Tuesday, February 28, 2017

तिची जिद्द जगण्यासाठी, जगविण्यासाठी...




















                                                                                    शब्बो



हर्षदा परब
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. 27: आईवर अॅसिड हल्ला झाला. त्यावेळी आईच्या मांडीवर असलेल्या अडीच वर्षांच्या शब्बो शेखवरही अॅसिड पडलं. तिची मानेपर्यंतची त्वचा जळाली. त्या घटनेनंतर तिने आई, कुटूंब सारं काही गमावलं. जिद्दीने जगणाऱ्या शब्बोला आता अॅसिड सर्व्हायवर्ससाठीच्या साहस फाउंडेशन संस्थेला मोठं करायचं आहे आणि अॅसिड सर्व्हायवर्सना त्यांचा हक्क, उपचार मिळावेत म्हणून काम करायचं आहे. 

अॅसिड हल्ल्यानंतर छोट्याशा शब्बोवर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार झाले. कुटूंब गमावलेल्या चार वर्षांच्या शब्बोला नियमबाह्य (रुग्णाला उपचारांशिवाय ठेवता येत नाही) पद्धतीने रुग्णालयात आश्रय देण्यात आला. नंतर, तिला सरकारी आश्रमात ठेवलं. त्यानंतर पुढे श्री मानवसेवा संघ या खासगी आश्रमात ती वाढली. मानवसेवा आश्रमाने पंखांना बळ आणि जगण्याला स्वप्न दिली असं शब्बो सांगते. त्यांच्या मदतीने शब्बोने बीसीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 68 टक्क्यांनी पास झालेल्या शब्बोला नोकरी मिळाली. तिने आश्रमातून बाहेर पडून स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नोकरी गेल्याने तिच्यावर आभाळ कोसळलं. हॉस्टेलवरच्या रुममेट ललिता गोमाने हिने शब्बोला वर्षभर मदत केली. या वर्षभरात शब्बोच्या कामाच्या अनुभवावर आणि गुणांवर तिला अनेक नोकऱ्यांचे कॉल आले. इण्टरव्ह्यूला चेहरा पाहून अनेकांनी नाकारलं. हे पहिल्यांदा झालं नव्हतं. शाळेतल्या मुलांना या चेहऱ्याची सवय होती म्हणून फार त्रास झाला नाही. कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र, विश्व बदललं. सर्वांनी नाकारलं, टाकलं, थट्टा केली. तेव्हा अभ्यासावर आणि गुणांवर परिणाम झाला होता. त्यावेळी क्रिना गांधी या आश्रमात येणाऱ्या शिकवणी शिक्षिकेने  'ध्येयावर लक्ष केंद्रीत कर' असा सल्ला दिला. त्या सल्ल्याने आयुष्यभराची शिकवण दिली. त्यानंतर डगमगले नाही असं शब्बो सांगते. 
खासगी आणि सरकारी बँकांकरीता क्रेडिट कार्डाच्या सेल्ससाठी काम करणाऱ्या स्कॉट कन्सल्टन्सी या प्रिती ठाकर अरोरा यांच्या कंपनीत शब्बो बॅक ऑफिस एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करते. कंपनीत 20 टक्के जागा अॅसिड सर्व्हायवर आणि शारिरीकदृष्ट्या विशेष व्यक्तींसाठी असल्याने ही नोकरी मिळाल्याचं शब्बो सांगते. रोजगार असला तरी खासगी कंपनीत, उपचारांसाठी घ्याव्या लागणाऱ्या सुट्ट्यांचा पगार कापला जातो. ती खंत व्यक्त करते.  
तिच्या चेहऱ्याची त्वचा मानेपर्यंत जळली आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा डावा डोळा पूर्ण निकामी झाला आहे. तिला अन्न गिळायलाही त्रास होतो. न केलेल्या गुन्ह्याची आयुष्यभर शिक्षा भोगणार नाही या निश्चयाने बालपण हिरावून घेणाऱ्या त्या घटनेचा पाठपुरावा शब्बोनो सुरू केला आहे. शब्बो सचिव असलेल्या अॅसिड सर्व्हायवर्स साहस फाउंडेशन या संस्थेच्या प्रमुख दौलतबी खान यांनी शब्बोच्या केसची एफआयआर कॉपी मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. एफआयआरची कॉपी हातात मिळाल्यावर स्वतःच्या हक्कांसाठी लढणार असं शब्बो सांगते. स्वतःच कुटूंब, आई गेल्यावर हॉस्पिटलमध्येही न परतलेले बाप, आयुष्यभरासाठी जखमा देणारा अॅसिड अटॅकर या सर्वांचा काय झालं ते जाणून घेणार असं ती सांगते.
 


