यक्रमात पंकजा आणि शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी सहाव्या वर्षी त्यांच्या वडीलांना मुखाग्नी दिल्याचे समाजापुढे आणले. त्या दोघींच्या निमित्ताने समाजातील मुखाग्नी या विषयावर वेगळा कार्य़क्रम करण्याचे धाडस केले. असो...



अनेक वर्षांनंतर पंकजा यांनी वडिलांना मुखाग्नी दिल्याच्या निमित्ताने पुन्हा एक मुद्दा समाजात चर्चेला आला. मुलीने मुखाग्नी देण्याचा. वंशाचा दिवा जिथे मोक्षाचा मार्ग असतो तिथे मुलीने मुखाग्नी दिला तर मोक्ष मिळत नाही असं सिद्ध करणारा एकही जण पुढे आला नाही हे स्तुत्य वाटतं. किमान, काही गोष्टी तरी धर्माच्या जोखडातून सुटल्या तर त्याचा फायदा समाजाला होईल आणि त्यासाठी एक एक पाऊल का होईना पुढे पडतंय याबाबत दिलासा वाटतो...

यानिमित्ताने आमच्या एका व्हॉट्स अपच्या ग्रुपवर झालेल्या चर्चेत आणखी दोन मुली सापडल्या सोनाली आणि रश्मी... माझ्या ओळखीत माझी मामे बहिण सिद्धी, शेजारच्यांची एक नातेवाईक आणि मी स्वतः.. मी माझ्या मावशीला मुखाग्नी दिला होता. आम्ही प्रत्येकीने हे धाडसाचे पाऊल उचलले तेव्हा आक्षेप घेण्यात आला होता. पण तरीही कुटुंब पाठीशी ठाम राहिलं म्हणून आम्ही आमच्या आप्तांना तथाकथित मोक्षाचा मार्ग दाखवू शकलो.

माझ्या मावशीचा मृत्यू झाला तेव्हा माझ्या एका मावशीने मी मुखाग्नी देणार असं जाहीर केलं. अनेक नातेवाईकांच्या भुवया उंचावल्या. एक तर मुलगी, त्यातही बहिणीची मुलगी, त्यातही लग्न झालेली, नवरा जिवंत असलेली, आई-वडील हयात असलेली... लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मी असे केले तर माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे. पण माझ्या नवऱ्याने निर्णय घेतला मी मुखाग्नी द्यावा असं तो म्हणाला. एका फोनवर. माझ्या सासऱ्यांनी याला पाठिंबा दिला त्यांच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न होता तरी. माझ्या आई –वडिलांनी याला पाठिंबा दिला. त्यांच्या मोठ्या मुलीच्या संसाराचा प्रश्न होता तरी देखील. मुद्दाम सांगावंस वाटतं यातले माझे वडील आणि सासरे मुलींना घर सांभाळावं आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी कराव्यात या विचारांचे आहेत. माझा नवरा डिपेन्ड्स या कॅटेगरीत मोडणारा आहे. माझी आई कायम चूल आणि मूल सांभाळणारी आहे. माझी मावशी देखील फारसं शिक्षण घेतलेली किंवा मॉडर्न लाइफस्टाईल जगणारी नाही. पण ते त्यांच्या त्यांच्या परीने मुलगी किंवा स्त्री यांच्या हक्कांना वाव देणारे आहेत. त्यांच्या या निर्णयामुळेच माझ्या मावशीची माझ्या हातून मुखाग्नी देण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली. या सर्वांचे आभार. माझ्या मावशीच्या मताला आणि माझ्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी....

मुलीने, स्त्रीने किंवा महिलेने मुखाग्नी देऊ नये यासाठी काही मंडळी अनेक कारणं सांगतात. स्त्रिया या नाजूक असतात, त्या या धक्का पचवू शकत नाहीत, स्मशानात अनेक मृतदेह अंत्यविधीसाठी येतात ते पाहून स्त्रिया घाबरू शकतात, वगैरे...

खऱंय... माझ्या मावशीला मध्य रात्री दोन – अडीचच्या सुमारास मुखाग्नी दिला मी. आजही तो प्रसंग मला आठवतो. सरणावर ठेवलेला माझ्या मावशीचा देह आणि तेव्हाची स्मशानातील परिस्थिती मला व्यवस्थित आठवते. या घटनेला येत्या ऑगस्टमध्ये तीन वर्ष होतील. माझ्या मावशीची ही इच्छा पूर्ण करू शकले याचं समाधान माझ्या मनात कायम राहील. पण, एखाद्या पुरुषालाही आपल्या प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप लक्षात राहत नाही?