'पाच महिन्यांपासून एक एफआयआरची कॉपी शोधतो आहोत. माहितीचा अधिकार, पोलिस स्टेशनमधील चकरांनतर फक्त एफआयआर नंबर आणि हल्लेखोराचं नाव एवढचं हाती लागल्याचं दौलतबी सांगते. नवऱ्याने सोडून दिलेल्या, तीन मुलांची एकल माता असलेल्या दौलतबीने शब्बोला तिच्या घरात ठेवून घेतलं आहे. पैसे भरुनही भाड्याचं घर मिळत नाही. रस्त्यावर राहता येत नाही म्हणून हा हक्काचा पर्याय असं शब्बो हसत सांगते. 

योगायोग
सेहतर्फे आयोजित एका परिषदेत शब्बोची केस सायन रुग्णालयाच्या बर्न विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. माधवी गोरे यांनी सादर केली. त्यावेळी त्या परिषदेत शब्बो असल्याचं त्यांना माहित नव्हतं. ही भेट एक योगायोग असल्याचं शब्बो सांगते.   

आज मुख्यमंत्री बंगल्यावर होत्या त्या
अमृता फडणवीस आयोजित करत असलेल्या फॅशन शो मध्ये शब्बो आणि दौलतबी सहभागी होणार आहे. 5 मार्च रविवारी होणाऱ्या या फॅशन शोसाठी त्या दोघी उत्सुक आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चहा प्यायल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. मात्र हक्कासाठी लढण्यातही राजकारण्यांची आणि मोठ्या व्यक्तींची मदत व्हायला हवी असं दौलतबी सांगते.   

एनजीओ फक्त आमचा वापर करतात 
अॅसिड सर्व्हायवर्ससाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. मात्र, त्या सर्व्हायवर्सचा वापर फंडसाठी करतात. मिळणारे पैसे वाटून घेतात आणि सर्व्हायवर्सना विसरून जातात. गरज असते तेव्हा वापर व्हावा म्हणून सर्व्हायवर्सकडे बघण्याची वृत्ती थांबवायची आहे. यासाठी सर्व्हायवर्सनी मिळून स्थापन केलेल्या साहस या संस्थेच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे. केवळ अॅसिड सर्व्हायवर्स, बलात्कारपिडीत, विधवा अशा वंचितांसाठी या संस्थेमार्फत काम करायचं आहे. भीक नकोय. स्वतःच्या पायावर उभं राहून ही मदत मिळावी म्हणून. साहस संस्थेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्या माध्यमातून घरात लपून राहणाऱ्या अॅसिड सर्व्हायवर्सचा स्टॉल ताज हॉटेलमध्ये लावण्यासाठी त्यांनी कार्यक्रमाची तयारी केली होती. आयत्यावेळेस स्पॉन्सरर गळून गेल्याने ही मेहनत वाया गेली. ज्या पैशातून अनेक सर्व्हायवर्सच्या उपचारांसाठी मदत झाली असती ते पैसे डोळ्यांदेखत संपले. - दौलतबी खान, अध्यक्ष, सहास फाउंडेशन  

Friday, May 13, 2016

तेव्हा त्याच्या दिसण्याने बातमी रखडली होती


सगळेजण फँड्री आणि नागराज मंजुळे याच्याबद्दल बोलताहेत...मग म्हटलं आपण का गप्प बसावं...हो पण मी फँड्री पाहिलेला नाही.  मात्र, मी नागराज मंजुळेचा इण्टरव्ह्यू घेतलाय.  त्या इण्टरव्ह्यूच्या आठवणी आणि जब्याची गोष्ट मला सारखी वाटली म्हणून हा किस्सा शेअर करण्याचा मोह टाळता येत नाही.  

तेव्हा मी एका चॅनलसाठी एण्टरटेन्मेण्ट बीटसाठी रिपोर्टींग करत होते. त्यावेळी नागराजची भेट झाली.
नागराजने त्याची पिस्तुल्या ही डॉक्युमेंट्री एका स्पर्धेत उतरवली होती.  त्याच स्पर्धेत त्याचा मित्र मिथून चौधरी (पायवाटचा दिग्दर्शक) याची घनदाट ही डॉक्युमेण्ट्री सुद्धा दाखल झाली होती होती. पिस्तुल्या ही पारधी समाजातील एका मुलाची कथा होती. त्यात नागराजने एका पारधी मुलाकडून काम करवून घेतलं होतं. डॉक्युमेण्ट्री काही त्या फेस्टिवलमध्ये पाहण्याची संधी मला मिळाली नाही. पण नंतर मी ती डॉक्युमेण्ट्री मिळालेल्या सीडीच्या आधारे ऑफिसमध्ये पाहिली. दुर्दैवाने ती सीडी आज माझ्याकडे नाही. त्या इण्टरव्ह्यूशी जोडलेल्या काही आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत.
चॅनलच्या एण्टरटेण्मेण्टमध्ये डॉक्युमेण्ट्री या विषयाला किरकोळ स्थान असते. त्यातही प्रथितयश माणसाने केलेली डॉक्युमेण्ट्री असेल तर त्या डॉक्युमेण्ट्रीचं नशिब खुलतं.

मी नविनच होते. त्या वयातही माझ्या लेखी सामाजिक विषयाशी बांधिलकी वगैरे गोष्टी आऊटडेटेड नव्हत्या.  तेव्हा घनदाट डॉक्युमेण्ट्री खूप चालली होती अशी बाहेर चर्चा होती. मलाही ऑफिसमधून घनदाट डॉक्युमेण्ट्री केलेल्या व्यक्तीशी बोल असं बजावून पाठवलं होतं. मी मिथूनशी बोलले. तेव्हा, मिथूनने माझी नागराजशी ओळख करुन दिली. आग्रह केला त्याचा इण्टरव्ह्यू घेण्याचा. इण्टरव्ह्यू कसला बाईट. जेमतेम बाईट घेण्याचा अधिकार माझ्याकडे होता. (सविस्तर बोलता न येणं ही मला अडचण वाटते)

एक काळा तरुण, कुरळे केसे खांद्यापर्यंत. सोबत एक मुलगा. दोघेही साध्या कपड्यातले. मी त्या तरुणाचं नाव विचारलं त्याने त्याचं पूर्ण नाव सांगितलं. त्याची डॉक्युमेण्ट्री, कथा सारं काही त्याने सविस्तर सांगितल. एण्टरटेण्मेण्ट शुटवेळी लोकांशी बोलताना येणारा बडेजाव आणि खोटा भाव दोन्ही त्यात मिसिंग होतं. म्हणूनच की काय मीही जास्त वेळ बाईट घेतला.
त्या तरुणाने त्याच्या डॉक्युमेण्ट्रीत प्रमुख भूमिका असलेल्या मुलाची आवर्जून ओळख करुन दिली. याला कॅमेराही माहित नव्हता’ त्या तरुणाने माहिती दिली. तो तरुण भरभरुन बोलला. त्याच्या बरोबर असलेल्या त्या मुलाबद्दल बोलण्यातच त्याला अधिक रस होता.
मी माझ्या नेमाप्रमाणे बातमी केली. डॉक्युमेण्ट्रीचे व्हिज्युअल्स होते. पण पुढचे दोन दिवस बातमी चॅनलवर गेलीच नाही. मी बातमीचा पाठपुरावा केला तेव्हा मला उत्तर मिळालं होतं याला टीव्हीवर कोण बघणार?’एण्टरटेन्मेण्ट बीटचं एक चॅलेंज तेव्हा मला कळलं. बातमीतले बाईट आणि फोनो दोन्हीसाठी माणसं सुंदर आणि ओळखीची लागतात. पण माझ्या लेखी ती डॉक्युमेण्ट्री, डॉक्युमेण्ट्रीचा विषय आणि त्यात पारधी समाजातल्या मुलाने काम केल्याची माहिती या बाबी सुंदर होत्या.

दरम्यान मी ज्या दोन डॉक्युमेण्ट्री केलेल्या तरुणांचा बाईट घेतला होता त्यांनी फोन केला होता. आमची बातमी लागली कामाझ्याकडे नाही हेच उत्तर होते. मी माझ्यापरीने पाठपुरावा सुरू ठेवला. त्या दोन तरुणांच नशिब बदललं एका रविवारने. रविवारी एण्टरटेन्मेण्टची बातमी नव्हती. तेव्हा माझी बातमी लागली. झालं घोडं गंगेत न्हालं.

दोस्तांनो ज्याच्या दिसण्यामुळे बातमी रखडली होती तो पिस्तुल्याचा दिग्दर्शक अं हं तुमच्या लाडक्या फँड्रीचा दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे होता. हे सांगितलं तर आज तुमचा विश्वास बसेल. कारण, आज त्याचा तास –तास इण्टरव्ह्यू घेण्यासाठी लोक रांगा लावत असतील.  
  