मी स्त्रीवादी किंवा निरिश्वरवादी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ता वगैरे नाही. मी एक आर्ट्स स्टुडंट असल्याने विज्ञानाचा शाळेपुरता मर्यादीत अभ्यास करणारी अ गर्ल नेक्स्ट डोअर अशीच आहे. सर्वांना समान अधिकार मिळावा आणि कोणावर अत्याचार होऊ नये असं वाटणारी एक सामान्य महिला आहे. जेव्हा स्त्रीने मुखाग्नी देऊ नये या समाजाच्या कारणांचा विचार करते तेव्हा मात्र त्यांची ही कारणं पोकळ वाटतात.


जेव्हा मी माझ्या मावशीचा एक मुलगी असूनही सांभाळ करू शकते तेव्हा मला तिला मुखाग्नी देण्याचा अधिकार का नसावा. माझ्या मावशीचं लग्न झालं नव्हतं पण प्रत्येक स्त्री प्रमाणे ती माझ्यात स्वतःचं मुलं शोधायची मग का मी तिला मुखाग्नी देऊ नये. तिच्या आजारपणात, तिच्या एकटेपणात मी तिच्या भावना ऐकण्याचं धाडस ठेवू शकते तर का तिला मुखाग्नी देऊ शकत नाही.

मी मुखाग्नी देऊ शकत नाही समाजासाठी, काही नातेवाईकांसाठी... कारण, मुखाग्नी देणं = ईस्टेट, प्रॉपर्टी, दाग –दागिने खिशात घालणं अशी एक समाजाने स्वतःची केलेली रीत आहे. सुदैवाने माझ्या मावशीकडे यातलं काहीच नव्हतं...त्यामुळे माझ्या मुखाग्नी देण्याला फार विरोध झाला नाही.

काही कुटुंबांमध्ये अशा अनेक एकट्या राहणाऱ्या व्यक्तींसाठी मुखाग्नी देण्याची चढाओढ लागते. मृत व्यक्तीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी देताना याने अग्नी दिला होता तेव्हा मृत व्यक्तीच्या मालकीचा जागा, वस्तू मुखाग्नी देणाऱ्या व्यक्तीला मिळावी याकरीता अशा व्यक्तीचं नाव सहज पुढे येतं. मग भले आयुष्यभर त्या व्यक्तीच्या तब्येतीची चौकशीसुद्धा मुखाग्नी देणाऱ्या व्यक्तीने केली नसेल. त्या व्यक्तीच्या घरी जर महिला असतील तर मग त्यांच्याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार अग्नी देणाऱ्या व्यक्तीकडे सहज दिला जातो. मग ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यास अपयशी ठरलेली का असेनात...

मी विल्सन कॉलेजमध्ये होते तेव्हा मला एक प्राध्यापिका शिकवायला होत्या. डॉ. मंगला आठलेकर. त्यांनी लिहिलेल एक पुस्तक आठवतं...गार्गी अजून जिवंत आहे. उत्तर प्रदेशात एका छोट्याशा खेड्यात जन्मलेली मुलगी. बालविवाहानंतर थोराड पतीच्या मारहाणीला कंटाळून घरातून पळून जाते. स्मशानात राहते त्यानंतर तिथल्या स्मशान सांभाळणाऱ्या व्यक्तीकडून मृतदेहावर करायचे विधी शिकते आणि स्मशानातू राहून तसे विधी करू लागते. स्मशानात राहून स्वतःचा उदरनिर्वाह करते... वैदिक काळातही तथाकथित पंडितांना आपल्या वेदमंत्राच्या अभ्यासाने चकीत करणाऱ्या गार्गी आणि मैत्रेयी या दोन्ही स्त्रियाच होत्या.

मग का नाकारला जातो स्त्रीयांना हा अधिकार? जी रानावनात एकटी काम करू शकते, जी दिवसभर काबाडकष्ट करते, जी आजारपणात सेवा – शुश्रुषा करते, जी एका जीवाला जन्म देऊ शकते, जी सर्व अपमान पचवते, जी कोणत्याही अधिकाराविना सर्व कर्तव्य पार पाडू शकते ती एका मृत देहाला मुखाग्नी देऊ शकत नाही?

 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुखाग्नी दिल्यानंतरही ती कुटुंबासाठी मुलगी, बहीण, पत्नी, आई आणि स्त्री राहते... स्वखुशीने...