(हा ब्लॉग २४ फेब्रुवारी 2014 ला जय महाराष्ट्र वाहिनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. पण त्यात थोडे बदल करुन पुन्हा हा ब्लॉग पब्लिश करण्याचा मोह मला आवडत नाही. तेव्हा मी त्या वेबसाईटची ईन्चार्ज होते. या ब्लॉगची लिंक पुन्हा 
 )

Thursday, March 3, 2016

तीन महिन्यात किमान 20 वेळा हृदयविकाराचे झटके


तीन महिन्यात किमान 20 वेळा हृदयविकाराचे झटके 
तरिही बाळ सुखरूप 
आई सुशिक्षित असल्यामुळे बाळ वाचले डॉक्‍टरांची प्रतिक्रिया 

सकाळ वृत्तसेवा, 
वृत्तसेवा, 
मुंबई, ता. 2ः अवघ्या तीन महिन्यात बाळाला सुमारे 20 किंवा त्याहून अधिक हृदय विकाराचे झटके आले असावेत असा डॉक्‍टरांचा अंदाज आहे. इतक्‍या बिकट प्रसंगानंतरही अवघ्या तीन महिन्यांची आदिती गिलबिले जिवंत आहे. डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार याचं पूर्ण श्रेय तिच्या आई-वडिलांचं आहे. आई वडील सुशिक्षित होते म्हणून बाळ वाचलं. 

सोलापूर येथील बार्शी मधील गिलबिले कुटूंबात 25 नोव्हेंबरला आदितीचा जन्म झाला. सतत घाम येणे, दूध पिताना तासन तास रडणे, दूध न पिणे या समस्यांमुळे आदितीला डॉक्‍टारांकडे वारंवार न्याव लागत होतं. जानेवारी महिन्यात आदितीला हृदयाचा अत्यंत बिकट आजार असल्याचे उघड झाले. औषधोपचारांनंतरही आदितीमध्ये बदल दिसत नव्हता. सरते शेवटी बार्शीहून आदितीला तिच्या कुटूंबियांनी पूण्याच्या हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. तिथल्या डॉक्‍टरांनी आदितीवर उपचार होतील पण त्यात तिची जिवंत राहण्याची शक्‍यता कमी असल्याचे सांगितले. तेव्हा आदितीची आई प्रिती गिलबिले यांनी आदितीला मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला. 

खासगी वाहनाने आदितीला मुंबईत आणण्यात आले. नातेवाईकांच्या सांगण्यावरुन एच.एन. रिलायन्स रुग्णालयात तिला दाखल केले. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी आदितीच्या  चाचण्या केल्या असता आदितीवर तातडीची शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्याचे लक्षात आले. त्यानुसार आदितीवर 25 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी हृदयातील शुद्ध रक्त फुप्फुसात सोडणाऱ्या धमनीला योग्य ठिकाणी जोडण्यात आले. 9 तासांच्या शस्त्रक्रियेदरम्यान आदितीच्या हृदयाच्या एका बाजूला यंत्राच्या आधारे काम करण्यास प्रवृत्त करण्यात आलं. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. एका वेळी आदितीचे हृदय, फुप्फुसं आणि तिच्या शरिरातील कॅल्शियम, क्षारांचे प्रमाण नियंत्रित करावे लागत होते असे या शस्त्रक्रियेतील प्रमुख डॉ. के शिवप्रकाश यांनी सांगितले. 

अनकेदा आदिती तीन ते चार तास रडायची. कळायचं नाही ती का रडते. तिला आजार होता हे समजलं तेव्हा आदितीला वाचविण्यासाठी आम्ही सात ते आठ डॉक्‍टरांकडे गेलो. बार्शीला शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं कळलं तेव्हा पुण्याला शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेताल. पुण्यात हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात बाळावर उपचार करण्याची तयारी दाखविली पण बाळ वाचण्याची हमी ते देत नव्हते. या रुग्णालयात ती हमी मिळाली म्हणून आम्ही इथे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला डॉक्‍टरांमुळे माझं बाळ वाचलं असे आदितीची आई प्रिती गिलबिले यांनी सांगितले. 

आई शिकलेली होती म्हणून 
एका मुलीला घेऊन बार्शीहून मुंबईत यावं लागणं हे असंघटित आरोग्य सेवेचं लक्षण आहे. आदितीच्या माता-पित्यांनी वेळीच तिला रुग्णालयात आणलं आणि शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्याने आदिती वाचली. आदितीचे आई-वडील सुशिक्षित होते त्यातही आई शिकलेली होती म्हणून आदिती वाचली असं मी म्हणेन. आदिती तिच्या वयाच्या सहा महिन्यानंतर आली असती तरी आदितीला जगली नसती. आदितीच्या आजारामुळे तिची शुद्ध रक्त शरिरात सोडण्याची प्रक्रिया मंदावत चालली होती. ज्याचा परिणाम हृदयाच्या काम करण्याचा क्षमतेवर होत होता. आदितीवर वेळीच शस्त्रक्रिया झाली नसती तर आदिती जगली नसती. आता आदिती सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगू शकते- डॉ. शिवप्रकाश के. 

चौकट 
आदितीला अल्कापा हा हृदयाचा अत्यंत दूर्मिळ आजार होता. या आजारामध्ये हृदयाची रक्तपुरवठा करणारी धमनी फुप्फुसांमध्ये रक्त सोडत होती. याने हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि हृदयाचे, स्नायू मृत झाल्याने हृदय प्रत्यारोपणाची आवश्‍यकता भासते. 
एकूण हृदयविकारांच्या तुलनेत या आजाराचे प्रमाण .025 टक्के ते 0.5 टक्के आहे. 
तीन लाखात एकाल हा आजार होतो. 
हा आजार झालेले 10 पैकी 9 मुलांचा मृत्यू जन्मानंतर एक वर्षात होतो 
वयस्कर व्यक्तींमध्ये या आजाराला हृदय प्रत्यारोपण हाच पर्याय आहे 

डॉ. श्रीपाल जैन, बालहृदयरोगतज्ज्ञ 

घाम येणे, न जेवणे आणि सतत रडणे या साधारण समस्या आहेत. पण जर मुलाचं वजन वाढत नसेल आणि या समस्या दिसत असतील तर मुलाला हृदयविकार असल्याची शक्‍यता असते. अनेकदा डॉक्‍टरांच्या हे लक्षात येत नाही. अशी बाळ जेव्हा दमतात किंवा रडतात तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका येतो - डॉ. अनिष वोरा 

Monday, February 8, 2016

हेल्मेट सक्ती !


हेल्मेट सक्ती गरजेचीच आहे. तसंच बाईक चालविणा-या व्यतिरिक्त बाईकवर असलेल्यांनाही ही हेल्मेट सक्ती हवी. विशेषतः महाराष्ट्राच्या इतर भागात एका बाईकवर जिथे तीन ते चार जण सर्रास बसून फिरतात तिथे ती फार गरजेची आहे. कारण अशा ठिकाणी ब-याचदा नवरा बायकोबरोबर दोन मुलं किंवा नवरा बायकोबरोबर शेतावर काम करणारे म्हातारे असतात. विचार करा एकावेळी किती प्राण जाऊ शकतात. तसंच लहान मुलांसाठीही चांगल्या पद्धतीची हेल्मेट बाजारात आणणं आवश्यक आहे. 

हेल्मेट सक्तीमुळे आता तकलादू हेल्मेट हायवे आणि रस्त्याच्या कडेला घेऊन बसणारे दिसतील. केवळ हेल्मेट न घालता फिरणा-यांवर कारवाई करण्यापेक्षा असे हेल्मेट विकणा-यांवरही कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. 

विशेषतः शेतातून परतताना संध्याकाळी किंवा रात्री गाडी रस्त्यावर किंवा हायवेवर येताना अनेकजण गाडीने भरधाव रस्ता क्रॉस करतात. अशा वेळेस ब-याचदा अपघात होण्याची शक्यता उद्वभवते.  

हेल्मेट सक्ती बरोबरच  रस्त्यावर चालणा-यांनाही काही नियम घालून दिले पाहिजेत. विशेषतः हायवे किंवा रस्त्याच्या कडेला शेतातून बाहेर येणारे लोक रात्रीच्या वेळी सहसा दिसत नाहीत अचानक गाडीसमोर येतात. ज्या पद्धतीने पायी शिर्डीला जाणारे लोक अंधारात चमकणारं जॅकेट किंवा हातात चालू बॅटरी घेऊन चालतात त्याप्रमाणे पादचाऱ्यांनाही सुचवलं पाहिजे. 


  हेल्मेट सक्तीला समर्थ का देतेय ? 
अपघातात अनेकदा डोक्याला मार बसतो. हा मार मोठ्या प्रमाणावर असेल तर मेंदूला ईजा होते. रस्ते अपघतातात शरिरावर इतर ठिकाणी मोठा आघात झालेला नसला तरी मेंदूला मार लागल्यामुळे मेंदूमध्ये रक्त स्त्राव होणे किंवा मेंदूला सुज येणे अशा समस्या दिसतात. मेंदू मृत होणे किंवा मेंदू कमी काम करणे अशा समस्या उद्भवल्यास त्याने शरिरातील इतर अवयवांवरील मेंदूचे नियंत्रण सुटून अंतर्गत रक्तस्त्राव होतो. ज्याने मृत्यूच्या शक्यतेत वाढ होते.  


(स्वतःच्या गाडीतून वर्षभर प्रवास करताना या गोष्टी सुचल्या. पण हेल्मेट सक्तीने निमित्त दिलं.)

Sunday, January 10, 2016

सेक्स, सेल्फी आणि सोशल मीडिया


सेल्फी काढणं हा आजार बळवण्यामागे सोशल मीडिया, स्मार्ट फोन यांबरोबर फॅशन आणि ट्रेण्डचं अंधानुकरण तसंच प्रसिद्धीची आणि स्तुतीची भूक असल्याचं दिसून येतं. लाईक्स, कमेंट्स या सोशल माध्यमांच्या दोन शब्दांभोवती मग सगळं भावविश्व उधळलेलं दिसून येतंय सध्या. 
पण म्हणून सेल्फी काढणं वाईट मुळीच नाही. सेल्फीचा अतिरेक आणि त्यासाठी जीव धोक्यात घालणं वाईट असं तज्ज्ञांच मंत आहे. पण आपण फॅशन आणि ट्रेण्ड या शब्दांनी निर्माण केलेल्या शर्यतीसाठी किती पळावं याला बंधन असण्याची देखील आवश्यकता निर्माण झाली आहे हे या निमित्ताने वाटू लागलंय. जे सेल्फी आणि त्यातून होणा-या अपघातांच्या माध्यमातूून अधोरेखित होत आहे. ज्याप्रमाणे इन फॅशन असलेला एखादा कपड्याचा प्रकार आपल्याला, आपण जात असलेल्या कार्यक्रमात किंवा वातावरणात शोभून, उठून दिसेल हा विचार दुय्यम असतो त्याप्रमाणे सेल्फीचं झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सेल्फीच कशाला एकूणच फोटो काढण्याचं वाढणारं फॅड याच पद्धतीत मोडतं. यात केवळ आनंदाचा, किंवा महत्त्वाचा क्षण टिपणं एवढंच नाही. तर, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याची आणि त्यातून स्तुती आणि प्रसिद्धी मिळविण्याची भूकही कारण आहे. किंवा केवळ सेल्फी हे वेढ नाही तर प्रसिद्धी आणि स्तुतीसाठीचा हपापलेपणा देखील याला कारण ठरु लागलंय. की आपण सोशल माध्यमांवरही शर्यत निर्माण केलीय? पहिली सेल्फी कोण टाकतं? दिवसभरात जास्त अपडेट्स कोण देत? वेगळ्या आणि चांगल्या ठिकाणी जाऊन सेल्फी किंवा फोटो कोण काढत याची शर्यत आहे का ही ?
सेल्फी पॉइंट्सही काही ठिकाणी तयार झाले. ते जेव्हा तयार झाले तिथे जाऊन किंवा तिथे गेल्यावर अनेकांनी फोटो काढले. पण काही तरी वेगळ करण्याच्या नादात असे जीवावरचे खेळ केले जातात. 
सेल्फी हा  सेक्स अपिलिंगचा भागही ठरू लागलाय का?. तोंडाचा चंबू (पाउट) करुन  फोटो काढणं हे एकेकाळी सेक्स सिंबॉल मानलं जायचं. मेरलिन मेन्रोचा फोटो आठवा. हल्ली तसे पाउट करुन किंवा डक लिप्स, स्परो फेस करुन सेल्फी काढण्याचे प्रकार मुलींमध्ये सर्रास दिसताहेत. कदाचित त्यांना या पाउटचा अर्थ माहित असावा किंवा नसावा पण ते होताना मात्र दिसतंय. किती पालकांना असे ओठांचे चंबू का केले जातात हे माहित आहे ? किती पालकांना असं ओठांचे चंबू करुन फोटो काढण हे चुकीचा सिग्नल देणारं आहे हे माहित आहे?  
केंब्रिज ऑनलाईन डिक्शनरीत पाऊटचा मिळालेला अर्थ  (to ​push the ​lower ​lip ​forward to show you are ​annoyed, or to ​push both ​lips ​forward in a ​sexually ​attractive way)

Monday, October 26, 2015

आई मी उद्या काय बनून शाळेत जायचं?



     माझ्या मुलाने आराध्यने (३वर्षे) रविवारी रात्री (२५ ऑक्टोबर २०१५) ला हा प्रश्न विचारला आणि मला आणि प्रशांतला काय आश्चर्याच्चा धक्का बसला आणि आपलं चूकतंय असा साक्षात्कार झाला. एका सेकंदातला हा झटका पुरे होता आमच्यासाठी... वेळीच भानावर येण्यासाठी.
प्रशांतने यावर उत्तर दिलं... आराध्य बनून जायचंय तूला शाळेत.

नर्सरीत जाणाऱ्या आराध्यला शाळेत वेगवेगळ्या डे चं सेलिब्रेशन म्हणून वेगवेळ्या कपड्यात जायचं असतं.
पहिल्यांदा १४ ऑगस्टला तो टिळक बनून गेला. मग त्यानंतर श्रीकृष्ण जन्मासाठी त्याला श्रीकृष्ण बनवून पाठवायचं होतं. पण तो आजारी असल्याने ते शक्य झालं नाही. त्यानंतर नवरात्र सेलिब्रेशन म्हणून पारंपारिक वेशभूषेत जायचं होतं. मग दसऱ्याच्या आदल्या दिवशी तो राम बनून गेला. दसऱ्याच्या सुट्टीनंतर जुसऱ्याच दिवशी दैनंदिन जीवनात मदत करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या पोषाखात जायचं होतं. तेव्हा तो सैनिक बनून गेला. रविवारची सुट्टी. शनिवार रविवार अशी दोन दिवस सुट्टी झाल्यानंतरही त्याने साहजिक प्रश्न विचारला. 'उद्या मी उद्या काय बनून शाळेत जायचं?'

 शाळेच्या म्हणण्यानुसार यातून ते शिकतात. पण पालकांची आणि मुलांची धावपळ घडवून आणणारे हे दिवस इतके महत्त्वाचे आहेत? प्रॅक्टिकल शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आणि मुलांची काय मानसिकता होते  हे शिक्षकांना त्यांच्या मुलांच्या शाळेत येणाऱ्या अनुभवावरुन माहितच असेल. का शिक्षण महाग होत चाललंय त्यात हेही एक कारणच आहे. जसे शाळेतल्या प्रोजेक्टवर आक्षेप घेतात पालक तसाच आक्षेप या अशा डे सेलिब्रेशनवरही घ्यायला हवा असं  प्रशांत सारखं घरी सांगतो.

मुलांना भलेही मोठं झाल्यावर असे वेगवेगळ्या वेशभूषेतले फोटो पाहून आनंद होईल. पण त्यांना ते टोचणारे कपडे, होणारी धावपळ लहानपणी अन्यायकारक वाटते. बरं ड्रेस न घालता पाठवलं तर फोटो काढताना अशा मुलांना बाजूला ठेवलं जातं. मानसिक त्रास देणारीच वाटते.

मुलांना माहिती देण्यासाठी काही दुसरे पर्याय नक्कीच निघतील. सुचतील. पण कसं थांबू शकेल हे सारं ?

Thursday, October 15, 2015

माझी वाचनाची आवड


वाचायला लहान पणापासून खुप आवडायचं. आठवतंय खुप वाचायचे. आजूबाजूला काय घडतंय याचं भान नसायचं. पुस्तक हातात घेऊन एका जागी बसले की संपला विषय. मग पुस्तक संपेपर्यंत उठायचं नाही.
शाळेतली पुस्तक हातात आली की वाचून पूर्ण. गंमत म्हणजे एका वाचनात धडा पाठ होऊन जायचा. दोन-तीन वाचनानंतर कुठली ओळ कितव्या पानावर कुठल्या पॅराग्राफमध्ये आहे, लेखक कोण वगेरे सगळं पाठ व्हायचं. या वाचनामुळेच चेव्हा माझा शाळेत पहिल्या पाचात नंबर होता. तेव्हा पुस्तक विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. शाळेची पुस्तकही इतरांपेक्षा उशीराच मिळायची. पण वाचायला इतकं आवडायचं की आईची हाक आणि पोटातल्या कावळ्यांचा कालवा काहीच लक्षात यायचं नाही. आठवतंय. तेव्हा आई हाकेला ओ दिली नाही किंवा सारखी वाचत बसले की मला झाडूने मारायची. चष्मा लागेल या भितीने ते ओराडाओरड करायची माझ्या कानावर पडलं नाही की ऐकू येण्यासाठी ती हा उपचार करायची. पुढे तिच्या आणि बाबांच्या मेहनतीनचे शिक्षण शक्य झालं.
वाचनासाठी शाळा मला परवडायची. मी गिरगावातल्या एस.एल.अॅण्ड एस.एस.गर्ल हायस्कूल शाळेत शिकायचे.  पाचवी अ च्या वर्गासमोर शाळेची लायब्ररी होती. मधल्या सुट्टीत तिथे बसणाऱ्या ग्रंथपाल बाईंकडे जाऊन पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. तेव्हा आठवड्याला एक पुस्तक मिळायचं. म्हणजे त्या आधी वाचून झाल तर दुसरं पुस्तक घेता यायचं. पुस्तक घ्यायला येणाऱ्या मुलींवर त्यांचा विशेष जीव. पुस्तकं सुचवायच्या, हवं असलेलं पुस्तक दुसऱ्याला दिलं असेल तर आठवणीने ते परत आलं की बाजूला ठेवायच्या. कधी उशीर झाला पुस्तक द्यायला तर त्या ज्यांना दंड भरणं शक्य नाही अशा मुलींना रागवून सोडून द्यायच्या. मी त्यातली एक होते. त्यांचा चेहरा आजही डोळ्यासमोर आहे. पण नाव आठवत नाही. नाव लक्षात ठेवण्यात मी थोडी कमजोर आहे.
प्रत्येक वर्गात एक पेटी होती. हिरव्या रंगाची लोखंडी पेटी. ऑफ पिरिएड (शिक्षक नसतील तो तास)त्या पेटीतली पुस्तक वाचायला दिली जात. वर्गातला मॉनिटर किंवा प्रिफेक्ट ती पुस्तक वाटायचा तो तास संपला की पुस्तक परत घेतली जायची. कधी घरी पण द्यायचे.
शाळेत असतानाच आमच्या वाडीत (कामत चाळीत ) राहणाऱ्या एका मुलाने त्याचा पुस्तक संग्रह सर्वांसाठी खुला केला. घरगुती लायब्रकी वगैरे. आठवड्याला एक रुपया भरुन तो पुस्तक द्यायचा. मी पुस्तक घेतलं की अर्ध्या एक तासाने ते पुस्तक परत करायचे. मिळेल ती पुस्तक एका दिवसात दोन - तीन वगैरे पुस्तकं वाचायचे. एक दिवस परिक्षा संपल्यानंतर मी पुस्तक आणायला गेले. तर त्याने पुस्तक दिलं नाही. म्हणाला आईने सांगितलंय पुस्तक द्यायचं नाही. बस मग पुन्हा त्याच्याकडे पुस्तक मागायला गेले नाही.
विल्सन कॉलेजमध्ये गेले आणि विल्सनची मोठी लायब्ररी पाहून वेडावून गेले. पण माझ्या आवडीची मराठी पुस्तक तिथे फार नव्हती. तरी माझ्या शिक्षिकांच्या कृपेने लायब्ररीयन माझ्यासाठी पुस्तक राखून ठेवत. कॉलेजमधल्या माझ्या प्रोफेसर तारकर बाई खास पुस्तकांची यादीसुद्ध द्यायच्या. या काळात श्री.ना.पेंडसे, जयवंत दळवी, भाऊ पाध्ये अशा
लेखकांची ओळख झाली. तेव्हा वाचलेलं आणि आजही आठवणारं पुस्तक म्हणजे नॉट विदाऊट माय डॉटर. गार्गी अजून जीवंत आहे (मंगला आठलेकर लेखिका), रारंगढांग आणि माणसं. त्यानंतरच्या काळात म्हणजे जर्नलिझमला असताना वाचलेल्या पुस्तकांपैकी ही वाट एकटीची, हे दुःख कोण्या जन्मीचे (समलैंगिक विचारांवर प्रकाश टाकणारे), तू भ्रमत आहासी वाया. इंग्रजी जे वाचलं त्यातलं लक्षात राहणार पुस्तक म्हणजे ट्युसडे विथ मॉरीस.
गरोदरपणात भरपूर छोटी पुस्तक वाचली त्यामध्ये जिजाबाई, बाबा आमटे, यशवंतराव चव्हाण, शिवाजी, व्ही. राधाकृष्णन यांची माहिती देणारी छोटी पुस्तक आणि नापास मुलांच्या गोष्टी तसंच हाती ज्यांच्या शून्य होते. 
काही महिन्यांपूर्वी वाचलेली पुस्तक म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर झीरो आणि शिवाजी कोण होता.
भावाने मला दिलेलं सिक्रेट आणि पॉवर ही दोन पुस्तक चाळली फक्त पण बरंच शिकले त्यातून.
आता पुस्तक विकत घेता येतं पण खंत आहे ते सलग वाचायला मिळत नाही. हल्ली वाढदिवसालाही कोणी पुस्तक भेट देत नाही याची असो. पव वाचत राहीन आयुष्यभर.